पाऊसगाणं
सृष्टीला सृजनाचे वेध लागले की शब्दांनाही पालवी फु टु लागते. मोगऱ्याच्या सुगंधाच्या साक्षीनं अंगभर दुलईची उब लपेटुन पहाटे निरभ्र आकाशातील चांदण्या मोजण्याचा ऋतू आता सरला आहे. आता सामोरं जायचं आहे, टपोऱ्या थेंबांतून निथळणाऱ्या जीवनाला. अवघी सृष्टी डोळ्यात प्राण आणून त्याच्या वाटुलीकडे डोळे लावुन बसली आहे.
आज परत आभाळ गर्द निळं झालं आहे. गोकुळातल्या सावळ्या कृष्णासारखं. वेळुबनातून सुसाट वाहणाऱ्या वाऱ्याचे सूरही उमटताहेत त्याच्या आगमनाची वार्ता घेऊन. दूरस्थ माळावर ध्यानस्थ योग्यासारख्या उभ्या असलेल्या त्या शतायुषी वडानं अंगभर धुळीचं उटणं माखलं आहे आणि सुस्नात होण्यासाठी प्रतीक्षा करतो आहे ेपर्जन्यधारांची. उष्म्यानं आळसावलेल्या वडावरच्या पाखरांनीही मंजुळ चिवचिवाट करीत त्याच्या येण्याचे संकेत दिले आहेत. चाऱ्यासाठी दिवसभर कुरणात हुंदडलेल्या गायीवासरांनीही वडाच्या पारंब्यांखाली आसरा शोधला आहे. नुकतंच चालायला लागलेलं गायीचं गोजीरवाणं वासरू आपल्या काळ्याभोरं नजरेनं सृष्टी बदलाचा तो सोहळा डोळ्यात साठवतं आहे. गायीनं त्या पिलाला मायेनं आपल्या मानेखाली घेतलं आणि त्याचं मस्तक हुंगत त्याला आश्वस्त केलं. आभाळ अधिकच गहिरं झालं आहे. सगळा आसमंत काळवंडुन आला आहे आणि अचानक वीज लकाकली. क्षणभर सगळं लख्ख झालं. त्या प्रकाशात सगळ्या आकृत्या स्पष्ट झाल्या आणि क्षणात पुन्हा सगळं सावळ्या वर्णात अस्पष्ट, धुसर झालं. आयुष्याचही तर असचं असतं. एखाद्या घटनेची, प्रसंगाची संगती लागता लागताच अचानक काही दुवे निखळतात आणि ते प्रसंग कायमचे धुक्यात विरतात. मनाच्या अंतरंगात कायमचे गुडुप होतात. मन कितीही डहुळंल तरीही पृष्ठभागावर उमटतात केवळ तरंग.
पावसाच्या आगमनाची पूर्वतयारी झाली आणि पाहता पाहता टपोरे थेंब तृषार्त धरणीवर टपटपु लागले. मृण्मय गंधानं तन मन मोहरुन आलं. भेगाळलेल्या भुमीतून कोंडलेला असह्य उष्मा बाहेर पडु लागला. हळुहळु सगळं श्रांत क्लांत होत चाललं आहे. थेंबांचं नर्तन आता ऐन रंगात आलं आहे. थेंबांनी धारानृत्य आरंभलं आहे. पावसानं आता एक लय धरली आहे. वडाखालचं ते गोजीरवाणं वासरू थरथरत्या अंगानं गायीला अधिकच बिलगलं आहे. वडावरची किलबिलही शांत झाली आहे. वडाची हिरवीकंच पालवी कोसळत्या जलधारात मध्येच चमकते आहे.
पावसासह सावळ्या कृष्णाची आठवण हटकुन येतेच आणि कृष्णामागोमाग राधेची सयही येते. राधा म्हणजे कासळत्या धारेचचं रुप. आकाशातून वसुंधरेवर कोसळणाऱ्या नितळ पारदर्शी धारेसारखीच राधाही शुद्ध, सात्विक, पवित्र. राधेचा आणि धारेचा गुणधर्म सारखाच, समर्पणाचा. दोघींनाही परिणामांची पर्वा न करता उत्कटतेनं झोकुन देणं एवढंच माहिती.
राधा म्हणजे खरंतरं कृष्णावर निस्सीम प्रेम करणारं, अवघ्या गोकुळानं वेडं ठरवलेलं एक काल्पनिक पात्र. मात्र युगानुयुगे राधाच ठरली आहे उत्कट आणि निस्सीम प्रेमाचा मानदंड.
पाऊस कोसळायला लागला की गोकुळातील राधाकृष्णाच्या रासलीलेचे सूर कानात घुमु लागतात.पाऊस कृष्ण भासू लागतो. वसुंधरारुपी राधेवर ओसंडून प्रेम करणारा. एक आभासदृष्य. राधा सुद्धा तर आहे केवळ एक आभास. कृष्णाचं एक हळवं अपुरं स्वप्न. गोकुळात माघारी राहिलेलं.
पाऊस कोसळू लागला की तो हातांवर वेचायचा. त्याचा थंड स्पर्श अनुभवायचा, त्याच्या कधी सरळ तर कधी तिरप्या असलेल्या रेशमी रेषा वाचायच्या. तो हृदयात साठवायचा. स्मरणकुपीत जपून ठेवायचा. मग हळुहळु उलगडत जायचा. एकेका रुपेरी धारेत गवसतात कितीतरी संदर्भ. आताशा पाऊस अनुभवता येतो त्यात न भिजताही. अगदी अलिप्तपणे. आणि तोच अनुभव अधिक समृद्ध आणि गहिरा वाटतो. न भिजताही अंतर्बाह्य चिंब करणारा. पावसाचा तो ओलावा झिरपतो आंत आंत हृदयात अलगद मोरपिसासारखा. पाऊस धारांच्या उभ्या आडव्या उनाड रेषांनी आता गंभीर लय धरली आहे. वयात आलेल्या मुलीनं उपजत शहाणपणानं सरळं चालावं तसा पाऊसही एका रेषेत कोसळतो आहे. त्याच्या रेषा वाचताना कधीतरी पाऊस पाण्यात सोडलेली हेलकावत पुढे पुढे जाणारी कागदी नावं दिसते. अचानक गाठलेल्या पावसानं चिंब भिजवलेली दप्तरातली कोरी करकरीत पुस्तक वाचण्याचा प्रयत्न करताना डोळ्यातून उतरलेला पाऊस दिसतो. पावसाच्या तांडवानं ओल्या झालेल्या सरपणावर सांजेची भाकर शिजवताना खोलीभर दाटलेला धूर आणि फुंकणीनं त्या सरपणाचे आर्जव करणारी माय गवसते. नाचऱ्या थेंबांनी अंगणभर घातलेली रांगोळी बघत नाचणारी परकरी पोर सापडते तर कधी दूरदेशी गेलेल्या सजणाची सय येऊन व्याकुळलेली नववधु दिसते. पावसाच्या माऱ्यानं अस्ताव्यस्त झालेल्या झोपडीत तान्ह्याला कुशीत घेऊन थरथरणारी मायही आठवते. अशावेळी हा पाऊस, तो वाचताना पाऊसमय झालेली ही सगळी दृश्य आणि मी हे द्वैत उरतच नाही मुळी. मग एका संपृक्त क्षणी माझ्यातलं मी पण विरघळत जातं आणि मी होते एक कोसळती पाऊस धारा? की कृष्णवेडी राधा?