तुझी साक्ष
असंख्य सूर्यमाला, असंख्य ग्रह तारे
आणि हे सगळे कवेत घेणारी अतिप्रचंड पोकळी
या सगळ्या पसाऱ्यातील एका सूर्यमालेतल्या
पृथ्वीवरच्या एका देशातल्या
एका छोट्याशा गावात राहणारा
एक छोटासा जीव.
विश्वाच्या या अफाट पसाऱ्यातला
केवळ एक ठिपका
जेव्हा तुझ्या अस्तित्वालाच आव्हान देतो,
तुझे असणे नाकारतो,
तेव्हा हे जग्गनियंत्या
तुझ्या चेहऱ्यावर उमटणारी
हलकीशी स्मित रेषा पाहून चकाकते वीज आकाशात
आणि सगळं विश्व व्यापून दशांगुळे उरलेला तू
हळूच तुझे कृपाळू बाहू पसरवून
त्याला कवेत घेतो
त्याचं बुद्धिकौशल्य, त्याचं वक्तृत्व,
त्याचा तुझ्या नसण्यावरचा विश्वास
ठामपणे मांडण्यासाठी त्याला शब्दांचं बळ पुरवतो
कारण तो आहे तुझाच अंश
एक दिवस तुझ्यातच सामावणारा
पण तोपर्यंत तुझ्या नसण्याचे संदर्भ तो देत राहणार
तुझ्याच साक्षीनं
स्वाती हुद्दार
2 जून 2015