संध्यारंगसंध्यारंगांनी आकाश आरक्त झालं होतं. एरवी निळसर भासणारं आकाश संध्यारंगरत किती सुंदर भासत होतं. कृष्णप्रेमात लाजून लाल झालेल्या राधेसारखं. सूर्य हळूहळू डोंगराआड दडत होता. काळोखानंतरच्या नव्या पहाटेचं आश्वासन देऊन. दूरवर पसरलेल्या डोंगररांगांवरची हिरवी सृश्टी सुद्धा अधकि गडद झाली होती. हरिभक्तीत तन्मय झाल्यासारखी. स्वत्व विसरून हरवल्यासारखी. शांत निश्चल ध्यानमग्न तो डोंगर. स्थितप्रज्ञ साधुसारखा अविचल. पक्ष्यांच्या किलबिलाटानं आसमंत भरून गेलेला. अंधारायच्या आत त्यांना आपापली घरटी गाठायची होती. घरट्यात त्यांची पिलं. त्यांच्या वाटेकडे आस लावून बसलेली. चोचीतले घास पिलांच्या मुखात भरवण्यासाठी त्या पक्षांचा जीव व्याकुळलेला. पाखरांनासुद्धा असतेच ना प्रेम आणि माया. डोंगराजवळून वाहणारी नदी संथपणे मार्गक्रमण करीत होती. प्रवाहाचा शांत, गंभीर नाद कानांना सुखावत होता. गवयाने संधिकालचा मारवा आळवावा तसा. नदीचा प्रवाह अविरत मार्गक्रमण करीत होता. पुढे काय आहे याचा विचार न करता, मागे कुणासाठीही न थांबता, कुठल्याही पाशात न अडकता, न गुरफटता पुढे पुढे जाणे हाच आपला धर्म आहे, एवढंच त्या नदीला माहित. एवढी कसली ओढ त्या नदीला लागली होती, की षडरिपुही तिला अडवू शकत नव्हते. केवळ एकच ध्यास. त्या निश्चित ध्येयाला पोहचण्याचा. परमतत्वात विलीन होण्याचा. नदीकाठच्या वाळूत कोणीतरी लुटुपुअुचे घर उभारले होते. धर बांधणारा मात्र तिथून निधुन गेला होता. ते घरही किती काळ उभे राहणार होते? कुणाच्या तरी धक्क्याने, साध्या वाऱ्याच्या झोताने सुद्धा त्याचे अस्तित्व संपणार होते. ते घर उभारणाऱ्याला हे माहिती असेल का? ते वाळूचे घर उभारणाऱ्या चिमुकल्या हातांनी काही क्षण का होईना, आपल्या स्वप्नांना तिथे वसवले असेलच ना? स्वप्नेच ती विरून जाणारच. पाण्यातल्या बुडबुड्यासारखी. हळूहळू काळोख गडद झाला. आकाश चांदण्यांनी भरून गेले. नक्षत्रांच्या प्रकाशात धरती न्हाऊन निघाली. त्या चांदण्या आपल्यातले तेज सृष्टीच्या चराचरात मिसळू लागल्या. फुलांना रंग दिले. गंध दिले. दूरस्थ नक्षत्रांवरही असेल का अशीच सृश्टी. त्यांनाही असतील का आपल्याच सारख्या भावभावना. या चांदण्या म्हणजे जणू चंद्ररुपी कृष्णाच्या सख्या. गोपिकाच जणू. कृष्णप्रेमात वेड्या झालेल्या आकाशात रंगली होती रासक्रीडा. कृष्णाच्या बासरीच्या स्वरांनी बेधुंद होऊन त्या रंगल्या होत्या रासक्रीडेत. सगळी सृष्टी धुंद होऊन तो भक्तीसोहळा अनुभवत होती. नि:शब्दपणे. दूरवर देवीच्या मंदीरात घंटानाद ऐकू येत होता. संध्याकाळच्या आरतीचे घनगंभीर स्वर कानावर येत होते. वातावरण भक्तीमय झालं होतं.क्लेशापासून सोडवी दु:खापासून सोडवी तोडी भवपाशा रात्र चढत होती. सृष्टीचा कण न कण पुलकित झाला होता. माझे मी पण ह त्यात सामावले गले. परमेश्वराचे अस्तित्व चराचरात भरून राहिल्याच्या खुणा सर्वत्र विखुरल्या होत्या. स्वाती हुद्दार | |||