Powered by Blogger.

Friday, 19 May 2017

उजळलेली वाट

खूप दूरवर आल्यावर तिच्या लक्षात आलं की आपण अनोख्या प्रदेशात आलो आहोत. पण कसं काय? वाट चुकली. भोवतालचा हिरवागार परिसर कधीच मागे पडला. आजुबाजुला आहे केवळ बोरीबाभळीचं काटेरी विराण बन. ते डेरेदार आम्रवृक्ष कुठे गेले? तिच्या डोळ्यात अपार कारुण्य दाटलं. घशाला कोरड पडली. हळूहळू सूर्य मावळतीकडे झुकू लागला, म्हणजे काही क्षणातच अंधारून येणार! तिला तो आठवला. तो नेहमी म्हणायचा. नवख्या वाटेनं कधीही जाऊ नये. रस्ता चुकलीस तर... ती हसून म्हणायची, तू येशील ना, मला शोधत. तो डोंगरापलिकडचा सूर्य मला नेहमी खुणावतो, वाटतं एकदा तरी त्या उगवत्या आरक्‍त सूर्यबिंबाला गळामिठी मारावी. क्षितीजापार जाऊन तिथला प्रदेश न्याहाळावा. तो म्हणायचा. जाताना तुझ्या पाऊलखुणा तरी मागे ठेव, माग घेणं सोपं जाईल.
आज तिनं धाडस केलंचं. पक्ष्यांच्या किलबिलाटानं तिला जाग आली. झुंजुमुंजु झालं होतं. पूर्व दिशा आरक्‍त झाली होती. तिचं लाडकं सूर्यबिंब डौलानं वर येत होतं. ती त्या दिशेनं निघाली. सुरुवातीचा चालीचा वेग मंदावला, पण ओढ कायम होती. भर माध्यान्हीला ती डोंगरमाथ्यावर आली. कुतुहलानं आजुबाजुला न्याहाळू लागली. सूर्यबिंब तर खूप दूर होतं. ती आणखी पूर्वेकडे निघाली. उतरंडीला लागली. खळकन पायाखालचा दग निसटला. तिचा तोल जाताजाता राहिला. पाय घसरला असता तर? तिला तो आठवला. तिच्या पावलात काटा जरी रुतला तरी वेदना त्याच्या चेहऱ्यावर उमटायची. तो हळवा व्हायचा. त्याच्या आठवणीनं तिच्या मुखावर मंद स्मित फुललं. आता मात्र ती प्रत्येक पाऊल सावकाश टाकू लागली. डोंगरापल्याडचा प्रदेश पाहण्याची उर्मी मात्र कायम होती. ती पुढे पुढे जात होती. एका निराळ्याच धुंदीत. पावलं थकली होती. मन मात्र मानत नव्हतं. माध्यान्हीचा सूर्य पश्‍चिमेला झुकला होता. तिच्यापासून खूप दूर गेला होता. तिनं आकाशात पाहिलं. तिच्या लक्षात आलं की ती हे अंतर कधीही पार करू शकणार नाही. कसली वेडी ओढ आपल्याला इतक्‍या दूर घेऊन आली? तिच्या टपोऱ्या डोळ्यात अश्रुंनी गर्दी केली. ज्याच्यासाठी ती उर फुटेस्तोवर धावली होती, तो सूर्य तर तिच्याकडे पाठ फिरवून निघाला होता. तिनं आजुबाजुला पाहिलं. समृद्धीच्या जिवंतपणाच्या कुठल्याही खुणा आसपास नव्हत्या. सगळीकडे रुक्ष प्रदेश हळूहळू अंधार दाटून आला. भेदरलेली ती अंग चोरून उभी होती. परतीची वाट दिसेनाशी झाली होती. तेवढ्यात एक चिरपरिचित सुगंध वातावरणात पसरला. तिनं नेणीवेनं जाणलं. की तिचा माग घेत तिचा कस्तुरीमृग येतो आहे. तो आला. तिच्या नयनात पश्‍चात्तापाचे अश्रु उभे राहिले. त्यानं काही न बोलता तिला मागे येण्याची खुण केली. आकाश चांदण्यांनी भरलं होतं. चंद्रप्रकाशात वाट उजळली होती. तचं मनही उजळलं होतं. त्याच्यावरच्या प्रेमानं, आदरानं.

स्वाती हुद्दार


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह