Powered by Blogger.

Friday, 18 January 2019

लढाई अस्मितेची!
किती खरी किती खोटी
स्वाती हुद्दार

दिवस, महिने, वर्ष हे आपल्या ठरावीक गतीने पुढे सरकतातच. काळ सततच प्रवाहित असतो. माणूस त्या काळाच्या गतीशी जुळवून घेतो किंवा नाही, यावरच त्याची प्रगती किंवा अधोगती अवलंबून असते. नव्या वर्षाच्या कॅलेंडरमधले पंधरा दिवस उलटलेही. या नव्याच्या नऊ दिवसात महिलांसंबंधातील काही घटना घडल्या. त्या घटना आमच्या सुसंस्कृततेवर, पुरोगामित्वावर, प्रतिगामित्वावर भाष्य करण्यास पुरेशा आहेत. आपण सात आंधळे आणि हत्तींची गोष्ट ऐकली आहे. प्रत्येक आंधळ्यानं त्याला जाणवलं तसं हत्तीचं वर्णन केलं, त्याच्या दृष्टीनं हत्तीचं तेच रुप होतं. तसंच या महिलांसंबंधातील घटनांचा अन्वयार्थ प्रत्येक व्यक्‍ती त्याच्या दृष्टिकोनातून लावेल. या घटनांना अनेक आयाम आहेत. कॅलिडोस्कोपसारखे. तरीही काही मुलभूत प्रश्‍न उरतातच आणि नव्या वर्षाच्या, नव्या काळाच्या पार्श्‍वभूमीवर ते अधिकच विचारगर्भ ठरावेत.
प्रत्येक समाजात काही मिथक असतात. अगदी पाश्‍चिमात्य देशही याला अपवाद नाहीत. त्या परंपरांना काही धार्मिक, सामाजिक आयाम असतात. ते पिढ्यानुपिढ्या जपली जातात. काळाबरोबर पुढे सरकतात. ती काळाच्या कसोटीवर तावून सुलाखून बघितली जात नाहीत, कारण परंपरा जोपासणं हा समाजाचा स्वभाव असतो. अशीच परंपरा महाराष्ट्रातल्या शनीशिंगणापूरला होती. महिलांनी शनी मंदिरात प्रवेश करू नये, ही ती परंपरा. अलिकडेपर्यंत कोणालाही त्यात काही गैर वाटले नाही. मात्र दोन वर्षापूर्वी तृप्ती देसाईंच्या भूमाता ब्रिगेडनं त्याविरुद्ध एल्गार पुकारला आणि त्यांच्यासह अनेक महिलांनी मंदिरात प्रवेश केला. परंपरावाद्यांनी त्यावेळी टोकाचा विरोध केला. मात्र तृप्ती देसाई आणि टीम मंदिर प्रवेशात यशस्वी झाली. महिलांनी मंदिरात प्रवेश केला म्हणून भूकंप आला नाही, वादळ झाले नाही, दुष्काळ पडला नाही आणि पुरही आला नाही. महिलांचा हा प्रतिकात्मक विजय होता. चुकीच्या किंवा अन्याय्य परंपरांविरुद्ध वाचा फोडण्यासाठी एखादा सत्याग्रह पुरेसा असतो, जसा डॉ. आंबेडकरांनी केलेला महाडचा सत्याग्रह किंवा काळाराम मंदिर प्रवेशासाठीचे आंदोलन, महात्मा गांधींनी केलेला मीठाचा सत्याग्रह. महिलांचा हा शनी शिंगणापुरचा विजय प्रतिकात्मक होता. स्त्री-पुरूष समानतेला अधोरेखीत करणारा होता. मात्र त्यानंतर मंदिर प्रवेशाचं लोणचं आलं. कोल्हापुरची महालक्ष्मी, नाशिकचे त्र्यंबकेश्‍वर, हाजीअली, शबरीमला आणि आता तुळजापूर.
शबरीमलाचे रण पेटलेलेच आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही परंपरावादी मागे हटायला तयार नाहीत. निष्पाप बळी जात आहेत आणि त्याचवेळी 50 वर्षाखालील दोन महिलांनी मध्यरात्री शबरीमला मंदिरात प्रवेश करून अयप्पांची पुजा केल्याचा दावा केला आहे. त्याचवेळी तुळजापुरच्या भवानीच्या गर्भगृहात काही महिलांनी मध्यरात्री प्रवेश केला आणि भवानीच्या चरणांना स्पर्श केल्याचा दावा केला आहे. मंदिराच्या भोपे परिवारातील महिलांशिवाय इतर कोणत्याही महिलांना भवानीचे चरणस्पर्श करण्याचा अधिकार नाही, याविरुद्ध अनेक वर्षांपासून संघर्ष सुरू होता. शेवटी गेल्या आठवड्यात काही महिलांना यात यश मिळाले.
महिला एकामागोमाग मंदिरे पादाक्रांत करीत आहेत. रुढीवाद्यांपुढे महिलांचा हा निश्‍चितच विजय आहे, मात्र या मंदिर प्रवेशामुळे महिला वर्गाचे समस्त प्रश्‍न मार्गी लागले आहेत, असं समजायचं का? मंदिर प्रवेश हा स्त्री-पुरूष समानतेचा एकमेव निकष आहे, अशा थाटात ही आंदोलनं सुरू आहेत.
मंदिर प्रवेशाचं हे रण माजलं असतानाच साहित्य-संस्कृतीचं माहेरघर असलेल्या पुण्यात कंजारभाट समाजाच्या एका उच्चशिक्षित नववधुला कौमार्य चाचणीला नुकतंच सामोर जावं लागलं. जातपंचायतीच्या दबावाला बळी पडून आपल्या नवविवाहित पत्नीला ही चाचणी द्यायला भाग पाडणारा तिचा नवरा लंडनमध्ये शिकला आहे. तिचे सासरे माजी नगरसेवक आहेत आणि खुद्द तिचे वडील निवृत्त पोलिस अधिकारी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही नववधुही उच्चशिक्षित आहे. तरीही तिनं या गोष्टीला विरोध केला नाही. मंदिर प्रवेश लढाईच्या वेळी उफाळून आलेला आमचा आत्माभिमान अशा प्रसंगी कुठे दडून बसतो, न कळे.
कंजारभाट समाजातील या प्रथेला 20 वर्षापूर्वी सर्वप्रथम याच समाजातील अरुणा आणि कृष्णा इंद्रेकर या जोडप्यानं विरोध केला. त्यासाठी त्यांना वाळीतही टाकण्यात आले. मात्र त्यांनी आपला विरोध आणि समाजातील तरुणांची जनजागृती सुरूच ठेवली. त्याचाच परिणाम म्हणजे या समाजातील तरुणांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या प्रथेविरुद्ध आवाज बुलंद केला आहे. त्यांनी स्टॉप व्ही टेस्ट नावानं व्हॉट्‌स ऍप ग्रुप सुरू केला आहे. टाटा इन्स्टिट्युट ऑफ सोशल सायन्सेसमध्ये शिकणारा विवेक तमाचेकर या चळवळीत अग्रेसर आहे. काही वडीलधाऱ्यांचाही त्यांना पाठिंबा मिळतो आहे, मात्र दुसरीकडे त्यांना धमक्‍याही येऊ लागल्या आहेत. तरीही ही नव्या दमाची तरुण मंडळी या अन्याय्य प्रथेविरुद्धचा लढा पुढे रेटत आहेत, हे ही नसे थोडके. मंदीराचे उंबरे झिजवण्यापेक्षा अशा राक्षसी प्रथांविरोधात उभे ठाकणे अधिक महत्त्वाचे आहे. मंदिर हा अस्मितेचा विषय असेलही, मात्र अशा जुलमी प्रथा म्हणजे त्या महिलेचा जीवनमरणाचा प्रश्‍न असतो. या लढाईत उर्वरीत समाजानेही या तरुणांबरोबर उभे राहाणे गरजेचे आहे.
जाता जाता...
गेल्या आठवड्यात नेदरलॅंडच्या साराची कथा वाचण्यात आली. नेदरलॅंडची ही अवघी 19 वर्षांची युवती नोकरीच्या शोधात ऍमस्टरडॅमला गेली, एअरपोर्टच्या बाहेर आल्यावर तिला एका सापळ्यात अडकवण्यात आले आणि तिची रवानगी वेश्‍यागृहात करण्यात आली. तिथे दररोज तिला कोकेन दिलं जातं होतं आणि 18-18 माणसे तिच्यावर अत्याचार करीत होते. 1997 साली सारानं कशीबशी तिथुन सुटका करून घेतली आणि बेल्जियममध्ये आश्रय घेतला. आता 42 वर्षांची असलेल्या सारानं स्लेव गर्ल या नावानं आत्मचरित्र लिहून आपली कहाणी जगासमोर आणली आहे.
अशा किती सारा अजूनही अंधारात अत्याचार सोसत असतील, कितीजणी अजूनही पावित्र्यासाठी परीक्षा देत असतील, याची मोजदादच नाही. अनेकींमधल्या काहीच कहाण्या अशा समोर येतात, बाकीच्या काळाच्या उदरात गुडूप होतात.
जगभर स्त्रीच्या वाट्याला अन्याय अत्याचार येत असतात. प्रत्येकीची कहाणी निराळी. थकवणारी. दुखावणारी. रडवणारी. सगळ्या प्रथा तिच्या विरोधात. सगळ्या परंपरा तिच्या विरोधात. समाजही तिच्या विरोधात. या सगळ्या प्रथा, परंपरा निर्माण करणारा पुरुषही तिच्या विरोधात.
नवीन वर्षाचा सूर्यही तिच्या जीवनातील अंधार दूर सारू शकला नाही. फक्‍त एवढेच सत्य आहे.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह