Powered by Blogger.

Wednesday, 3 May 2017

वाग्यज्ञाची
सावली

३ मे हा प्राचार्य राम शेवाळकरांचा स्मृतिदिन. त्यानिमित्त नानासाहेब आणि विजयाताईंच्या सहजीवनाचे शब्दचित्र.
--------------------------------------------
वक्‍तादशसहस्त्रेषु राम शेवाळकर यांनी आयुष्यभर सरस्वतीची आराधना केली. अखंड वाचन, मनन, चिंतन, लेखन आणि वक्‍तृत्व या माध्यमातून त्यांनी ज्ञानयज्ञ तेजाळत ठेवला आणि त्यांना सतत सावलीसारखी सोबत करणाऱ्या विजया शेवाळकरांनी त्यांचा संसारयज्ञ सुखेनैव सांभाळला. या दोघांच्या सुखी संसाराचा गाभा होता समाधान.
---------------------------------------
ज्ञानपथाचे यात्रिक प्राचार्य राम शेवाळकर आणि संसाराची असोशी असलेल्या विजयाताई ही दोन्ही वेगळ्याच मुशीत घडलेली माणसे. १९५७ पासून दोघांची साथ. एकमेकांना पूरक असलेली. ज्ञानगंगेत सदैव डुंबणाऱ्या नानासाहेबांपर्यंत विजयाताईंनी संसाराची उणीदुणी कधी पोहोचू दिली नाहीत. उपलब्ध साधनसामग्रीत आनंदाने आणि समाधानाने त्यांनी नानासाहेबांचे विस्तीर्ण कुटुंब विनातक्रार सांभाळले. कारण समाधान ही सुखी संसाराची गुरुकिल्ली असते, यावर विजयाताईंचा पुरेपूर विश्‍वास आहे.
नानासाहेब आणि विजयाताई यांचा त्याकाळी प्रेमविवाह. लग्न झाले तेव्हा नानासाहेब नांदेडला एका महाविद्यालयात प्राध्यापक होते. वक्‍तृत्व आणि लेखनाची आवड शालेय जीवनापासूनच होती. शाळा-महाविद्यालयांतील हस्तलिखितांचे संपादन, वक्‍तृत्व स्पर्धांमध्ये सहभाग असे उपक्रम सुरूच होते. नांदेड मुक्‍कामी बहि:शाल व्याख्यानमालेच्या निमित्ताने वक्‍तृत्वाला अधिकाधिक पैलू पडत गेले. नरहर कुरुंदकरांची तिथे भेट झाली आणि लेखन-वक्‍तृत्व बहरत गेले. आठवड्यातील पाच दिवस प्राध्यापकी आणि शनिवार-रविवार दोन दिवस व्याख्याने असा परिपाठच सुरू झाला. विजयाताई म्हणतात, मी त्यांना कधीही व्याख्यानाची तयारी करताना पाहिले नाही. वाचन मात्र अखंड सुरूच असायचे. नानासाहेबांना प्रवासात सतत पुस्तके लागत. वाचन हाच त्यांचा ध्यास होता आणि वाचन हाच त्यांचा विरंगुळा होता.
नानासाहेबांना बुद्धिमत्तेची देवदत्त देणगी लाभली होती. एकदा वाचले की, त्यांना परत तो संदर्भ कधी बघावा लागत नसे. ओघवती वाणी हा त्यांच्या घराण्याचा वारसा होता. त्यांचे आजोबा प्रवचनकार होते. वडील कीर्तनकार होते. सरस्वती जणू त्यांच्या वाणीवर वास करीत होती. ते बोलायला लागले की लोक मंत्रमुग्ध होत. त्यांच्या ज्ञानाराधनेच्या आड मी कधीही आले नाही. त्यांना पूरक ठरेल, असेच आचरण मी कायम ठेवले, असेही विजयाताई सांगतात.
पुढे नानासाहेब वणीला प्राचार्य म्हणून रुजू झाले. तोपर्यंत वक्‍ता आणि लेखक म्हणून ते सुप्रसिद्ध झाले होते. माणसांची असोशी हा नानासाहेब आणि विजयाताई या दोघांच्याही स्वभावातील समान धागा. त्यामुळे कुटुंब विस्तारत गेले. वणीचे शेवाळकरांचे घर सतत माणसांनी भरलेले. साहित्यिक, सांस्कृतिक गप्पा आणि जोडीला विजयाताईंनी निगुतीने रांधलेला स्वयंपाक. सरस्वती आणि अन्नपूर्णा जणू एकत्र नांदत होत्या. ग. दि. माडगूळकर, पु. भा. भावे, सेतू माधवराव पगडी, बाबा आमटे अशी अनेक मंडळी वणीच्या घरी येत, हक्‍काने राहत. समानधर्मी माणसे अनायासेच जुळत जातात. सरस्वतीचे उपासक असलेल्या नानासाहेबांवर अनेक विद्वज्जनांनी अकृत्रिम प्रेम केले आणि त्या सगळ्यांनी विजयाताईंनाही आपले मानले.
‘अमृताचा घनु’ या ज्ञानेश्‍वरीवरील निरुपणाच्या कार्यक्रमामुळे मंगेशकर आणि शेवाळकर कुटुंबीयांचे असेच ऋणानुबंध जुळले. ते आजही तेवढेच घट्ट आहेत. नानासाहेबांच्या पंचाहत्तरीला लतादीदी आणि पं. हृदयनाथ मंगेशकरांनी हजेरी लावली हा कृतकृत्यतेचा क्षण होता, असे विजयाताई सांगतात. नानासाहेबांना अनेक मानसन्मान आणि पुरस्कार लाभले; मात्र पणजी येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी त्यांची झालेली बिनविरोध निवड हा आमच्या आयुष्यातील अपूर्व आनंदाचा क्षण होता. कारण लेखक आणि वक्‍ते म्हणून मोठे असलेले नानासाहेब माणूस म्हणूनही अजातशत्रू आहेत आणि त्यांच्या चाहत्यांचे त्यांच्यावर अपार प्रेम आहे, हे त्या घटनेने सिद्ध केले. केवळ भारतातच नव्हे तर अमेरिकेतही नानासाहेबांच्या वक्‍तृत्वाचे आणि लेखनाचे चाहते आहेत. अमेरिकेतही दीड महिना नानासाहेबांची व्याख्याने आयोजित करण्यात आली होती.
नानासाहेबांना लोकांचे इतके अपार प्रेम मिळाले कारण मी कुणी वेगळा आहे, मला काही विशेष महत्त्व दिले पाहिजे, असे त्यांच्या वागण्यातून कधीही जाणवले नाही. घरातसुद्धा ते वाचत किंवा लिहीत असताना कुठलीही पाबंदी नसायची. कुणी भेटायला आले तर त्यांनी कधीही त्यांना नकार दिला नाही. कितीही नवोदित साहित्यिकाने पुस्तकाला प्रस्तावना मागितली तरी त्यांनी कधीही नकार दिला नाही. माणसांचे अलोट प्रेम हेच नानासाहेब आणि विजयाताईंनी आपले वैभव मानले. विजयाताई सांगतात, समाधानाने आणि आनंदाने आमचे सहजीवन काठोकाठ भरले होते. अनेक चांगले सिनेमे, नाटके, गाण्यांचे, व्याख्यानांचे कार्यक्रम आम्ही एकत्र ऐकले, पाहिले. आयुष्यभर आनंद मिळवला आणि वाटलाही. नानासाहेब गेल्यानंतरही नॉर्थ अंबाझरी रोडवरील शेवाळकरांच्या घरी माणसांचा जमावडा असतो. मोठ्यांपासून सामान्यांपर्यंत सगळे इथे येतात, आपल्या वाट्याचा आनंद ओंजळी भरभरून घेतात आणि समाधानाने परततात.
वाग्यज्ञाची सावली असलेल्या विजयाताईंनी आनंदाचे दान देण्याचा वसा आजही कायम ठेवला आहे.
-------------------------
स्वाती हुद्दार
 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह