Powered by Blogger.

Wednesday, 27 April 2022

 भोंग्यात अडकलेले समाजमन

 
स्वाती हुद्दार

 
कोरोना महामारीने गेली अडीच वर्षे सारे जगच स्टॅच्यू दिल्यासारखे थांबले होते. या काळात माणसाच्या जगण्याची सारी परिमाणेच बदलून गेली. साऱ्या सृष्टीवर अपनाही राज है, असे समजणाऱ्या आणि आपल्या बुद्धीचा अतोनात गर्व झालेल्या माणसाला कोरोना महामारीने चांगलीच चपराक दिली आणि माणूस म्हणजे सृष्टीच्या हातातले केवळ बाहुले आहे, ही जाणीव करून दिली. त्या दुःस्वप्नातून आत्ता कुठे सारे रुळावर येते आहे पण यातून धडा घेत माणूस अजिबात सुधारला नाही. आपल्या यकश्चित्व, जीवनाची क्षणभंगुरता कळल्यानंतरही एकमेकांवर कुरघोडी करण्याची त्याची खोड गेली नाही, हेच सध्याची जागतिक परिस्थिती पाहता लक्षात येते.
जगात सगळीकडेच सध्या अशांतता आहे. एकीकडे रशिया-युक्रेन युद्ध सुरू आहे. माणसे एकमेकांच्या जीवावर उठली आहेत. पाकिस्तानातही तख्तपलट झाले. श्रीलंकेत आणीबाणी लागली. भारतातही काही ऑलवेल नाही. महागाईचा आलेख दिवसेंदिवस वाढतोच आहे. समाजमन अस्थिर आहे. दिल्लीत हनुमान जयंतीच्या मिरवणुकीवर दगडफेक झाली. इडीच्या कारवाया सुरूच आहेत. त्यावरून आरोप-प्रत्यारोपांचे वादळ घोंघावते आहे. एसटीचा अनेक महिने लांबलेला संप आता कुठे संपण्याच्या मार्गावर आहे. दरम्यान शरद पवारांच्या घरावर हल्ला झाला. त्यावरून नको तेवढी टीकाटिप्पणी झाली.
यातच भरीस भर म्हणून राज्यात भोंग्यावरुन वादळ उठले आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे उतरवले नाहीत, तर मशिदीसमोर हनुमानचालिसा सुरू करू, अशी धमकी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिली आहे. असा अल्टीमेटस देणे ही राज ठाकरेंच्या राजकारणाची स्टाईल आहे. या आधीही त्यांनी छठ पुजा, मराठी पाट्या, दादर स्टेशन बाहेरचे किरकोळ विक्रेते, असे बरेच मुद्दे गाजवत त्यांच्यातला राजकारणी जिवंत ठेवला. राज ठाकरेंनी राजकारणासाठी निवडलेले मुद्दे, त्यांचे खळ्ळखट्याक, त्यांची भाषणे, त्यांचे लाव रे तो व्हिडिओ, असे संवाद हे नेहमीच चर्चेचे विषय ठरतात. त्यांच्या सभा नेहमीच गर्दी खेचून घेतात, पण त्याचे मतांमध्ये परिवर्तन होत नाही. परिणामी २००६ मध्ये स्थापन झालेली मनसे सत्तेसाठी अजूनही चाचपडते आहे. अर्थात आजचा लेखन प्रपंच त्यासाठी नाही.
आपले राजकीय अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी सगळेच राजकीय पक्ष, नेते समाजस्वास्थ्य दावणीला बांधतात. त्यांना सोयिस्कर असा मुद्दा सतत तापत ठेवणे, आणि त्यावर आपली राजकीय स्वार्थाची पोळी शेकून घेणे, ही त्यांच्या धंद्याची गरज असते, पण सामान्य जनता त्यांच्या घोषणांना, त्यांच्या उकरून काढलेल्या विषयांना बळी पडते, त्यालाच जीवन मरणाचा प्रश्न समजते आणि आपले जगणे मरणे विसरून जिंदाबाद-मुर्दाबाद करू लागते, मोर्चे काढु लागते, कधी-कधी माथी भडकतात, डोकी फुटतात. निष्पापांचे अकारण जीवही जातात.
भोंग्यांच्या मुद्द्यावरून सध्या राज्यात असाच तणाव आहे. अचलपूर -अमरावती पेटले आहे. तिथे संचारबंदी लावेपर्यंत परिस्थिती चिघळली आहे. उत्तरप्रदेशातही हा मुद्दा गरम होऊ लागला होता, मात्र मुख्यमंत्री योगींनी नियमावली जारी करीत भोंग्याच्या आवाजावर निर्बंध घालत या मुद्द्यातील हवाच काढून टाकली. एकीकडे रामनवमी हनुमान जयंतीला धार्मिक विद्वेषातून मिरवणुकीवर दगडफेक होत असताना मुंबईतील मुस्लिम बांधवांनी सामंजस्याची भूमिका घेत मुंबईतील ७२ टक्के मशिदींवरील पहाटेच्या भोंग्यांचा वापर बंद केला आहे. हे स्वागतार्ह पाऊल आहे.
सध्या मुस्लिमांचा पवित्र रमजान सुरू आहे. अनेक हिदू बांधव आनंदाने इफ्तार पार्टीत सामील होताहेत. अनेक मुस्लिम बांधव श्रीराम शोभायात्रेत सरबत वाटप करतात, खरेतर भारतीय समाजमन असेच घट्ट विणीने विणलेले आहे. मात्र कधीतरी कोणीतरी या विणीला छेद देतो आणि ही वीण उसवत जाते. मग सारेच बिघडते, दंगली उसळतात. होत्याचे नव्हते होते. आणि उरते केवळ शुन्य.
