Powered by Blogger.

Monday, 22 April 2019

गौराईचं माहेरपण

स्वाती हुद्दार

माहेर या शब्दातच डोळ्यांच्या कडा पाणावण्याची ताकद आहे. विभक्‍त कुटुंब पद्धती, एकेकटे अपत्य, दूरच्या गावातली नोकरी, मुलांची शिक्षणं, नोकरी व्यवसायासाठी परदेशातलं वास्तव्य अशा अनेक कारणांमुळे आजही स्त्रीला माहेर दुरापास्तच आहे. कधीतरी वर्षा दोन वर्षातून लेकी माहेरी येतात आणि माहेरच घर हसतखेळत होतं. रोजच्या व्यापातापातून त्यांनाही हसरे क्षण गवसतात. माहेरच्या मातीतली उर्जा घेऊन पुन्हा त्या आपल्या घरट्यात परततात. नव्या उमेदीनं. मात्र ही उर्जा, ही उमेद मिळविण्यासाठी दोन दिवस तरी माहेरचा मुक्‍काम हवासा असतो, सासर मामलेदाराच असलं आणि माहेर चंद्रमौळी असलं तरीही.

त्यादिवशी अंगणाची शोभा काही औरच होती. जुईच्या मांडवाखाली भुश्‍याचा डोंगर केला होता. त्या डोंगरावर झाडाच्या फांद्या खोचल्या होत्या. अंगणातल्याच गवताने तो डोंगर हिरवागार शाकारला होता. खेळण्यातले छोटेछोटे हत्ती घोडे, चिमण्या पक्षी त्यावर मांडले होते. डोंगराच्या एका बाजुला वाळुचे कडे करून तलाव केला होता. तलावाच्या काठावर सुंदर सुंदर पक्षी विहरत होते. तलावाच्या मध्यभागी पांढऱ्याशुभ्र कांद्याचे कोरीव कमळ ठेवले होते. एका बाजुला भातुकलीतला लुटुुपुटुचा संसार मांडला होता आणि डोंगराच्या पायथ्याशी छोट्याशा शिसवी पाळण्यात गौराईची स्थापना केली होती. मोगऱ्याच्या गजऱ्यांनी गौराईचा पाळणा शाकारला होता. तिच्यासमोर चिवडा, लाडु, करंजा असे जिन्नस मांडले होते. खरबुज कलिंगडाचे कोरीव काप ठेवले होते. खिरापत, कैरीची डाळ आणि कैरीच्या केशर विलायची घातलेल्या पन्ह्याचा प्रसाद होता. वातावरणात अत्तर गुलाबजलाचा सुगंध भरून राहिला होता. आई-आजी नाकात नथ घालून केसांवर मोगऱ्याचे गजरे माळून विशेषच सजल्या होत्या. सडा रांगोळी घातलेल्या अंगणात सतरंजा अंथरल्या होत्या. उतरत्या सांजेला त्या दिवशी आमच्या अंगणात आयाबायांचा जमावडा जमला होता. हास्यकल्लोळात अवघं घर बुडून गेलं होतं. होतं काय असं विशेष त्या दिवशी. आजी म्हणाली अग चैत्रगौर माहेरपणाला आली आहे आपल्याकडे. माझ्या आठवणीतली ती पहिली चैत्रगौर. त्यानंतर उन्हाच्या झळा जाणवू लागल्या की माझं मन आपसुकच त्या माहेरवाशीण गौरीची वाट पाहू लागायचे. तेव्हा त्यातला माहेर हा शब्द काही खूप महत्त्वाचा वाटला नव्हता. मात्र शिसवी पाळण्यात विराजमान झालेल्या त्या गौरीच्या येण्यानं खाण्यापिण्याची चंगळ असते. खणाचं परकरपोलकं घालून मिरवायला मिळतं. खूप मैत्रीणी, काकवा मावश्‍या घरी येतात. एवढंच कळत होतं. या चैत्रगौरीच्या आगमनाची तयारी घरी आठवडाभर आधीपासून चालायची. वय वाढलं तसं आई-आजीबरोबर सजावटीत माझाही सहभाग राहू लागला आणि मन अधिकच उत्कंठेनं चैत्रातल्या गौरीची वाट पाहू लागलं.
गौरीनं माहेरपणाला येण्याचे किती प्रसंग येतात असे वर्षातून. एकदा ती भाद्रपदात तीन दिवसांसाठी येते. संसाराच्या जबाबदाऱ्या सांभाळत नुसतीच धावपळ करत उभ्या उभ्या आलेल्या कर्तव्यदक्ष सासुरवाशीणीसारखी. तेव्हाचा थाटही अगदी बघण्यासारखा. सोळा भाज्या, सोळा चटण्या, गोडधोड, पुरणपोळी आणि बरच काही. चैत्रातला मुक्‍काम मात्र चांगला महिनाभराचा. सासरच्या जबाबदाऱ्या निस्तरून निवांतपणानं माहेरच्या अंगणात विसावायला आल्यासारखी. झोपाळ्यावर झुलणारी गौरी. मोगऱ्याच्या माळा माळलेली गौरी. माहेरचा पाहुणचार घेणारी गौरी. अगदी तुमच्या माझ्यासारखी माहेरवाशीण वाटते. आपलं देवपणही काही काळाकरता विसरून गेल्यासारखी भासते. माहेर असतच असं. देवपणही विसरायला लावणारं. या गौरीची पाठवणी अत्यंत भावुक करणारी. तिच्या कोडकौतुकात मुक्‍कामाचे दिवस कसे सरतात, कळतच नाही. पाठवणी करताना तिला दहीभात आणि मुरड पोळीची शिदोरी दिली जाते. आणि पुन्हा ये ग अशीच मुक्‍कामी असं सांगत पुनरागमनायच म्हणत तिला निरोप दिला जातो, तो क्षण खरच हळवं करतो.
