Powered by Blogger.

Wednesday, 25 December 2019

नोंदी 2019 च्या

स्वाती हुद्दार

कालचक्र अव्याहत सुरूच असते. वर्षे येतात आणि जातात. मात्र, जाताना आपल्या उदरात अनेक घटना साठवून जातात. त्या घटनांच्या नोंदी त्या-त्या वर्षावर कोरल्या जातात. काही सुखद आणि काही दु:खदही. पुढे याच घटना इतिहास म्हणवल्या जातात. 2019 हे वर्षही आता मावळते आहे. या वर्षानेही अनेक घटना पाहिल्या. समुद्रावर उठलेल्या लाटांसारख्या त्यातल्या काही कालौघात मिटून जातील, काहींची नोंद घेणे मात्र इतिहासाला भाग पडेल.
2019 या वर्षावर महिलांनीही आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे. त्याचीच ही बखर...
*मिस युनिव्हर्स ही सौंदर्य स्पर्धा अमेरिकेतल्या मिस युनिव्हर्स ऑर्गनायझेशनने 1967 मध्ये म्हणजे 57 वर्षांपूर्वी सुरू केली. या सौंदर्य स्पर्धेत 190 पेक्षा अधिक देश सहभागी होतात. यंदा झोझिबिनी टुंझी या साउथ आफ्रिकेच्या सौंदर्यवतीने मिस युनिव्हर्सचा खिताब पटकावला आहे. सौंदर्याबरोबरच बुद्धिमत्तेचाही या स्पर्धेमध्ये कस लागतो. सौंदर्याचे मापदंड बदलताहेत, हेच यंदाच्या या सौंदर्यवतीने सिद्ध केले आहे.
* मिस वर्ल्ड ही सौंदर्य स्पर्धा 1951 साली इंग्लंडमध्ये सुरू झाली. यंदा जमायकाच्या टोनी एन सिंगने मिसवर्ल्डचा क्राऊन जिंकला आहे.
*मिस वर्ल्ड आशिया हा 2019 चा पुरस्कार भारताच्या सुमन रावने मिळवला आहे. 21 वर्षांची सुमन राव ही कथ्थक नृत्यांगना आहे.
*रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, साहित्य, शांती, शरीरविज्ञानशास्त्र या शास्त्रांमध्ये अतुलनीय कार्य करणाऱ्या व्यक्‍तीला नोबेल देण्यात येते. 118 वर्षांपूर्वी 1901 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. अल्फ्रेड नोबेल यांनी 1895 मध्ये या पुरस्काराची घोषणा केली. हा त्या त्या क्षेत्रात दिला जाणारा सगळ्यात महत्त्वपूर्ण पुरस्कार मानला जातो. यंदा अर्थशास्त्राचे नोबेल तीन व्यक्‍तींना मिळाले आहे आणि त्यातील एक महिला आहे इस्टर डफलो. पॅरिसमध्ये 25 ऑक्‍टोबर 1972 मध्ये जन्मलेल्या इस्टर सध्या केंब्रिजमधील एमआयटीमध्ये कार्यरत आहेत.
2018 चे साहित्यातील नोबेल 2019 मध्येच घोषित झाले आहे पोलंडच्या ओल्गा टोकरच्युक यांना.
*ऑस्कर म्हणजे सिनेक्षेत्रातला नोबेलच. ऍकेडमी ऑफ मोशन पिक्‍चर आर्ट ऍण्ड सायन्स या संस्थेच्या माध्यमातून प्रदान केला जातो. 1929 साली या पुरस्काराची सुरुवात झाली. यंदा लेडी गागाचे शॅलो हे मुळ गाणे ऑस्करच्या शर्यतीत जिंकले आहे. रेजिना किंगला इफ बिल स्ट्रिट कुड टॉकसाठी बेस्ट सपोर्टिंग ऍक्‍ट्रेसचे ऑस्कर घोषित झाले आहे. ऍक्‍ट्रेस इन लिडिंग रोलचे ऑस्कर द फेवरेटसाठी ऑलिव्हिआ कोलमेनला घोषित झाले आहे.
*राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची सुरुवात 1954 साली झाली. दरवर्षी भारत सरकारने निवडलेल्या समितीच्या माध्यमातून या पुरस्कारांची निवड केली जाते.
आणि भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात.
2019 चा उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार महानती सिनेमासाठी कीर्थी सुरेश यांना प्रदान करण्यात आला.
बधाई हो चित्रपटासाठी उत्कृष्ट सहअभिनेत्रीचा पुरस्कार सुरेखा सिक्रीला घोषित.
नातिचरामी सिनेमातील मायावी मानवे या गाण्यासाठी बिंदू मनी या गायिकेला उत्कृष्ट गायिकेचा पुरस्कार
फिल्म फेअर पुरस्कार हा हिंदी भाषिक चित्रपटांसाठी प्रदान केला जातो. या पुरस्काराची सुरुवात 1954 साली झाली.
यंदाचा उत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्म फेअर पुरस्कार राझी चित्रपटातील भूमिकेसाठी आलिया भटला प्रदान करण्यात आला.
राझीसाठी उत्कृष्ट दिग्दर्शनचा पुरस्कार मेघना गुलजारला मिळाला.
उत्कृष्ट चरित्र अभिनेत्रीचा पुरस्कार बधाई हो चित्रपटासाठी नीना गुप्ता यांना मिळाला.
उत्कृष्ट नवोदित अभिनेत्रीचा पुरस्कार सारा अली खान, उत्कृष्ट पार्श्‍वगायिका श्रेया घोषाल,
लाइफ टाइम अचिव्हमेंट अवॉर्ड श्रीदेवी यांना मरणोत्तर आणि सिनेक्षेत्रात 50 वर्षे अतुलनीय कामगिरीसाठी हेमा मालिनी यांना गौरविण्यात आले.
*साहित्य क्षेत्रातल्या बुकर या मानाच्या पुरस्कारावरही यंदा दोन महिलांनीच नाममुद्रा उमटविली आहे. पहिल्यांदाच बुकर पुरस्कार दोन व्यक्‍तींना विभागून देण्यात आला आहे. द टेस्टमेंटसाठी मार्गारेट ऍटवुड आणि गर्ल वुमन अदर या पुस्तकासाठी बर्नार्डिन एव्हरिस्टो या दोघींना यंदाचा बुकर घोषित झाला आहे.
*साहित्य अकादमी पुरस्कारांची घोषणाही नुकतीच झाली. मराठी भाषेतील कवितेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांच्या कदाचित अजूनही या कवितासंग्रहाला घोषित झाला आहे.
*पद्म पुरस्कार हा भारताचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. विविध क्षेत्रांमध्ये अतुल्य कार्य करणाऱ्या व्यक्‍तींना हा पुरस्कार दरवर्षी प्रदान करण्यात येतो. प्रजासत्ताकदिनाच्या मुहूर्तावर या पुरस्कारांची घोषणा करण्यात येते आणि मार्च-एप्रिलमध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान केले जातात. 2019 मध्ये राष्ट्रपतींनी 112 पद्म पुरस्कारांची घोषणा केली. यंदा 3 भारतरत्न, 4 पद्मविभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले. लोककलेच्या गायिका सुश्री तीजनबाई यांना कलाक्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी पद्मविभूषण पुरस्कार प्राप्त झाला आहे. 14 पद्मभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले असून त्यापैकी पर्वतारोहण क्षेत्रात बछेंद्री पाल या एकमेव महिलेचा समावेश यामध्ये आहे.
राष्ट्रपतींनी 94 पद्मश्री पुरस्कार घोषित केले असून गुजरातच्या ज्योती भट यांना कला क्षेत्रातील योगदानासाठी, मुक्‍ताबेन पंकजकुमार दागली यांना मेडिसीन क्षेत्रासाठी, राजकुमारी देवी यांना शेती क्षेत्रातील योगदानासाठी गोदावरी दत्ता यांना मधुबनी चित्रकलेसाठी,भागीरथी देवी यांना सार्वजनिक जीवनातील कार्यासाठी, हरिका द्रोणावल्ली यांना बुद्धिबळातील कामगिरीसाठी, द्रौपदी घिमिरस यांना सामाजिक कार्यातील योगदानासाठी, स्मिता कोल्हे यांना आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय कार्यासाठी, गीता मेहता यांना साहित्य क्षेत्रासाठी, नर्तकी नटराज यांना नृत्यकलेसाठी, कमला पुजारी यांनी कृषी क्षेत्रातील योगदानासाठी, आर वी रमणी यांना ऑप्थल्मोलॉजी क्षेत्रातील कार्यासाठी, मिलिता साल्विनी यांना कथकली नृत्यप्रकारासाठी, शारदा श्रीनिवासन यांना पुरातत्त्व क्षेत्रातील कार्यासाठी पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
2019 या वर्षावर विविध क्षेत्रांतील जगभरातील महिलांनी आपल्या कर्तृत्वाची मोहोर उमटवली आहे, पण 2020 या नववर्षात महिला कर्तृत्वाचा टक्‍का अधिक वाढता राहावा, या आशेसह...


 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह