चांदणझुलादूरवर समुद्राची गाज गुंजत होती. चांदण्यांच्या दुधेरी प्रकाशात चंदेरी वाळू चमकत होती. नि:शब्द किनाऱ्याला अलवार लाटा चाटून जात होत्या. रामेश्वरमचा समुद्र मुळातच शांत. आततायीपणा त्याच्या स्वभावातच नाही. मंदीरातील घंटांचा मधुर ध्वनी आणि मशिदीतील अजानचे स्वर साऱ्या वातावरणात भरून राहिले होते. एकमेकांमध्ये हरवलेले ते दोन जीव ओलसर वाळूत पावलं उमटवित चालत होते. तो पुढे, ती त्याची अनुगामिनी. त्याच्या उमटलेल्या रेखीव पावलांवर स्वत:चं पाऊल ठेवताना तिची नाजुक धावपळ होत होती. प्रत्येक हेलकाव्याबरोबर होणारी तिची नुपुरांची नाजुक किणकिण शांत वातावरणात एक लाडिक नाद उत्पन्न करीत होती.चालता चालता तो एक क्षण थांबला. तिच्याकडे वळून म्हणाला, बघ तुझ माझ्यावरचं प्रेम या चांदण्याच्या रुपात कसं आकाशभर पसरलं आहे. तिनं आकाशात पाहिलं. शुक्राची चांदणी तिच्याकडे पाहून खुदकन हसली. ती लाजून चूर झाली. तिच्या आरक्त गालावरच्या गोड खळीनं हसून दाद दिली. त्यांचं मुग्ध प्रेम बघून समुद्राला भरतं आलं. एक थंड लाट तिच्या आलत्यानं रंगलेल्या पावलांना हळूच स्पर्शून गेली. पायाखालच्या वाळूनं तिच्या तळव्यांना गुदगुल्या केल्या. त्यानं मागे वळून बघितलं. वाळूत उमटलेली त्यांची पावलं त्या लाटेबरोबर विरली होती. पण तो होता रांगडा गडी. त्यानं आपला कणखर हात तिच्यासमोर केला. तिनं काकणभरल्या हातानं तो घट्ट धरला. त्याच्या डोळ्यात प्रचंड आत्मविश्वास होता आणि तिच्या डोळ्यात त्याच्यावरच्या विश्वासाचं चांदण. पुन्हा एकदा त्यानं ओल्या वाळूवर पाऊल रेखलं. तिनं त्याचं अनुकरण केलं. ओल्या वाळूत पावलं उमटत होती. त्यांना पक्क माहित होतं. पुन्हा एकदा लाट येईल, हे ठसे पुसले जातील. पण म्हणून चालणं थांबवायचं नसतं. लाटांना घाबरायचं नसतं. फक्त साथ सच्ची हवी. हात हातातून सुटायला नको. नाहीतर साथ संपायला एक लाटही पुरेशी असते. पण त्यांना तर क्षितीज गाठायचं आहे. समोर आहे विस्तीर्ण क्षितीज आणि मागे ठेवायची आहे पाऊलवाट येणाऱ्या असंख्य ध्येयवेड्यांसाठी. उत्तररात्र सरत होती. शुक्राची चांदणी अधिक तेजस्वी दिसत होती. म्हणजे लवकरच रात्र सरून उष:प्रभा येणार होती. ती थबकली. त्याच्या विशाल खांद्यावर तिनं थकून मान टेकली. तो हसून म्हणाला, इतक्यात थांबून कसं चालेल? त्यानं स्वर्णिम झालेल्या आकाशाकडे बोट दाखवलं. दूरवर पसरलेल्या समुद्राआडून सूर्यकिरणं वर येत होती. चांदणं धुसर होत होतं. तिच्या मात्र मनभर चांदणं फुललं होतं. तृप्तीचं समाधानाचं. आणि ती त्या चांदणझुल्यावर त्याच्या साथीनं झुलत होती. ती हळूच म्हणाली, तो बघ! तुझ्या माझ्या स्वप्नांचा सूर्य! म्हणजे मार्ग योग्य होता, अखेर ध्येय गाठलं. स्वाती हुद्दार | |||