वेड्याचे घरऑफिसला जाताना त्या झाडाखाली रोज एक वेडा भेटतो. अगदी तिथेच. कधी हातवारे करतो, कधी येणाऱ्या-जाणाऱ्यांना शिव्या देतो. कधी नुसताच शुन्यात बघत बसतो. माझी खूप घाईची वेळ असते. जवळपास रोजच उशीर झालेला असतो. तरीही नजर हटकून त्याच्याकडे जातेच. ठरवूनही दूर्लक्ष करता येत नाही. इतर येणारे-जाणारे बघितले. त्यांच्या लेखी तो नसतोच. मी मात्र...45 डिग्री तापमान. त्या झाडाखाली तो. जीवाची काहिली करणाऱ्या उन्हात कसा राहात असेल? समोर उच्चभ्रू वस्ती. याच्या खाण्यापिण्याचं काय? मनात प्रश्नांचं काहूर. एखाद्या दिवशी दिसला नाही तर उगाच चुकल्यासारख वाटतं. त्या दिवशी नजरानजर झाली. अंगावर शहारा आला. काय होतं त्याच्या डोळ्यात? एक भकास, उद्विग्न् नजर! दिवसभर मन त्याच्याभोवती फिरत होतं. का वेडा झाला असेल हा? घर असेल का त्याला? घरी कोण कोण असेल? वेडाच्या भरात न सांगता निधुन आला असेल का? अजुनही त्याच्या वाटेकडे डोळे लाऊन बसलं असेल का? की मुद्दामच घालवून दिलं असेल त्याला घराबाहेर? त्या अनोळखी , अपरिचित वेड्याच्या माहिती नसलेल्या घरापाशी माझं मन घुटमळत राहतं. स्वाती हुद्दार | |||