स्वरवेधने पेलले ’कट्यार’चे शिवधनुष्य
स्वाती हुद्दार
मिटता कमल दल
होई बंदी हा भृंग
परि सोडिना ध्यास
गुंजनात हा धुंद
स्वरांच्या लयकारीने उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेतला होता. माना डोलत
होत्या. वाह...वाहची दाद मिळत होती. सारे सभागृह ताल-सुरांच्या हिंदोळ्यावर
झुलत होते. सुर थांबले आणि वन्स मोअरच्या घोषणांनी सभागृह दणाणले.
रसिकांच्या विशेष आग्रहास्तव गाणे पुन्हा सुरू झाले आणि रसिक पुन्हा
स्वरानंदात भिजु लागले. तो सुर होता मुळचा नागपुरचा महागायक अनिरुद्ध
जोशीचा आणि निमित्त होते, स्वरवेध निर्मित कट्यार काळजात घुसली...एक
अनुभुती या नाटकाचे.
१९६७ साली प्रभाकर पणशीकरांच्या नाट्यसंपदेतर्फे हे नाटक सर्वप्रथम
रंगभुमीवर आले आणि अल्पावधीतच या नाटकाने रसिकांची मने मोहून टाकली.
नागपूरकर रसिकांच्या मनात या नाटकाला विशेष स्थान आहे, कारण हे नाटक
ज्यांच्या सिद्धहस्त लेखणीतून उतरले ते मास्तर म्हणून ओळखले जाणारे
पुरुषोत्तम दारव्हेकर हे नागपूरचे आणि या नाटकातली खॉंसाहेबांची मध्यवर्ती
भुमिका ज्यांनी आपल्या अभिनयाने अजरामर केली, ते चतुरस्त्र गायक आणि
अभिनेते डॉ. वसंतराव देशपांडेही नागपूरचे.
योगायोग असा की ’मी वसंतराव’ हा डॉ. वसंतराव देशपांडेंच्या जीवनावरचा
चित्रपट नुकताच प्रदर्शित होऊन रसिकांच्या मनात त्याची याद ताजी असतानाच
त्यांच्या अभिनयाने गाजलेले हे नाटक स्वरवेधने रंगभुमीवर आणले आणि ते
सुद्धा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात.
खरेतर हे नाटक सादर करणे, म्हणजे शिवधनुष्य पेलण्यासारखे आहे, कारण
अनेक दिग्गज कलावंतांच्या प्रतिभेचा परीसस्पर्श या कलाकृतीला झाला आहे.
नाट्यशास्त्र कोळून प्यालेल्या मास्तरांच्या लेखणीतून ही कलाकृती उतरली
आहे. पं जितेंद्र अभिषेकींसारख्या चतुरस्त्र संगीतकाराने यातील गीतांच्या
चाली बांधल्या आहेत. भार्गवराम आचरेकर, वसंतराव देशपांडे, प्रसाद सावकार,
फैय्याज, बकुळ पंडीत अशा दिग्गज कलावंतांनी यातील भुमिका वठविल्या आहेत,
त्यातच भर म्हणजे नुकताच या संहितेवर आधारीत चित्रपटही प्रदर्शित झाला आहे.
त्यामुळे नवीन पिढीचीही या कथानकाशी ओळख झाली आहे. या सगळ्या
पार्श्वभुमीवर हे नाटक दर्दी रसिकांसमोर पेश करणे, ही परीक्षाच होती, मात्र
नागपुरकर गुणी कलावंतांनी ते आव्हान लिलया पेलले आणि हे नाटक रसिकांच्या
पसंतीला उतरले.
स्वरवेधच्या नाटकाचे वेगळेपण हे की यातील पदे गाणारे कलावंत आणि अभिनय
करणारे कलावंत वेगळे होते. महागायक अनिरुद्ध देशपांडे, डॉ. मंजिरी
वैद्य-अय्यर, आदित्य सावरकर, यश खेर, राम वनकर, राधा ठेंगडी, साक्षी सरोदे,
श्रृती बाईवार, लक्ष्यती काजळकर या सगळ्या गायकांनी अत्यंत तयारीने ही पदे
सादर केलीत. अभिनय करणाऱ्यांचे आणि गायकांचे ट्युनींग इतके जबरदस्त होते,
गायकांच्या शब्दाबर हुकुम अभिनय करणाऱ्यांच्या ओठांची हालचाल होत होती.
चेहऱ्यावरचे हावभाव बदलत होते.
शंतनु ठेंगडी या कलाकाराने उभे केलेले खॉसाहेब तर लाजवाब. हिंदुस्थानी
संगीत, संगीतातील घराणी, घराण्यांचा अभिनिवेश आणि दोन भिन्न घराण्यांच्या
गायकांमधील संघर्ष हा ‘कट्यार’चा विषय. मुळात गंभीर असलेल्या या नाटकाला
हलकीफुलकी विनोदी झालर देण्यात चॉंद- उस्मान आणि कवीराज ही पात्रे उभी
करणारे कलावंत यशस्वी ठरले.
कविराज, सदाशिव, उमा, झरीना या पात्रांनी मिळून सादर केलेली गद्य आणि
पद्यमय रागमाला या नाटकाचे वैशिष्ट्य आहे. संगीत हेच सर्वस्व असणाऱ्या
सदाशिवची संगीत विद्येसाठीची तगमग आणि त्याच्यावर अबोल प्रेम करणारी झरीना
या दोघांचाही अभिनय दाद मिळवुन गेला. प्रत्यक्ष रंगभुमीवर न येणाऱ्या पंडीत
भानुशंकर यांचे अस्तित्व नाटकभर जाणवत ठेवण्यात या नाटकाचे दिग्दर्शक ॲड.
भानुदास कुलकर्णी आणि सारंग मास्टे यशस्वी ठरले आहेत.
अप्रतिम नेपथ्य आणि उत्कृष्ट संगीत ही या नाटकाची बलस्थानं आहेत. एका
अक्षर कलाकृतीचा वेध घेण्याचा यशस्वी प्रयत्न स्वरवेधने केला आणि नागपुरकर
रसिकांना तृप्त केले, त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आणि यापुढेही अशाच
उत्तमोत्तम कलाकृती स्वरवेधने प्रस्तुत कराव्या, यासाठी शुभेच्छा.