या देशाचे उजळो प्राक्तन, याविण दुसरे भाग्य नको
Swati Huddar
३० सप्टेंबरची सकाळ वाईट्ट बातमी घेऊन आली. तसेही अलिकडे सगळेच दिवस
असेच उगवताहेत आणि मावळताहेत. दररोज कोणीतरी आप्तस्वकीय, कोणीतरी परिचित
यांच्या जाण्याच्या बातम्या येतात. या बातम्यांमुळे मन सतत धास्तावलेले.
कोरोनाने सारे जगच विळख्यात घेतले आहे. या आजाराने शरीराबरोबरच मनाचाही
ताबा घेतला आहे आणि समाजमनाचाही.
त्या दिवशीची सकाळ उगवली ती बबनमामा गेल्याची बातमी घेऊन आणि दिवसाच
काळोख दाटून आला. गेल्या ४५ वर्षांचा पट झरझर डोळ्यासमोरुन सरकत गेला.
बबनमामांची पहिली भेट आठवते, ती मी तीन-चार वर्षाची असतानाची. तेव्हा
आम्ही भगवाननगरला राहायचो. आणि बबनमामांचे मामा ठोंबरे आमचे शेजारी होते.
तेव्हा शेजार संबंध हे नात्यापेक्षाही घट्ट असायचे. आमचे आणि ठोंबरे
कुटुंबियांचेही संबंध तसेच होते. अगदी एक घर असल्यासारखे. दोन्ही घरची सगळी
सुखदु:ख एकच होती. पैशाची समृद्धी नसली तरी मनाची समृद्धी सगळ्यांजवळच
होती. दोन घरांच्या मधले दार कायम उघडेच असायचे. बबनमामा तेव्हा कोलकत्याला
संघाचे प्रचारक होते. ते सुट्टीमध्ये त्यांच्या मामांकडे आले, तेव्हा मी
त्यांना पहिल्यांदा भेटले.
लाल काठाचे पांढरे स्वच्छ धोतर आणि पांढरा स्वच्छ बंगाली कुर्ता अशा
वेषातल्या उंचपुऱ्या गोरेपान झुपकेदार मिशा असलेल्या बबनमामांशी लगेच गट्टी
जमली. रोज त्यांच्या मांडीत बसून गोष्टी ऐकण्याचा मग परिपाठच सुरू झाला.
बबनमामा असेच कधीमधी सुट्टीत येत राहिले आणि त्यांच्याशी माझे नाते
अधिकाधिक दृढ होत गेले. बबनमामांची सुट्टी संपली आणि ते परत कोलकत्याला
जायला निघाले की खूप रडू यायचे.
तेव्हा वय इतके लहान होते की संघकार्य, त्याची व्याप्ती, बबनमामांचे
प्रचारक असणे, ते ही बंगालसारख्या प्रांतात, हे सगळे आकळण्यापलिकडे होते.
तरीही त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाचा ठसा त्याही वयात मनावर उमटला
होता. पुढे आम्ही ते घर सोडून हनुमाननगरला राहायला गेलो. मामांच्या भेटी
मात्र होतच राहिल्या. मामा नागपूरला आले की आवर्जून घरी येत आणि येताना
माझ्यासाठी न विसरता हमखास राजमलाई आणतं. या क्रमात मार्च महिन्यात
झालेल्या शेवटच्या भेटीपर्यंतही खंड पडला नाही. अगदी मी दोन मुलींची आई आणि
आता सासु झाल्यानंतरही बबनमामा घरी येताना माझ्यासाठी ओंजळभर राजमलाई आणतच
राहिले आणि त्यांच्या त्या प्रत्येक भेटीत माझं लहानपण मला परत परत भेटत
राहिलं.
पुढे बबनमामा प्रचारक म्हणून त्रिपुराला गेले. तिथे खूप विपरीत
परिस्थितीत संघकार्य विस्तारत होते. मामांचे नागपूरला येणे कमीकमी होत
गेले. असू आम्ही सुखाने पत्थर पायातील, या न्यायाने प्रचारकांची फळी तिथे
संघकार्याची पायाभरणी करीत होती. अनेक शारीरिक- मानसिक क्लेष मामांसह
सगळ्यांनाच सहन करावे लागत होते. मात्र त्याची कुठेही वाच्यता न करता ध्येय
मंदिर कि दिशा मे पग सदा बढते रहे, म्हणत संघकार्य सुरुच होते.
