त्या दोघी
स्वाती हुद्दार
१९४७ साली भारत स्वतंत्र झाला तो भारत-पाकिस्तान असा विभाजित होऊन. या विभाजनाने अनेक जखमा दिल्या. काही कधीही भरून न येणाऱ्या. भारत स्वतंत्र झाला की जादुची कांडी फिरावी तसे सारे प्रश्न संपतील, भारतात सोन्याचा धुर निघेल, दुधाच्या नद्या वाहतील असे स्वप्नरंजन करणाऱ्यांच्या भ्रमाचे भोपळे फुटले आणि अनेक नवेच प्रश्न देशासमोर उभे ठाकले. भ्रमनिरास झालेली संवेदनशील पिढी आपल्या प्रश्नांची उत्तरे कलांमधून शोधू लागली. आपल्या व्यथा-वेदना कलांमधुन मांडु लागली. यातुनच एक नवा प्रवाह संगीत, नाटक, साहित्य यातुन प्रवाहित झाला. त्यावेळची तरुण भारावलेली पिढी या प्रवाहात सामील झाली आणि कला, साहित्य, संस्कृतीच्या क्षेत्रात क्रांती झाली.
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
असे म्हणत नवे प्रवाह साऱ्याच क्षेत्रांमधुन दुथडी भरून वाहू लागले. काव्य, कथा, कादंबरी प्रमाणेच रंगभुमीवरही हे नवे बदल दिसू लागले. नाटकाच्या संहितेपासून विषय-आशय ते सादरीकरणापर्यंत साऱ्यातच आमुलाग्र बदल झाले. रात्र-रात्र चालणाऱ्या संगीत नाटकांची जागा आशयप्रधान नाटकांनी घेतली. पौराणिक नाटकांपेक्षा प्रेक्षकांना सामाजिक विषय अधिक खुणावु लागले आणि मन्वंतराच्या या काळातच रंगभुमीला दोन गुणी कलावंत मिळाल्या. त्या दोघी म्हणजे सई परांजपे आणि विजया मेहता.
पुरुषी क्षेत्र समजल्या जाणाऱ्या नाट्य दिग्दर्शनाच्या क्षेत्रात या दोघींनीही आपल्या नावाची मोहोर उमटवली, नव्हे या दोघींनीही आपापले संप्रदाय निर्माण केले. सई आणि विजया नावाचे प्रवाह साधारण ५०-६० च्या दशकापासून अगदी अलिकडेपर्यंत सांस्कृतिक क्षेत्रात समांतर वाहत राहिलेत.
विजया मेहता उर्फ विजया जयवंत यांचा जन्म ४ नोव्हेंबर १९३४ चा आणि सई परांजपेंचा जन्म १९ मार्च १९३८ चा. म्हणजे एकाच दशकातला. स्वातंत्र्यपूर्व काळातला.
विजयाबाईंचे बालपण मुंबईतल्या गिरगावात गेले. जयवंत या उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील विजया हे शेंडे फळ. स्वातंत्र्य चळवळीने तेव्हाचे वातावरण भारलेेले होते. त्याचा परिणाम नकळतपणे विजयाबाईंच्याही मनावर होत होता. त्या भारावलेल्या मनोवस्थेत त्याही राष्ट्रसेवादलात सामील झाल्या. शाळा-महाविद्यालयीन शिक्षण सुरूच होते आणि एका वळणावर विजयाबाईंना त्यांच्यातील कलावंताचा शोध लागला. कस्तुरी मृगाला त्याच्यातला सुगंध गवसावा अगदी तसा.
सई परांजपेंची पार्श्वभुमी अतीशय वेगळी होती. श्रेष्ठ गणितज्ज्ञ रॅंगलर परांजपेंची नात. ज्येष्ठ समाजसेविका, केंब्रिज विद्यापीठाच्या अधिस्नातक असलेल्या शकुंतला परांजपेंची आणि रशियन चित्रकार युरा स्लेप्टझॉफ यांची ही लेक. अत्यंत सुसंस्कारित, बौद्धिक, उच्चशिक्षित, व्यासंगी वातावरण सईला बालपणापासूनच मिळाले. आजोबा आणि आईच्या डोळस देखरेखीखाली सईचे व्यक्तिमत्व फुलत होते. वयाच्या आठव्या वर्षीच सईमधल्या कथा लेखिकेचा जन्म झाला. शिक्षण सुरू असतानाच सईचे आकाशवाणीशी बंध जुळले, इंग्रजी वृत्त निवेदिका म्हणून. आणि त्यांचा माध्यमांमधला सूवर्णकाळ सुरू झाला. दूरदर्शन, बालरंगभुमीत रमलेली सई परांजपे नाट्य क्षेत्राचे रितसर शिक्षण घेण्यासाठी दिल्लीच्या नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाली. आणि तिथे तिला भेटले नाट्यक्षेत्रातील पितामह इब्राहिम अल्काजी. आणि मुळच्याच प्रतिभावंत सईच्या कलागुणांना पैलू पडू लागले.
इथे एक योगायोग असा की विजयाबाईंचेही गुरू इब्राहिम अल्काजीच आहेत. अल्काजींच्या तालमीत तयार झाल्यानंतर बाईंच्याही प्रतिभेला बहर आला. पुढे त्यांना आदि मरज़बान आणि जर्मन दिग्दर्शक फ्रिट्ज बेनेविट्ज़ यांचेही मार्गदर्शन लाभले. पीटर ब्रुकला बाई गुरू मानतात. बाईंच्याच शब्दात सांगायचं तर बाई पीटर ब्रुक यांच्याकडून एकलव्यासारख्या शिकल्या.
विजयाबाई आणि सई यांच्यात आणखी एका बाबतीत साम्य आहे, ते म्हणजे दोघीही पितृ प्रेमापासून वंचित राहिल्या. बाईंचे वडिल त्या पाच-सहा वर्षाच्या असताना वारले आणि सईच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला तेव्हा सई दीड वर्षाच्या होत्या. शकुंतला परांजपे सईला घेऊन भारतात परतल्या,त्यामुळे सईचेही बालपण वडिलांविना गेले.
कला क्षेत्रातला दोघींचाही प्रवास वेगळा आहे. अत्यंत देदिप्यमान आहे.क्रांतिकारक आहे.दोघींच्याही स्वभावाला अनुसरुन आहे. त्यांच्या-त्यांच्या प्रकृतीला मानवणारा आहे. अत्यंत लोभस आहे.
१९५१ साली महाविद्यालयातील नाटकांतून विजया मेहता यांच्या नाट्यकारकीर्दीची सुरुवात झाली. अगदी उमेदीच्याच काळात नानासाहेब फाटक, मा. दत्ताराम अशा दिग्गज मंडळींसोबत काम करण्याचा अनुभव त्यांना मिळाला.विजयाबाईंच्या नाट्यदिग्दर्शनाची सुरुवातच विजय तेंडुलकरांच्या श्रीमंत या नाटकाने झाली.त्याचबरोबर विजयाबाई पु. ल. देशपांडेंच्या नाटकांमधुनही काम करीत होत्या. पु.लंच्या नाट्यव्यक्तिमत्त्वाचा खूप प्रभाव बाईंच्या नाट्यप्रवासावर पडला. त्याचवेळी चि. त्र्यं. खानोलकर, दळवी, महेश एलकुंचवार यांच्या नाट्य संहिता विजयाबाईंना भुरळ घालू लागल्या. प्रायोगिक म्हणाव्या अशा नाट्यसंहितांना बाईंनी एकीकडे पाश्चात्य नाट्यकला आणि दुसरीकडे लोककला यांच्या मिश्रणातून तयार झालेला नवाच साज चढवला व त्याचे रुपडेच बदलून टाकले. परिणामी प्रेक्षकांना काहीतरी अगदी नवे, वेगळे, ताजे बघायला मिळाले.
१९६० साली विजयाबाईंनी तेंडुलकर, अरविंद देशपांडे यांच्यासह रंगायन नावाची नाट्यसंस्था सुरू केली आणि प्रस्थापिताला छेद देणारे नवे काहीतरी रंगभुमीवर रंगायला लागले. तुज आहे तुजपाशी, शितू, हॅम्लेट, सुंदर मी होणार यातील अभिनय आणि मादी, अजगर आणि गंधर्व, चिमणीचं घर होतं मेणाचं, गिधाडं, यशोदा, एक शून्य बाजीराव, अजब न्याय वर्तुळाचा, संध्याछाया, जास्वंदी,अखेरचा सवाल,हमीदाबाईची कोठी, बॅरिस्टर, पुरुष,हयवदन, वाडा चिरेबंदी ही आणि अशी अनेक अत्यंत गाजलेली नाटकं विजयाबाईंच्या नावावर आहेत.रंगभूमीवरील अनेक साचेबद्ध गोष्टी हद्दपार करण्याचा आणि जागतिक रंगभूमीचं भान मराठी रंगभूमीला देण्याचा मान विजयाबाईंना जातो. विजयाबाईंनी हयवदन आणि शाकुंतलचे प्रयोग जर्मन भाषेत आणि जर्मन कलावंतांकडून जर्मन प्रेक्षकांसमोर यशस्वीपणे केले, हे विजयाबाईंचे वेगळेपण.
विजयाबाईंच्या काहीशा बोजड, मनोविश्लेषणात्मक, प्रायोगिक नाटकांच्या पार्श्वभुमीवर सई परांजपेंची वाट अगदी निराळी होती. सईची निर्मिती मध्यमवर्गींय मनाला भावणारी, त्यांचीच सुख-दुःख सांगणारी होती. सईचा पिंड मुळचा सिद्धहस्त लेखिकेचा. त्यामुळे त्यांनी प्रचंड साहित्य निर्माण केलं. त्यामध्ये बालसाहित्य, कथा, पटकथा अशा विविधांगी लेखनाचा समावेश आहे. सईच्या मनात कायम एक निरागस मुल दडलेलं आहे. ते त्यांच्या लिखाणातुनही सतत डोकावत असतं. खरेतर सई हे चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व. सईंनी नाटकाबरोबरच आकाशवाणी, दूरदर्शन, माहितीपट, आणि सिनेमा अशी सारीच माध्यम वापरली. आणि केवळ वापरलीच नाही, तर त्यावर आपली नाममुद्राही रेखली. एकटे अपत्य असलेल्या सईला माणसांमध्ये रमणे खूप आवडते, त्याचा प्रभाव त्यांच्या नाटक-सिनेमामध्येही दिसतो. शेजारी, सख्खे शेजारी, पुन्हा शेजारी, हम पंछी एक चाॅल के ही नाटके आणि कथा, चष्मेबद्दुर सारखे सिनेमे याची साक्ष आहेत.या सगळ्यातुन त्यांनी चाळीमध्ये राहणारा सामान्य माणुस उभा केला.
सईने लिहिलेली, दिग्दर्शित केलेली नाटके, सिनेमे हे हसत-खेळत जीवनाचे तत्वज्ञान सांगतात आणि मनावर गारुड करतात. आलबेल, जास्वंदी ही नाटके आणि स्पर्श, दिशा हे सिनेमे ही त्याची उत्कृष्ट उदाहरणे. सईंनी अनेक दूरदर्शन मालिकांचे दिग्दर्शनही केले आणि सई घराघरात जाऊन पोहोचल्या.
विजया मेहता आणि सई परांजपे हे दोन मनस्वी प्रवाह एकदा एकत्र आले, ते जास्वंदी नाटकाच्या निमित्ताने. जास्वंदीची संहिता सईंची होती आणि दिग्दर्शन विजयाबाईंचे.माणसांच्या अनाकलनीय मनोव्यापारांचा, इच्छा-वासनांचा आणि स्खलनाचा शोध घेत जाणारं हे नाटक मानवी महत्त्वाकांक्षेच्या बुडाशी असलेल्या क्रौर्याचं दर्शन घडवतं. एका सहजलयीत उलगडत जाणाऱ्या बारीकशा कथेतून आणि त्या कथेच्या पोटात असलेल्या नाट्यपूर्ण घडामोडींतून ही आशयसूत्रं समोर येत जातात. एक तरल, भावनाट्य उभं राहताना त्याच्यातला शोकात्म गाभा आपल्याला घेरून टाकतो. ही सईंच्या लेखणीची कमाल आहे आणि विजयाबाईंच्या दिग्दर्शनाचीही. दोघीही तेवढ्याच समर्थ.
हा एक अपवाद वगळता हे दोन कला प्रवाह आपापल्या वैशिष्ट्यांसह समांतर प्रवाहित होत राहिले.
विजयाबाईंनी नाटकाशिवाय सिनेमा हे माध्यम क्वचित वापरले. त्यांचे स्मृतीचित्रे, पार्टी हे सिनेमे प्रेक्षकांना आवडलेही, पण त्यांचे मन त्यात रमले नाही.
दोघींनीही आपला कला प्रवास आत्मचरित्राच्या रुपाने चाहत्यांसमोर पेश केला आहे. या दोघींचेही आत्मचरित्र म्हणजे कलाक्षेत्राच्या मन्वंतर काळातला दस्तावेज आहे.
दोघींनीही कलाकृतीतून ओढूनताणून कुठला संदेश देण्याचा प्रयत्न केला नाही. कलेसाठी कला हे तत्व दोघींनीही जपले. जीवापाड सांभाळले.कलाक्षेत्रातील आपल्या कामाने या दोघींनीही आपापले संप्रदाय निर्माण केले. संगीताच्या भाषेत सांगायचे तर आपली घराणी निर्माण केली. नाना पाटेकर, विक्रम गोखले, नीना कुळकर्णी, रविंद्र मंकणी हे तर मोठ्या अभिमानाने विजयाबाईंचे शिष्यत्व मिरवतात.
विजयाबाई आणि सईने आपल्या साधनेने उजळलेला हा कलादीप असाच तेवत राहावा, या आशेसह.