खरेतर कोणत्याही धर्माचे तत्वज्ञान एखाद्याच्या मनापर्यंत पोहोचवायला भोंग्यांची गरज नाही. धर्म आणि तत्वज्ञान खूप पुरातन आहे आणि भोंगे खूप अलिकडचे. भोंगे अस्तित्वात नव्हते, तेव्हाही पवित्र मनाने केलेली प्रार्थना परमेश्वरापर्यंत, अल्लापर्यंत पोहोचतच होती. आमची प्रार्थना, आमची भक्ती भोंग्यांसारख्या बाह्य साधनांवर अवलंबून राहू नये. आपली प्रार्थना इतरांसाठी त्रासाची ठरू नये, ही सच्चा चेल्याची, भक्ताची जबाबदारी असते. कारण कोणताच धर्म द्वेष करायला शिकवत नाही.
आता राहिला मुद्दा भोंग्याचा. दिवसातून पाच वेळा मशिदींमधुन भोंग्यांवरून अझान दिली जाते. अझान म्हणजेच प्रार्थनेसाठी, नमाज पढण्यासाठी गोळा होण्यासाठी दिलेली हाक. पारंपरिकरित्या मुआझिन मशिदीच्या मनोऱ्यावरून मोठ्या आवाजात अझानचं पठण करायचे, विसाव्या शतकाच्या मध्यापर्यंत त्यासाठी सगळीकडे लाऊडस्पीकरचा वापर होऊ लागला. १९३६ साली पहिल्यांदा मशिदीमध्ये मायक्रोफोन-लाऊडस्पीकरचा वापर झाल्याचा उल्लेख सिंगापूरमधला आहे. मात्र गेल्या काही दशकांत लाऊडस्पीकरवरून अझान हा वादाचा मुद्दा बनत गेला. भारतातच नाही, तर जगभरात, अगदी अरब आणि मुस्लीम राष्ट्रांमध्येही.
केवळ मशिदीतच नाही, तर हिंदू, ख्रिश्चन अशा अन्य धर्मियांमध्येही वेगवेगळ्या सणांच्या वेळी तसेच उत्सव, लग्न, जत्रेत मोठ्या प्रमाणात लाऊड स्पीकरचा वापर होतो. भारतात लाऊडस्पीकरच्या वापराचे नियम आणि निर्बंध समान आहेत असं कायदेतज्ज्ञ सांगतात. २०१६ साली मुंबई उच्च न्यायालयाने जजमेंट दिलं होतं की, लाऊडस्पीकरचा वापर करणं हा मूलभूत अधिकार नाही. कोणताही धर्म हा मूलभूत अधिकार असल्याचा दावा करू शकत नाही. पण शांतीपूर्ण जीवन जगणं हा मात्र मूलभूत अधिकार आहे. भारतात लाऊडस्पीकरच्या वापराविषयीचे नियम २००० साली लागू झाले. The Noise pollution (regulation and control) rules अर्थात ध्वनी प्रदूषण नियमन व नियंत्रण या नावानं ते ओळखले जातात. हेच नियम मशीद आणि इतर धार्मिक स्थळांनाही लागू होतात.
त्यामुळे राज ठाकरे यांनी उपस्थित केलेला मुद्दा अगदी बरोबर आहे. तो सर्वसामान्याच्या आरोग्याशी, ध्वनी प्रदुषणाशी संबंधित आहे. मात्र त्याला देण्यात आलेला धार्मिक रंग चुकीचा आहे. आणि त्यासाठी देण्यात आलेली धमकी (भोंगे काढले नाहीत तर हनुमान चालिसा पठण करणार) त्याहुन चुकीची आहे. कारण हनुमान चालिसा पठणामुळे होणाऱ्या ध्वनी प्रदुषणाचा त्रासही नागरिकांनाच होणार आहे. म्हणजे एक ध्वनीप्रदुषण रोखण्यासाठी दुसरे ध्वनी प्रदुषण. म्हणुनच मुद्दा उपस्थित होतो, की राज ठाकरेंना ध्वनी प्रदुषण संपवायचे आहे की केवळ राजकारण करायचे आहे.
हे सगळे कमी होते की काय म्हणून या आठवड्यात जनतेने निवडुन दिलेले आमदार जाहीर भाषणात जातीयवादी टीका करतात, एक खासदार आणि आमदार मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर धरणे देतात, हे सगळे पाहिले की दिवसेंदिवस राजकारणाचा स्तर किती घसरत चालला आहे, हे लक्षात येते आणि वाटते की या महाराष्ट्राला नक्कीच कोणाची तरी दृष्ट लागली आहे.
राजकारणाच्या या सगळ्या धबडग्यात आम्ही एवढे अडकलो की आज भोंग्यांसाठी भांडणारे आम्ही गेल्या वर्षी याच दिवसात ऑक्सिजन आणि बेडसाठी झुंजत होतो. एकेका श्वासासाठी झगडत होतो.अनेकांची प्राणाची बाजी लागली होती. अनेकांना आप्तेष्टांना मुकावे लागले होते, हे सोयिस्करपणे विसरलो आहोत.
राजकारणी आज भोंग्याचा मुद्दा मांडत आहेत, उद्या कोणता तरी नवा मुद्दा मांडतील, आणि आम्ही त्यावर चर्वितचर्वण करण्यात, प्रसंगी मोर्चे काढण्यात, जिंदाबाद-मुर्दाबाद करण्यात आमच्या आयुष्यातील बहुमुल्य क्षण गमवून बसू, तेव्हा या सगळ्याला वेळीच लगाम घालणे, हेच सुज्ञ नागरिकांचे कर्तव्य आहे.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह