चंदेरी दुनियेच्या पडद्यामागचा मनस्वी कलावंत
स्वाती हुद्दार
थ्री इडियट सिनेमा बहुतेकांनी पाहिला असेल आणि अनेकांनी त्या
सिनेमातल्या थ्री इडियटमध्ये स्वतःला शोधले असेल. मात्र या पडद्यावरच्या
थ्री इडियटच्या मागे एक चवथाही होता, आणि तो होता या सिनेमाचा कला
दिग्दर्शक, नागपूरचा तरुण रजनीश हेडाऊ. तुम्हाला आठवत असेल, या सिनेमातील
कॉलेज, वर्गखोल्या, होस्टेल, पुढे मनालीपर्यंतचा प्रवास आणि रॅंचोच्या
अस्तित्वाच्या खुणा दर्शविणारी मनालीतली सुंदर दृष्य. त्या सिनेमाचा परिणाम
मनाला भिडण्यात त्यातील कलावंत, त्यांचा अभिनय, त्यातले संवाद, गाणी-संगीत
या सगळ्याइतकाच या दृष्यांचाही म्हणजेच यातील नेपथ्याचाही वाटा होता आणि
ही सगळी किमया होती त्या चवथ्या मनस्वी इडियटची.
कला ही माणसाच्या जगण्याचे अविभाज्य अंग आहे, अगदी पोट भरण्यासाठी
लागणाऱ्या भाकरी एवढेच. भाकरी शरीराचे पोषण करते आणि कला मनाचे. अगदी आदि
मानवाचा इतिहास तपासला तरी त्याच्या कलाप्रियतेचे पुरावे आढळतात. हळुहळु
मानवी उत्क्रांतीबरोबरच त्याची कलासक्तता वाढतच गेली. त्याची माध्यमही
विस्तारत गेली. चित्रकला, शिल्पकला, संगीत, नृत्य, नाटक अशा कलेच्या विविध
स्रोतातून मानव व्यक्त होत राहिला आणि जगण्याचा आनंद घेत राहिला.
कलेशिवायचे माणसाचे जीवन म्हणजे केवळ शुष्क, निष्प्राण कलेवर उरले असते.
मानवाच्या उत्कर्षाबरोबरच कलेची दालनेही विस्तारत गेली. निसर्गाने
मानवाला दिलेल्या बौद्धिक ताकदीच्या भरवशावर त्याने तंत्रज्ञानातही
प्रगतीची घोडदौड केली.
मानवाचे कलाप्रेम आणि तंत्रज्ञानातील झेप यातून जन्माला आला सिनेमा. या
सिनेमा माध्यमात उत्क्रांती होत होत The Story of the Kelly Gang नावाची
पहिली फिचर फिल्म आॅस्ट्रेलियामध्ये १९०६ साली प्रदर्शित झाली आणि त्यानंतर
सिनेमाने अख्ख्या जगाला वेड लावले. काळानुसार सिनेमा बदलत गेला. विस्तारत
गेला, उलगडत गेला आणि बघता बघता या माध्यमाने सारे जग आपल्या कवेत घेतले.
भारतीय सिनेमाच्या यशाचा सूर्य आज मितीला माथ्यावर आला आहे.
हिंदीमध्ये सिनेमाची मुहुर्तमेढ रोवली, हिंदी सिनेमाचे पितामह
दादासाहेब फाळके यांनी. १९१३ साली राजा हरिश्चंद्र नावाचा पहिला हिंदी
मुकपट तयार झाला. पुढे तांत्रिक दृष्ट्या विकसित होत होत सिनेमा बोलू लागला
आणि १९३१ साली आलमआरा नावाचा पहिला बोलपट प्रदर्शित झाला. जवळपास १०७
वर्षांचा झालेल्या हिंदी सिनेमाने खूप स्थित्यंतर अनुभवत आजपर्यंतची वाटचाल
केली आहे. ही स्थित्यंतर आशयाची होती, विषयाची होती, तंत्राची होती,
सादरीकरणाची होती. हिंदी चित्रपटाच्या या प्रदीर्घ प्रवासात मैलाचे दगड
ठरावेत, असे खूप चित्रपट आहेत. या चित्रपटांच्या वेगळेपणात आणि यशात जितका
वाटा पटकथेचा आहे, तितकाच दिग्दर्शनाचा आहे, त्यातील कलावंतांचा आहे,
संगीताचा आहे आणि तो चित्रपट प्रेक्षकांप्रर्यंत पोहोचविणाऱ्या
पडद्यामागच्या असंख्य कलावंतांचा आहे. अनेकांनी आपली नाममुद्रा त्या-त्या
कलाकृतींवर उमटवली आहे. सिनेमाच्या माध्यमातून त्यांची कला रसिकांशी बोलत
राहिली. हे तरल संवेदनेचे कलावंत मात्र या झगमगत्या दुनीयेपासून दूरच
राहतात.
भारतीय सिनेमाला गांधी चित्रपटासाठी पहिला आॅस्कर मिळवून देणाऱ्या भानू
अथैय्यांसारखे सिनेमाच्या इतिहासात आपले कर्तृत्व सूवर्णांकित करणारे अनेक
जण या क्षेत्रात आहेत. कोणी कॉस्चूम डिझायनर आहे, तर कोणी नृत्य दिग्दर्शक
आहे. आणि कोणी कला दिग्दर्शक आहे. सिनेमाच्या यशात पडद्यावरच्या
कलावंतांइतकीच पडद्या मागच्या या कलावंतांची भूमिकाही महत्त्वाची असते.
त्यातीलच एक महत्त्वाचे नाव म्हणजे भाग मिल्खा भाग या सिनेमासाठी फिल्म
फेअर अवार्ड मिळविणारे, गुजारिश चित्रपटासाठी झी सिने अवार्ड मिळवणारे आणि
अशा बऱ्याच पुरस्कारांवर आपली नाममुद्रा उमटवणारे मूळचे नागपुरकर असलेले
कला दिग्दर्शक (production designer) रजनीश हेडाऊ.
भारत, ये जवानी है दिवानी, रेस थ्री, पीके, ट्युबलाईट, काबिल, सुल्तान,
हाऊसफुल थ्री, बजरंगी भाईजान, लेकर हम दिवाना दिल, या आणि अशा अनेक
चित्रपटांसह थ्री इडियट, फेरारी कि सवारी आणि गुजारिश अशा संवेदनशील
कलात्मक चित्रपटांचे कलादिग्दर्शन करणारा हा अत्यंत संवेदनशील कलावंत.
जीवनाचे तत्वज्ञान अगदी सोपे करून टाकणारा.
सिनेमाच्या चकाचौंध दुनीयेत वावरतानाही पाय जमिनीवर घट्ट रोवून उभा असलेला मनस्वी कलावंत.
कधी जुळला याचा याच्या आतल्या कलावंताशी सूर? कधी लाभली याला कलावंताची
नजर? कलावंत जन्मावा लागतो की उपजतच लेऊन येतो कलावंतपण कर्णाच्या
कवचकुंडलासारखं. अशा अनेक प्रश्नांची उकल रजनीशच्या कला प्रवासातून होते.
हेडाऊ असे टीपिकल मराठी आडनाव असणाऱ्या रजनीशचे बालपण नागपूरच्या
हनुमाननगरात गेले. शाळा होती पं. बच्छराज व्यास विद्यालय. आणि इथेच रुजवात
झाली पुढच्या यशस्वी कलात्मक जीवनाची. इथे त्यांना भेटले कलाशिक्षक चन्ने
सर. चंद्रकांत चन्ने! हाडाचा कलावंत आणि हाडाचा शिक्षकही. चन्ने सर म्हणजे
परीस होते, लोखंडाचेही सोने करणारे. कित्येक ओबडधोबड व्यक्तिमत्त्वाचे
विद्यार्थी त्यांच्या हातात आले आणि चन्ने सरांनी त्यातून शिल्पासारखी
सुंदर व्यक्तिमत्त्व साकारली. चन्ने सरांचा बसोली गृप अशा वेड्या कलावंत
विद्यार्थ्यांसाठी तीर्थक्षेत्र होते. चन्ने सरांनी रजनीशमधील कलेचे बीज
जोखले, एखाद्या जोहऱ्याच्या पारखी नजरेने मौल्यवान रत्न पारखावे अगदी तसे.
आणि त्याला पैलू पाडायला सुरुवात केली. शाळा, अभ्यास आणि सोबतच बसोलीच्या
मुक्तांगणात चित्रकलेची मुशाफिरी. घरी आईवडिलांचा प्रेमळ पाठिंबा. उमलत्या
वयातले ते फुलपाखरी दिवस. रजनीशचे वडीलही चित्रकार आहेत. खूप चांगले
फोटोग्राफर आहेत. अनेक मासिकांमधून, दिवाळी अंकातून त्यांचे फोटोग्राफ्स,
स्केचेस प्रकाशित झाले आहेत. आपली नोकरी-व्यवसाय सांभाळून त्यांची कलासाधना
सुरुच असायची. त्यामुळे रजनीशमधील कलावंताला घरात मुक्तद्वार होते. इतके
तास अभ्यास केलाच पाहिजे, इतके वाजता घरी आलेच पाहिजे, अशी नियमांची जंत्री
त्यांच्या घरी नव्हती. स्वाभाविकच अशा कलासक्त, प्रगल्भ आईवडील आणि मोठ्या
भावाच्या सान्निध्यात रजनीशमधील कलावंत बहरत गेला. कलागुणांना वाव देणारी
शाळा, जीवाभावाच्या मित्रांची सोबत, सायकलवरची रपेट, रमेश लाडखेडकरांबरोबर
पक्षी निरीक्षण, निसर्गाचे सान्निध्य असे सगळे पोषक वातावरण त्याच्यातील
कलावंताला पैलू पाडत राहिले.
दहाव्या वर्गात उत्कृष्ट गुण मिळवून रजनीशने नागपूरच्या शिवाजी विज्ञान
महाविद्यालयात प्रवेश घेतला. आणि बारावीनंतर मुंबईच्या जे जे स्कुल आॅफ
आर्किटेक्चरमध्ये प्रवेश घेतला. ग्रॅज्युवेशन पूर्ण झाल्यानंतर
ट्रेनिंगसाठी रजनीश दिल्लीला गेला आणि तिथे मोरपंखी स्वप्नांना आकार लाभला.
शिक्षण संपलेले होते. पुढच्या वाटा धुसर होत्या. नक्की काय करायचे याचा
शोध सुरू होता. दरम्यान विविध एक्झिबिशन्स बघणे, करीअरच्या शक्यतांचा वेध
घेणे, असे सगळे सुरू असतानाच अचानक एक संधी चालून आली. रजनीशचा एक भाऊ
त्यावेळी बीबीसी चॅनल सोर्ससाठी आर्किटेक्चरल हेरिटेज आॅफ इंडिया ही फिल्म
तयार करीत होता. रजनीश आर्किटेक्ट असल्यामुळे त्याने भावाबरोबर ही फिल्म
करण्याचे ठरविले. त्या फिल्मसाठी रजनीशने रिसर्चसह अनेक कामे केली. रजनीशची
फिल्मी दुनीयेशी ही पहिली ओळख. सहा महिने हे काम केल्यानंतर त्यांनी
सिनेमा क्षेत्रातच सेट डिझायनिंगचे काम करण्याचा निर्णय घेतला आणि ते
मुंबईला परतले.
प्रॉडक्शन डिझायनर इन फिचर फिल्म हा व्यवसाय निवडणे, हा एक वेगळा आणि
धाडसी निर्णय होता. कारण हुशार मुलांनी डॉक्टर किंवा इंजिनीयर व्हावे,
अभ्यासात थोडे बरे असणाऱ्यांनी पदवी मिळवून शिक्षकाची, सरकारी किंवा तत्सम
नोकरी मिळवावी आणि जीवनाची इतिकर्तव्यता मानावी, असे साधारण मध्यमवर्गीय
मराठी घरात होत असे. जीवनातील स्थैर्याला तेव्हा बऱ्यापैकी महत्त्व होते,
अशा काळात एका मराठी मुलाने अनिश्चततेने भरलेल्या सिनेक्षेत्रात जाण्याचा
निर्णय घेणे, खूप निराळे होते. तिथे स्वतःला सिद्ध करणे, हे मोठे आव्हान
होते.
मात्र ज्यांची मुळं जमिनीत घट्ट रुजलेली असतात, त्यांच्यासाठी आकाशाला
गवसणी घालणे तितकेसे कठीण नसते. रजनीश त्यापैकी एक होते. रजनीशने या
प्रवासाची सुरुवात पायरी-पायरीने आणि अभ्यासपूर्ण रितीने केली. मुंबईत
आल्यानंतर सुरुवातीला ते युनायटेड टेलिव्हजन, रोनी स्क्रुवाला, झरीना
मेहता, एम टीव्ही, चॅनल व्ही अशा मंडळींना भेटले. त्यांच्यासाठी त्यांनी
छोटी-छोटी कामे केली. त्यातूनच पुढे त्रिकाल या टेलिव्हिजन मालिकेसाठी आणि
गाथा या सिरीजसाठी काम केले. सुरुवातीची दोन-तीन वर्षे हे केल्यानंतर रजनीश
आणि त्याच्या दोन मित्रांनी मिळून Acropolis नावाची कंपनी सुरू केली. त्या
माध्यमातून त्यांनी टीव्हीच्या ५०० जाहिरातींसाठी काम केले. हळुहळु
चित्रपटांकडे वळत अनेक मोठे चित्रपट रजनीशच्या नावावर जमा होत गेले.
प्रत्येक चित्रपट आशय-विषयाच्या दृष्टीने निराळा असतो. त्यातली पात्र ती
कथा प्रेक्षकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न त्यांच्या अभिनयातून करीत
असतात. पण त्या चित्रपटाचा कालखंड, कथानकाची पार्श्वभूमी, त्यातले वातावरण
जिवंत करण्याचे काम चित्रपटाचे सेट्स करीत असतात.
अलिकडे हे शास्त्र अधिक विस्तारले आहे. दिवसेंदिवस विकसित होत
चाललेल्या टेक्नॉलॉजीमुळे सेट्सचे महत्त्वही वाढत चालले आहे. चित्रपटाच्या
कथानकात वर्णिलेला कालखंड, कथानकातला प्रदेश, कथेची सामाजिक, सांस्कृतिक
पार्श्वभूमी हे सगळे हुबेहुब साकार करण्याचे काम सेट्सचे असते. यासाठी
प्रचंड अभ्यासाची आवश्यकता असते. रजनीशने ते शिवधनुष्य पेलले. या क्षेत्रात
आधीपासून कार्यरत असलेल्यांच्या गर्दीत आपली जागा निर्माण करणे इतके
सोपेही नव्हते. गुजारिश सिनेमा आपल्याला आठवत असेल, त्यातील नायकाच्या
मनातली नकारात्मकता दाखवण्यासाठी गर्द रंग, अंधारलेले सेट्स वापरले आहेत,
ही सगळी रजनीशमधील कलावंताची कमाल आहे.
रजनीश सांगतात, प्रत्येक चित्रपटाचा सेट तयार करण्याचा अनुभव वेगळा
असतो. प्रत्येक अनुभवावर एकेक लेख लिहून होईल, इतके विस्तृत आणि समृद्ध
करणारे. अलिकडे रजनीशने ॲमेझॉन प्राईमसाठी द फरगॉटन आर्मी नावाची वेबसिरिज
केली, ती नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारीत आहे. ती करताना
नेताजींच्या जीवनाचा खूप अभ्यास केला. त्याचा मनावर खोलवर परिणाम झाला.
त्यासाठी बॅंकांकच्या जंगलात आम्ही फिरलो. तो अनुभव खूप निराळा आणि सुंदर
होता.
एक चित्रपट तयार करणे म्हणजे त्या कथावस्तुचा पूर्ण अभ्यास करणे. त्या
सिनेमाची कथा जिथे घडते, त्या देश-प्रदेशातील स्थापत्य, त्याचा इतिहास,
तिथले नागरी जीवन या सगळ्याचा खूप अभ्यास करावा लागतो. टायगर जिंदा है, या
चित्रपटासाठी अबुधाबीचा सेट तयार केला होता. तेव्हा बगदादचे
स्थापत्यशास्त्र अभ्यासले. तिथले पिरिआॅडिकल डिटेल्स अभ्यासले. त्या
सगळ्यातून खूप आनंद मिळतो. एखादा चित्रपट करताना त्याचा सेट भव्यदिव्य आहे
का? हे माझ्यासाठी महत्त्वाचे नसते. माझ्यासाठी प्रत्येकच सिनेमा तेवढाच
महत्त्वाचा असतो. मला सतत काम करायचे आहे. हे महत्त्वाचे आहे. तो सिनेमा
हॉलिवूडचा असेल, बॉलिवूडचा असेल, किंवा तो एखादा माहितीपट असेल, मी
त्यामध्ये तेवढाच जीव ओततो. आपल्या कामात जितका जीव ओतावा, तितके ते अधिक
जिवंत होत जाते. रसरशीत होत जाते. हे रजनीशने विशेषत्वाने सांगितले.
