म्हारो प्रणाम...शब्दांकन : स्वाती हुद्दारतंत्रामध्ये अडकलेली गायकी भावपूर्ण करीत गेली सहा दशकं श्रोत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा सच्चा सूर परमतत्त्वाला मिळाला असला, तरी त्यांनी आळवलेला सहेला रे, श्याम सुंदर राजसा, अवघा रंग एक झाला, पडले दूर देशी, अवघा तो शकुन, निर्गुणी भजन असं सुरेल संचित मागे रेंगाळतंय आणि त्याचबरोबर त्यांच्या अनेक आठवणीही. त्यांच्या अशा आठवणींना उजाळा दिलाय सप्तकचे विलास मानेकर, उदय पाटणकर, डॉ. उदय गुप्ते, डॉ. श्रीराम काणे आणि नितीन सहस्रबुद्धे यांनी.कलेला देश-प्रदेशांच्या भिंती नसतातच मुळी. सच्चे कलावंत आणि सच्चे कलारसिक या सगळ्यांच्या पलीकडे असतात. साहित्यिकाच्या शब्दांमधील भाव असोत, चित्रकाराच्या कुंचल्यातून चितारलेल्या अर्थपूर्ण रेषा असोत की गायकाच्या साधनेतून तप:पुत होऊन आलेले स्वर असोत, सच्चे रसिक त्या कलाविष्कारात देहभान विसरून चिंब न्हाऊन निघत असतात.साधारण 1980 चा काळ. संगीतावर प्रेम करणाऱ्या उच्च शिक्षित तरुणांनी नागपूरकर रसिकांना संगीताची मेजवानी देण्याचे ठरवले आणि सप्तकची स्थापना झाली. सप्तकच्या माध्यमातून मोठमोठ्या कलावंतांच्या मैफिली नागपुरात सुरू झाल्या. परवीन सुलतानासारख्या दिग्गज कलावंतांनी इथे हजेरी लावली. या संगीतवेड्यांच्या मनात किशोरी आमोणकरांना नागपुरात आणण्याचा विचार आला. त्याआधीही किशोरीताई नागपुरात गायल्या होत्या. मात्र, या मंचावर किशोरीताईंना आमंत्रित करण्याचे ठरवून ही मंडळी कामाला लागली. किशोरीताईंची भेट घेऊन त्यांना विनंती करण्यात आली आणि त्यांनी अगदी सहज होकार दिला. सप्तकच्या माध्यमातून किशोरीताईंची मैफल रंगली. सरस्वती विद्यालयाच्या प्रांगणातली जाणकार दर्दी गर्दी. गडद होत चाललेली रात्र आणि किशोरीताईंच्या दैवी स्वरातून उमलत चाललेला यमन. त्यानंतर भावपूर्ण बंदिशीने नटलेला बागेश्री ताई गायल्या आणि नागपूरकर रसिकांच्या कानाचे पारणे फिटले. याच मैफिलीत त्या "कोई कछु कहे मन लागा' हे भजन गायल्या होत्या. या वेळी तानपुऱ्यावर त्यांच्या मागे होत्या अश्विनी भिडे यांच्या मातोश्री माणिक भिडे, संवादिनीवर होते बबनराव आठ्यले आणि तबल्यावर होते गोपाळराव वाडेगावकर. किशोरीताईंचे गाणे आणि आप्पां वाडेगावकरांचा तबला म्हणजे मणिकांचन योग होता. 1980 ते 1993 सप्तकने किशोरीताईंचे सहा कार्यक्रम नागपुरात घडवून आणले. या काळात सप्तकशी आणि नागपूरशी ताईंचे अतूट असे बंध जुळले ते कायमचेच. मैफल सुरू होण्यापूर्वी मात्र किशोरीताई खूप गंभीर असत. या काळात त्यांना खूप सांभाळावे लागे. सगळी वाद्यं सुरात लागेपर्यंत त्यांचं गाणं सुरू होत नसे. तानपुरे आणि स्वरमंडळ यांचा मेळ जमला की, त्या गायला सुरुवात करीत. आणि एकदा का स्वरसाधना सुरू झाली की, किशोरीताई आणि रसिकही अलौकिक विश्वात संचार करीत असत. कारण, किशोरीताईंसाठी गायन ही केवळ एक मैफल नसायची, तर तो अमूर्ताशी संवाद असायचा. परमेश्वराची आराधना असायची. उच्च कोटीचा आध्यात्मिक अनुभव देणारा तो क्षण असायचा. म्हणूनच त्यांच्यासह रसिकही परमोच्च आनंदाचा अनुभव घेत असत. पुढे तर सप्तकच्या मंडळींशी ताईंचे सूर इतके जुळले की, त्या आजच्या मैफलीत काय गाऊ, असे या मंडळींना विचारायच्या. असेच एकदा कोणीतरी पुरीया धनाश्रीची फर्माइश केली; मात्र ताईंनी नम्रपणे त्यास नकार दिला. पण, त्या मैफलीत त्या अविस्मरणीय असा मारवा गायल्या आणि आयोजकांना आणि श्रोत्यांनाही त्यांनी तृप्त केले. सप्तकचे डॉ. श्रीराम काणे यांना तर पुढे किशोरीताईंकडे सतार शिकण्याचे भाग्य लाभले. एवढेच नव्हे, तर म्हारो प्रणामच्या प्रॅक्टिसदरम्यान डॉ. काणेंनी त्यांना सतारीवर साथही केली आहे. गुरू म्हणून किशोरीताई अत्यंत प्रेमळ होत्या, असे डॉ. काणे सांगतात. किशोरीताईंचे नागपुरी साड्यांवर निरतिशय प्रेम. कार्यक्रमासाठी त्या इथे आल्या की, साड्यांची खरेदी ठरलेलीच असायची आणि अशा काही क्षणी ताईंचे निराळेच रूप बघायला मिळायचे. एकदा तर कॉटन मार्केटच्या रस्त्याने जाताना भाजीबाजार लागला. बाजारातली ताजी भाजी पाहून ताई इतक्या खूश झाल्या की, त्यांनी गाडी थांबवून खूप भाजी खरेदी केली आणि आपल्या बरोबर विमानातून मुंबईला नेली. एका गानतपस्विनीची ही वेगळी रूपं सप्तकच्या आयोजकांना अनुभवायला मिळाली. किशोरीताई त्यांची आई आणि गुरू मोगूबाई कुर्डीकरांविषयी भरभरून बोलायच्या. पं. भीमसेन जोशी, गंगूबाई हंगल, झाकिर हुसेन आणि अनेक कलावंतांविषयी, त्यांच्या कलेविषयी किशोरीताईंना नितांत आदर होता. सप्तकच्या माध्यमातून किशोरी आमोणकरांच्या नागपुरात झालेल्या सहा मैफली म्हणजे नागपूरच्या इतिहासातील सहा सोनेरी पानेच. हिऱ्यामाणकांची झगमगती दीपमाळच जणू. त्या मैफलींचे सूर कलारसिकांच्या मनात कायम रुंजी घालत राहतील. | |||