२० वर्षांचा काळ असाच पुढे सरकला. माझे शाळा-कॉलेज आटोपले आणि लग्न
जमले. आई-बाबांनी मामांना निमंत्रणाचे पत्र पाठवले. मामांचे लग्नाला येणे
जमेल की नाही असे वाटत होते. लग्नाला एक महिना असतानाच एक दिवस दुपारी मामा
अचानक घरी आले. त्यांना पाहून आम्हाला सगळ्यांना खूप आनंद झाला. आम्ही
सगळे एकत्र जेवलो. माझ्या लग्नाच्या वेळी मामांना दिल्लीला बैठकीसाठी जायचे
होते, म्हणून ते मुद्दाम आधी भेटायला आले होते. मला म्हणाले आज तुला एक
मंत्र देतो. नवऱ्याच्या मनात शिरण्याचा मार्ग त्याच्या पोटातून जातो. हे
नेहमीसाठी लक्षात ठेव आणि सुखाने संसार कर. लग्नाची भेट म्हणून त्यांनी
हातमागावर विणलेले खास कापड आणले होते आणि ओंजळभर राजमलाई. माझ्या लग्नात
मिळालेल्या भेटींमधली ही सगळ्यात अमूल्य भेट होती.
पुढे मामा नागपूरला परत आले. महालच्या संघ कार्यालयात त्यांचे राहणे
होते. महिन्यातून एकदा आवर्जून घरी येत. मुलींशी खूप गप्पा मारत. तीन
वर्षाआधी वैदेहीला मुंबईला नोकरी लागली. तिला मुंबईत स्थिरस्थावर करण्याची
सगळी जबाबदारी बबनमामांनी त्यांच्या शिरावर घेतली. संघ कार्यालयात फोन कर,
प्रचारकांना फोन कर, असे करीत तिची राहण्याची खात्रीशीर सोय होईपर्यंत ते
स्वस्थ बसले नाहीत.
गेल्या वर्षी वैदेहीचं लग्न झालं. मामांना आम्ही सांगितलं पुजनीय
मोहनजींना निमंत्रण द्यायचं आहे. बबनमामांनी मोहनजींना निमंत्रण
देण्यापासून ते मोहनजी लग्नाला येईपर्यंत सगळ्या गोष्टींकडे जातीनं लक्ष
दिलं.
मार्च महिन्यातील लॉकडाऊन आधीचा रविवार. मामा अचानक घरी आले. त्या
दिवशी पुडाची वडी केली होती. मामा म्हणाले, वा वा अलभ्य लाभ. खाणे झाले.
गप्पा झाल्या. पण ही बबनमामांशी शेवटची भेट असेल असे अजिबात वाटले नाही.
लॉकडाऊनमुळे मामांचे पुन्हा घरी येणे झाले नाही. अधूनमधून फोनवर बोलणे होत
होते, तेवढेच.
...आणि अचानक मामा आजारी असल्याचे कळले आणि परवा तर सगळेच संपले.
बबनमामा एकटेच गेले नाहीत. सोबत माझे बालपण घेऊन गेले. माझे हक्काचे
माहेर घेऊन गेले. जीवनात जुळणारे मैत्र, नातेबंध, हे सगळे पूर्वसंचित असते.
उगाच नाही निरपेक्ष प्रेम करणारी बबनमामांसारखी माणसं आयुष्यात येत.
मात्र ती जेव्हा अशी अचानक निरोप न घेता निघुन जातात, तेव्हा कधीही भरून न
निघणारी पोकळी निर्माण होते, कायमची.
संघकार्याच्या पवित्र यज्ञात आपल्या जीवनाची समिधा इदं न मम या
वृत्तीने समर्पित करणाऱ्या बबनमामा सहस्त्रभोजनी या संघ प्रचारकाला
संघगीताच्या या ओळीतून भावसुमनांजली.
मी संन्यासी फिरतीवरचा
कशापरी वर्षाव फुलांचा
ही ध्येयाची घोर तपस्या
इथे प्रलोभन अन्य नको
काही नको मज काही नको