कबीर खानच्या दिग्दर्शनात तयार झालेला आणि रणवीर सिंग, दीपिका
पदुकोणच्या महत्त्वाच्या भूमिका असलेला 83 हा रजनीशचे प्रॉडक्शन डिझाईन
असलेला चित्रपट येऊ घातला आहे. त्याची प्रेक्षकांबरोबरच रजनीशही वाट बघत
आहेत.
यशाची एकेक दालने पादाक्रांत करीत जात असतानाही रजनीशच्या मनातल्या
बालपणाच्या खुणा अजून ताज्या आहेत. ते म्हणतात, ते शालेय दिवस, पं. बच्छराज
शाळेची ती इमारत,तिथले ग्राऊंड, ते राजाबाक्षाचे मंदिर, शाळेतले लाल
फुलांचे काटेसावरीचे झाड, सगळे बालमित्र, शाळेतले शिक्षक, त्यांची शिस्त हे
सगळे मनपटलावर कायमचे कोरले गेले आहे. प्रत्येकानेच अगदी हात धरून
शिकविलेच, असे नाही, मात्र त्या सगळ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा
जाणते-अजाणतेपणी मनावर ठसत गेला आणि मी टिप कागदासारखा त्या गोष्टी टिपत
गेलो. आज सिनेमासाठी काम करतानाही त्या सगळ्याची कायम सोबत असते. मी आज जो
काही आहे, त्यामध्ये त्या सगळ्यांचा वाटा निश्चीत आहे.
आपले शहर, तिथले फुलपाखरी दिवस, शाळा, बालपण या सगळ्यांवर निरतिशय
प्रेम करणाऱ्या रजनीशला प्रांत, देश-भाषा यांच्या सीमा मान्य नाहीत.
त्याच्या पलिकडच्या मानवतावादावर त्यांचा विश्वास आहे. जाती-धर्म भेदाच्या
पलिकडे आता आपण गेले पाहिजे, असे त्यांचे प्रामाणिक मत आहे. जीवनात
Exploration असले पाहिजे. जेव्हा हे exploration थांबते, तेव्हा आयुष्य
थांबते. exploration च्या काही सीमा नसतात. असेही रजनीशला वाटते.
लखलख चंदेरी तेजाच्या दुनीयेत काहीसे अपरिचित असलेले क्षेत्र निवडणारा
हा तरुण त्याच्या प्रचंड मेहनतीने आणि अदम्य आशावादाने अवघ्या काही
वर्षातच या झगमगत्या दुनीयेत घट्ट पाय रोवून उभा राहिला. नुसता उभाच राहिला
नाही तर आपल्या कर्तृत्वाचे वलय त्याने तिथे निर्माण केले. मात्र हे सगळे
करताना आपण काही विशेष केले आहे, किंवा त्यासाठी काही विशेष स्ट्रगल करावे
लागले आहे, असे रजनीशला वाटत नाही, ते गंमतीने सांगतात, शालेय जीवनात
रसायनशास्त्र आणि गणिताचा पेपर सोडविणे हाच केवळ माझ्यासाठी स्ट्रगल होता.
बाकी कुठलाही विशेष स्ट्रगल मला जीवनात करावा लागला नाही. काम करीत गेलो,
एकातून दुसरे काम मिळत गेले, पैसेही येत गेले. सिनेक्षेत्रात नाव
कमावणाऱ्या प्रत्येकाजवळ त्यांच्या-त्यांच्या संघर्षाची कथा असते. रजनीशने
मात्र त्याच्या उमेदवारीचा काळ त्याच्यातल्या सकारात्मकतेने सोपा करून
टाकला आहे. त्यांच्या मते जे आवडते ते करणे हा आनंद असतो, यात संघर्ष नसतो.
आणि रजनीशमध्ये काठोकाठ भरून राहिलेली ही सकारात्मकताच त्यांना
इतरांपेक्षा वेगळे करते.
जन्मजात कलावंतपण लेऊन आलेला हा कलावंत कलेसाठी कला या न्यायाने अविरत
कलेची पखरण करतो आहे. याचे हे कलावंतपण असेच बहरत जावो आणि झी, फिल्म
फेअरसह राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय आणि आॅस्करवरही रजनीश हेडाऊ या नावाची
मोहोर उमटो, या शुभेच्छांसह.