पूर्वी सासरी खूप कष्ट असायचे. छळही व्हायचा. खाण्यापिण्याची आबाळ व्हायची. लग्नही अगदी कमी वयात व्हायची, त्यामुळे माहेरची ओढ असायचीच. माहेरची मायेची माणसं, दोन घास उन उन अन्न, जीवाला थोडा आराम या सगळ्यासाठी माहेर हवं असायचं. माहेरचं महत्त्व सुखदु:खसमेकृत्वा असणाऱ्या संतांनाही मान्य आहे. तुकारामांच्या अभंगात याचे दाखले येतात. दिवाळीच्या मुळा लेकी आसावली किंवा कन्या सासुरासी जाये या अभंगांमधून तुकारामांनी सासुरवाशीण लेकीच्या माहेरच्या ओढीचा दाखला दिला आहे. माहेराचं महत्त्व संतांनाही जाणवावं असं आहे. लोकगीतांनी, जात्यावरच्या ओव्यांनी स्त्रीच्या मनातलं माहेर जपलं आहे. भोंडल्याच्या गाण्यात सासर माहेरच्या वैद्याची केलेली तुलना, सासरच्या नातेवाईकांना दिलेली दुषणं बरीच बोलकी आहेत. एकनाथांच्या भारुडातही नणंदेचं कार्ट किरकिर करत, खरुज होऊ दे त्याला म्हणणाऱ्या सासुरवाशीण स्त्रीच्या भावना व्यक्‍त होतात.
काळ बदलला आहे. छळ करणार सासर आता नाही. विभक्‍त कुटुंब पद्धतीत अनेक ठिकाणी राजाराणीचाच संसार असतो. सासरची माणसंही पूर्वीसारखी खाष्ट नाहीत. स्त्रियाही आता शिकलेल्या नोकरी करणाऱ्या आहेत. माहेरी जाण्यासाठी, सासुबाई मला मुळ आलं आता तरी धाडा ना, अशी सासुबाईंची परवानगी घेण्याची गरजही नाही. तरीही माहेरची ओढ कायम आहे. सासरच्या वाटे कुचुकुचु काटे आता उरले नसले तरी माहेरच्या वाटेवर अजूनही हळदकुंकु दाटलेलं असतचं. माझ्या अंगणात पिंगा घालणाऱ्या वाऱ्यानं माहेरी सुवासाची बरसात करावी, असं आजच्या सुशिक्षित स्त्रीलाही वाटतचं.
माहेर या शब्दातच डोळ्यांच्या कडा पाणावण्याची ताकद आहे. विभक्‍त कुटुंब पद्धती, एकेकटे अपत्य, दूरच्या गावातली नोकरी, मुलांची शिक्षणं, नोकरी व्यवसायासाठी परदेशातलं वास्तव्य अशा अनेक कारणांमुळे आजही स्त्रीला माहेर दुरापास्तच आहे. कधीतरी वर्षा दोन वर्षातून लेकी माहेरी येतात आणि माहेरच घर हसतखेळत होतं. रोजच्या व्यापातापातून त्यांनाही हसरे क्षण गवसतात. माहेरच्या मातीतली उर्जा घेऊन पुन्हा त्या आपल्या घरट्यात परततात. नव्या उमेदीनं. मात्र ही उर्जा, ही उमेद मिळविण्यासाठी दोन दिवस तरी माहेरचा मुक्‍काम हवासा असतो, सासर मामलेदाराच असलं आणि माहेर चंद्रमौळी असलं तरीही. अनेक कारणांनी माहेराला पारख्या झालेल्या स्त्रियांसाठी अलिकडे अनेक संस्था एक दिवस माहेरचा अशा उपक्रमांचं आयोजन करतात. त्या दिवशी सगळ्या सख्यांची माहेरी ठेवावी, तशी बडदास्त ठेवली जाते. त्यांना साडीचोळीचा अहेर केला जातो. असं औटघटकेचं लटकं माहेर या माहेरासाठी आसुसलेल्या सख्यांच्या मनावर हळुवार फुंकर घालत.माहेर मायेच्या माणसांमुळे तर असतंच पण काळाच्या ओघात दृष्ट लागल्यासारखी ती मायेची माणसं गेली तरी माहेरच्या घराच्या विटांच्या भिंती, माहेरचं अंगण, माहेरचं गाव मायेची पखरण करीतच असतात.
सासरी सगळी सुखं पायाशी लोळण घेत असताना स्त्रीच्या मनातली माहेरची ओढ कधीच कमी होत नाही, तरीही ती सासरी कां नांदते, याचं हळवं उत्तर सरस्वतीची लेक बहिणाबाई चौधरींच्या कवितेत दिसतं, त्या म्हणतात, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते! पुढे बहिणाबाई सांगतात,
देव कुठे देव कुठे भरीसनी जो उरला
अरे उरीसनी माझ्या माहेरात सामावला असं देवपण सामावलेलं माहेर स्वर्गापेक्षाही अधिक सुखदायी असतं.
देवालाही दुर्लभ असलेलं माहेरचं प्रेम आणि पंचपक्‍वानांपेक्षाही चविष्ट असलेला माहेरचा दहीभात सगळ्यांना उदंड लाभो आणि चैत्रातल्या गौरीसारखंच माहेरपणाचं सौख्य सगळ्या सख्यांच्या वाट्याला येवो, बस इतकंच, एवढंच.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह