देखणे ते हात
रक्तामध्ये ओढ मातीची
स्वाती हुद्दार
रसिकहो नमस्कार आणि या रंगगंधाच्या निसर्ग यात्रेत आपलं मनपूर्वक स्वागत.
कविता या वाड.मयकृतीचा प्रवास खूप पुरातन आहे. अगदी मराठी
साहित्यापुरताच विचार करायचं ठरवलं ना तरीही संत-पंत-तंत काव्यातून तेजाळत
आलेली ही कविता केशवसुतांच्या लेखणीतून उतरत आधुनिक कवितेशी नातं सांगू
लागली आणि त्यानंतर तिनं मागं वळून पाहिलंच नाही.
मराठी साहित्याला संतकाव्याची समृद्ध परंपरा लाभली आहे. महानुभवी
कवींपासून वारकरी संत कवींपर्यंतच्या विपूल काव्यानं मराठी कविता समृद्ध
झाली आहे. परमेश्वर भक्ती हा संत काव्याचा आणि त्यानंतर पंडिती काव्याचा
मूळ उद्देश असला तरी त्यातील अनुभवांची खोली आणि शब्दसंपदा विस्मित करते.
अवचिता परिमळू झुळुकला अळुमाळु या ज्ञानदेवांच्या विराणीतून वर्णिलेला
राधाभाव किंवा अणुरेणिया थोकडा, तुका आकाशाएवढा या तुकोबांच्या अभंगातून
व्यक्त झालेलं तत्वज्ञान या समोर आपण नतमस्तकच होतो.
मराठीला अशीच तंत काव्याचीही परंपरा लाभली आहे. शाहिरांनी लावणी आणि
पोवाड्यातून रचलेलं काव्य जीवनसन्मुख आहे. जीवनानुभवांचं जिवंत वर्णन
करणारं आहे आणि म्हणूनच रसरशीत आहे. राम जोशी, अनंत पंदी, होनाजी बाळा
यांच्या रचना मराठी माणसाला आजही वेड लावतात.
लटपट लटपट तुझं चालण गं मोठ्या नखऱ्याचं
या लावणीचा ताल आजही थिरकायला लावतो.
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
असं लिहिणाऱ्या केशवसुतांनी आधुनिक मराठी काव्याची पायाभरणी केली आणि समुद्र मंथनातून एकेक रत्न बाहेर पडावेत तशी
केशवसुत, गोविंदाग्रज, राजकवी भा. रा. तांबे, कवी बी, बालकवी, बा. सी.
मर्ढेकर, मुक्तिबोध, कुसुमाग्रज, कवी अनिल, नारायण सुर्वे, दासु वैदय, ना.
धो. महानोर, ग दि माडगुळकर, सुरेश भट, ग्रेस ते अगदी अलिकडच्या संदीप खरे,
कवी सौमित्रांपर्यंत ही परंपरा अत्यंत वैभवानं विस्तारत गेली. प्रत्येकाचा
बाज वेगळा, शैली वेगळी.
कवयित्रीनींही मराठी कवितेची पालखी तेवढ्याच सक्षमपणे वाहिली आहे. संत
जनाबाई, मुक्ताई, कान्होपात्रा, सोयरा इथपासून सुरू झालेला हा प्रवास
निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी, शांता शेळके, पद्मा गोळे आणि पुढे मनाचे पदर
उलगडणाऱ्या अरुणा ढेरें आणि त्या पुढेही जात राहिला. या सगळ्यांच्या
प्रतिभेचं कोंदण लेऊन अवतरलेल्या कविता पाणीदार तेजस्वी मोत्यांसारख्या
आहेत.
जीवनानुभवाला उत्कटपणं भिडणाऱ्या या सगळ्यांच्या कवितांमध्ये निसर्ग
निरनिराळ्या रुपात भेटतो. नव्हे तो अपरिहार्यपणे येतोच. पावसावर तर कवी
मनाचं अपार प्रेम.
श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहिकडे
असं बालकवी लिहितात. तर
श्रावणात घननिळा बरसला
असं पाडगावकर म्हणतात
गेले केतकीच्या बनी, गंध दरवळला मनी
नागासवे गळाले देहभान रे
असं कवी बी लिहितात तर
केळीचे सुकले बाग असूनि निगराणी रे
असं कवी अनिल म्हणतात
पाऊस कधीचा पडतो, झाडांची हलती पाने
हलकेच जाग मज आली, दु:खाच्या मंद स्वराने
असं ग्रेस लिहितात
श्वास तुझा मालकंस स्पर्श तुझा पारिजात
सखया रे आवर ही चांदरात
असं सुरेश भट म्हणतात
पहिल आभाळ, पहिल रान
पहिल्या झोळीत पहिलच पान
असं सौमित्र म्हणतो
इतकी बेपर्वाई फक्त आकाशालाच शोभते
पण तू आकाशच राहा, नाहीतर डोळे उचलून बघायचे तरी कोणाकडे
असं पद्मा गोळे म्हणतात
अरे खोप्यामधी खोपा
सुगरणीचा चांगला
देखा पिलासाठी तिनं
झोका झाडाले टांगला
असं बहिणाबाई म्हणतात
तोच चंद्रमा नभात, तिच चैत्र यामिनी
असं शांताबाई लिहितात
आणि...
मावळत्या दिशेपाशी
पाणी निळे होई
चंद्रभागेपरी, सांज वाहते गे बाई
असं अरुणा ढेरे म्हणतात
अशाच निसर्ग रुपकातून जीवनानुभव व्यक्त करणाऱ्या दोन मराठी सारस्वतांच्या कविता आज आम्ही आपल्यासमोर सादर करणार आहोत.
स्मरते कधी भरली नदी
अन गर्द झाडी काठची
पावसाळी चांदणे
अन साऊली घनदाटशी
हिरवे दिवेसे काजवे
मरवा हवेचा तीक्ष्णसा
दूर कोण्या पाखरांचा सूर जख्मी क्षीणसा
तो धुराने फासलेला, झोपड्यांचा पुंजका
गोठलेले ते धुके - छे! कोंडलेला हुंदका
असं लिहिणारे बा. भ. बोरकर
आणि
सफरचंदाच्या रंगांतुन
असेच अवचित रांगत आले
लाल उकलत्या पेरूमधूनी
बघून तिजला खुदकन हसले
टपोर द्राक्षांच्या घोसातून
बिलगे तिजला झेप टाकुनी
फुटली द्राक्षे कायेवरती
गेली अवघी मग बावरुनी
लपवू कोठे मुळी कळेना
नटरंगी हा अवखळ कान्हा
हे लिहिणाऱ्या इंदिरा संत
त्यांच्या कवितांमधून आपल्यापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत.
रसिकहो, बोरकरांची कविता म्हणजे आषाढातल्या घनघोर पावसात लख्खकन तेजाळणाऱ्या वीजेसारखी अंतर्बाह्य दीपवणारी
आणि
इंदिराबाईंची कविता श्रावणातल्या रिमझिम पावसासारखी आत-आत झिरपत जाणारी
बोरकरांची कविता उघड्या जीवन सत्याला सामोरी जाणारी आणि बाईंची कविता स्त्री सुलभ अवगुंठनातून सत्य उलगडणारी.
दोघांचीही कविता जन्मत:च स्वत:भोवती निसर्ग लपेटून येते. त्यांच्या
कवितेच्या शब्दाशब्दातून निसर्ग ठिबकतो आणि म्हणूनच दोघेही निसर्ग यात्री
आहेत.
१. आला श्रावण
२. माझ्या गोव्याच्या भुमीत
गोव्याची भूमी ही कलावंतांना जन्म देणारी आहे. साहित्य संगीत
क्षेत्रातले कितीतरी कलावंत याच भुमीत जन्मले. इथल्या लाल मातीच्या उदरातच
कलावंत घडविण्याची किमया आहे की काय न कळे. बोरकरांचा जन्मही गोव्याचा.
तिथल्या निसर्गाचा, संस्कृतीचा अमिट ठसा बोरकरांच्या काव्यावर उमटलेला
दिसतो.
गोव्याचा समुद्र, पुळणी, माडांची बने, नद्या आणि डोंगर, खारा वारा,
मासळीचा गंध, देवळे, चर्चेस, पूल, होड्या, हे सगळं सगळं त्यांच्या कवितेत
प्रतिबिंबित झालं आहे. बोरकरांच्याच शब्दात सांगायचं तर
पुरा माझ्या कवनांचा
गंध तेथे उलगडे
असं ते म्हणतात.
माझ्या गोव्याच्या भूमीत ही बोरकरांची कविता म्हणजे त्यांचं मातृभुमीला
वंदन आहे. त्या वात्सल्याच्या ओव्या आहेत. बोरकरांनी गोव्यावर प्रेम केलं
ते नुसत तिथल्या निसर्गावर नव्हे. बोरकरांनी गोवा मुक्ती संग्रामातही
हिरीरीने भाग घेतला होता. पुढे त्यांना त्यांच्या या कार्यासाठी ताम्रपट
देऊन गौरविण्यातही आलं.
ऐकूया माझ्या गोव्याच्या भूमीत
३. तव नयनांचे दल हलले ग
बोरकरांच्या कवितेविषयी बोलताना एकदा पु. ल. म्हणतात, बोरकरांच्या
कवितेत Infinite variety आहे. म्हणजे अनंत विविधता आहे. हे सांगताना पु. ल.
शेक्सपिअरच्या अँटनी ऍण्ड क्लिओपात्रा नाटकातल्या Ino Barbus च्या
वाक्याचा संदर्भ देतात. क्लिओपात्राच्या सौंदर्याविषयी बोलताना तो म्हणतो
Age cannot wither her nor custom stale her infinite variety पु. ल.
म्हणतात बोरकरांची कविता तशीच आहे, अनंत विविधतेनं भरलेली, कधीही शिळी न
होणारी. एक चिरंतन तारुण्याची उत्कटता त्यात आहे. ऐकूया अशीच एक उत्कट
कविता. तव नयनांचे दल हलले गं
४. हिरव्या माडांच्या
गोव्याचा निसर्ग बोरकरांच्या कवितेमध्ये ठायी ठायी विखुरला आहे.
गोव्याचा निसर्ग तृप्त करणारा आहे. निसर्गातली ही तृप्ती बोरकरांच्या
जीवनातही आहे. त्यांच्या जीवनातली ती तृप्ती, शांतता, समृद्धी, माधुर्य
त्यांच्या कवितेत पुरेपुर उतरलं आहे. आणि म्हणूनच बोरकरांच्या कवितेचा रंग
हिरवा आणि निळा आहे. तृप्तीचा आहे. त्यांच्या कवितेतलं मौन खूप खूप बोलकं
आहे.
५.पौषातील उन गडे
बोरकरांची कविता गात गात जन्माला येते. तिला तिची लय आहे. तिला तिचा
ताल आहे. इथे त्यांच्या कवितेची जातकुळी रविंद्रनाथांच्या कवितेशी जुळते.
रविंद्रनाथांची कविताही गात-गातच जन्माला यायची. तेच आज रविंद्र संगीत
म्हणून ओळखलं जातं.
थोड्याशा अनुनासिक स्वरात बोरकर जेव्हा त्यांची कविता गाऊन दाखवत तेव्हा त्या कवितेची खुमारी अधिकच वाटे.
पु. ल. म्हणतात बोरकरांच्या कवितेला दुसऱ्या कोणी दिलेली चाल किंवा
तिचं केलेलं गायन मला भावत नाही. बोरकरांच्या कवितेला दुसऱ्या कोणाच्या
प्रतिभेचा स्पर्श नकोसा वाटतो. पण आता बोरकर नाहीत, पण त्यांच्या कविता
आहेत आणि त्यांच्यावर कवितेवर प्रेम करणारे आपण सर्व आहोत. ऐकूया स्वत:ची
लय घेऊन जन्माला आलेली बोरकरांची कविता.
६. आणि मज माऊलीच जाहली
बोरकरांच्या कवितेवर संत साहित्याचे संस्कार आहेत तसेच लोकसाहित्याचेही
आहेत. भजन-कीर्तनाची परंपरा त्यांच्या घरातच होती. संस्कृतीनं संपन्न
असलेल्या गोव्यात त्यांचं बालपण गेलं. त्यामुळे दारावर येणारे वारकरी,
भुत्ये यांचं गायन ऐकतच बोरकर मोठे झाले. या सगळ्या पारंपरिक साहित्याचे
संस्कार त्यांच्या कवितेवर झाले आहेत. बोरकरांच्या काही कविता म्हणजे
आधुनिक कवितेतील अभंग आहेत. बोरकरांनी त्यांच्या कवितेतून स्त्रीत्वाची
अनेक रुपं उलगडली आहेत. त्यात अभिसारिका आहे. पत्नी आहे, प्रेयसी आहे आणि
अगदी गोव्यातील हिप्पीणीही आहे. त्यांची जपानी रमला ही जपानी स्त्रीच्या
सौंदर्याचं वर्णन करणारी कविता तर प्रसिद्धच आहे. मात्र काही कवितांमधून
त्यांनी स्त्रीत्वाची पूजा बांधली आहे. ऐकूया अशीच त्यांची आणि मज माऊलीच
जाहली ही कविता...
७. जलद भरूनि आले...
बोरकरांच्या कवितेला आध्यात्मिक बैठक आहे. कदाचित त्यांच्या घरातील
धार्मिक संस्कार आध्यात्मिक वातावरण त्याला कारणीभूत असेल. कदाचित
त्यांच्या घरातील धार्मिक संस्कार, आध्यात्मिक वातावरण त्याला कारणीभूत
असेल.
तप्त उन्हाळ्यानंतर निळ्या ढगांची प्रतीक्षा सगळ्यांनाच असते. मात्र
निळे ढग आकाशात दाटून आले की बोरकरांना जसे प्रतिभेचे धुमारे फुटतातत तसे
ते तुम्हा-आम्हाला फुटत नाहीत. हेच बोरकरांचं वेगळेपण आहे. मात्र बोरकरांची
कविता निळे ढग आणि टपटप पडणाऱ्या थेंबांपाशी थांबत नाही, बोरकरांना त्या
निळ्या जलदांमध्ये हरिकरुणा दिसते आणि पाऊस धारांनंतर श्रांत झालेल्या तप्त
धरतीचा मृदगंध त्यांना पृथ्वीचा वत्सल आशीर्वाद वाटतो. आणि म्हणूनच ते
बोरकर आहेत.
८. हवा पावसाळी
बोरकर पाच-दहा वर्षाचे असतानाच त्यांनी पहिला अभंग रचला होता आणि
त्यामध्ये बाका म्हणे अशी स्वत:ची नाममुद्राही रेखली होती. मात्र या मुलाला
कवित्वाची देण आहे, हे घरात कळल्यावर त्यांचं कौतुक न करता त्यांची आजी
म्हणाली होती, बाका आधी संत व्हावं, मग अभंग रचावा. त्या संभाषणानंतर
बोरकरांनी कवितेची उर्मी दाबून टाकली होती. पण कविता त्यांच्या आत होतीच,
त्यामुळे दाबून ठेवलेलं वरचं कवच उडवून ती बाहेर प्रकटलीच आणि स्वत:च
तत्वज्ञान घेऊन प्रकटली. त्यामुळे बोरकर त्यांच्या कवितेतून पावसाचं वर्णन
करीत असले तरी त्यातून जीवन तत्वज्ञान सांगणाऱ्या ओव्या आपसूकच प्रस्फुटीत
होतात.
सुखाच्या तळाशी, किती दु:खराशी
उरी कारणावीणही कालवे
ऐकूया बोरकरांची हवा पावसाळी
९. संधिकाल
बोरकर म्हणतात कवितेचा जन्म म्हणजे process of self discovery आहे. ती
आत्माविष्काराची साधना आहे. बोरकरांच्याच दृष्टीनं त्यांच्या कवितेकडे
पाहिलं की त्याचं वेगळेपण जाणवतं.
संधिकाल माणसाला अंतर्मुख करतो. तो आयुष्याचा असो की दिवसाचा. प्रत्येक
ऋतूचा संधिकाल निरनिराळा. बोरकरांनी ग्रीष्मातल्या एका अशाच संध्याकाळचं
वर्णन केलं आहे.
१०. थवे
बोरकरांच्या कवितेसारखा रंगोत्सव क्वचितच कुणाच्या कवितेत आढळेल.
हे विश्व म्हणजे परमात्म्याची महान कलाकृती आहे, असं मानणाऱ्या बोरकरांचं कविता लेखन म्हणजे परमात्म्याची साधनाच होती.
बोरकरांची कविता म्हणजे कसबी चित्रकारानं रेखाटलेलं अनुपम निसर्ग चित्र
आहे, असं भासतं. नानाविध रंगांचे बुधले समोर मांडलेले असावेत. आणि
चित्रकारानं हातातला कुंचला त्यामध्ये बुडवून कॅनव्हॉसवर सहज फटकारे मारत
अप्रतिम निसर्ग चित्र काही क्षणात साकारावं, अशीच बोरकरांची कविता
सप्तरंगात न्हाऊन आपल्यासमोर उभी ठाकते आणि त्या कवितेतला कोणता रंग अधिक
लोभस, हवाहवासा हे ठरविण्यात आपण हरवून जातो.
११ दंश
बोरकरांची कविता ज्या काळात जन्माला आली त्या काळात मराठी कवितेचे अनेक
प्रवाह दुथडी भरून प्रवाहित झाले होते. त्यावेळी कुसुमाग्रज समाजनिष्ठ
कविता लिहित होते. मर्ढेकर यंत्रयुगीन माणसाचं दु:ख टिपत होते. मुक्तिबोध
श्रमाची आराधना करणाऱ्या नवमानवाची कविता लिहित होते.
बोरकरांच्या कवितेचा प्रवाह अगदी निराळा होता. तो अभिजात भारतीय
संस्कृतीशी नातं सांगणारा होता. म्हणूनच बोरकरांच्या कवितेची नाळ
टागोर-अरविंदांच्या कवितेशी जुळते. तांब्यांच्या कवितेचा वारसा ती पुढे
नेते. रसरशीत जिवंतपणा बोरकरांच्या कवितेत ठायीठायी भेटतो. त्यांची कविता
निवृत्तीपर नाही, प्रवृत्तीपर आहे. बोरकरांची कविता जीवनातल्या सौंदर्याची
पुजा मांडते. बोरकरांच्या कवितेतील निसर्ग कधी परमतत्वापर्यंत नेऊन
पोहोचवतो, कळतही नाही आणि त्या कवितेच्या निळाईत आपण हरवून जातो.
१२ ढवळे ढवळे
बोरकरांनी त्यांच्या कवितांमधून जवळपास ३५० वृत्त-छंद वापरले आहेत.
त्यांच्या कवितेवर जसे संस्कृत साहित्याचे संस्कार आहेत, तसेच सौंदर्यलक्षी
पोर्तुगिजी संस्कृतीचेही आहेत. ग्रीक साहित्यातील सौंदर्यदृष्टीही त्यात
आहे. गोव्यातील लोकसंस्कृतीचेही संस्कार आहेत. कवितेतील अंत:संगीत ही किती
मौलिक गोष्ट आहे, याची जाणीव बोरकरांच्या कवितेनं प्रथमच मराठी कवितेला
करून दिली. बोरकरांच्या कवतेत सुर, छंद, ताल, आशय यांची एकत्र नांदणूक आहे.
पु. ल. म्हणतात, पाश्चात्य संगीतातील हार्मनी सारखच अनेक संस्कृतींचं
मिश्रण बोरकरांच्या कवितेत दिसतं. बोरकर स्वत:च म्हणतात, ग्रीकांची
सौंदर्यदृष्टी आणि भारतीय संस्कृतीतील आध्यात्म यांचा मिलाप त्यांच्या
कवितेत आहे. ऐकूया बोरकरांची अशीच अंत:संगीताचा साज लेऊन आलेली कविता.
१३.पर्जन्याची पिसे सांडली
बोरकराच्या कवितेविषयी अरुणा ढेरे लिहितात बोरकरांचा धर्म द्वंद्वाचा
स्वीकार करताना आवश्यक असणारा तोल सांभाळणारो. लोकान्त भोगतानाही आतला
एकान्त ढळू द्यायचा नाही. भोगाचा उत्सव मांडताना त्यागाची आंतरपुजा नजरेआड
होऊ द्यायची नाहीहा तोल म्हणजे बोरकरी कवितेचा ध्यानबिंदु आहे. एकदा या
बिंदुवर दृष्टी स्थिर केली की समाधी लागते.
इथे पुन्हा बोरकरांची कविता समजून घेताना त्यांच्याच कवितेतील शब्दांचा आधार घ्यावा लागतो. बोरकर म्हणतात
माझे सुख मोठे धुंद
रसलंपट'मी तरी मजला
अवचित गोसावीपण भेटे
१४ निळा
बोरकरांच्या कवितेला चैतन्याचा स्पशृ आहे. १९५८ साली सोलापूरला
भरलेल्या कविसंमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना बोरकर स्वत:च म्हणाले
होते, कविता हा लौकिक पातळीवरचा शब्दव्यवहार नव्हेच. ती अलौकिक पातळीवरची
शब्दघटना आहे. बोरकरांनी केलेल्या या व्याख्येतच सगळं आलं. पुढे ते
म्हणतात, कवितेचा मंत्र कवीला नुसता दिसत नाही तर ऐकूही येतो. बोरकर
कवितेला मंत्र म्हणतात. खरंच बोरकरांची एकेक कविता म्हणजे निसर्गाच्या
अणुरेणुत सामावलेल्या परमेश्वराला आवाहन करणारे मंत्र आहेत. या मंत्रांचा
आस्वाद घेताना आपलंही मी-तू पण संपत आणि उरते सृष्टीशी तादात्म्याची
अवस्था. केवळ अद्वैत.
१५. वारुणी रात
प्रत्येक कवी किंवा साहित्यकार पूर्वसुरींना वाट पुसतच वाड्.मयीन
वाटचाल करीत असतो. बोरकर त्यांच्या कवितेचा नवा संप्रदाय निर्माण करण्यात
यशस्वी ठरले असले तरी त्यांच्या कवितेवरचा केशवसुत गोविंदाग्रज किंवा
बालकवींसारख्या कवींचा प्रभाव नाकारता येत नाही. भा. रा. तांबेंना तर बोरकर
गुरूच मानतात. तांब्यांच्या घराण्याची गायकी पुढे नेणारा कवी, असेही
बोरकरांबद्दल समीक्षकांचे मत आहे. तांब्यांनी स्वत: बोरकरांविषयी
गौरवोद्गार काढताना He is a new star on horizen असं म्हटलं होतं.
बोरकरांची वारुणी रात कविता ऐकताना बालकवींच्या फुलराणी कवितेची आठवण
येते. फुलराणीत बालकवींनी केलेलं निसर्ग वर्णन वाचून ते निसर्ग चित्र
डोळ्यापुढे उभं राहतं, तसंच वारुणी रात वाचतानाही तो निसर्ग हुबेहुब
डोळ्यापुढे येतो. जणूकाही निसर्ग रंगांमध्ये कुंचला बुडवून कोणीतरी मोठ्या
कॅनव्हासवर ते चित्र रेखाटतय, इतकं तरल शब्दचित्र बोरकर रेखाटतात.
ऐकूया वारुणी रात
१६. सरीवर सरी आल्या गं
बोरकरांनी मराठी कवितेला नवे आयाम दिले. त्यांची कविता उमटलीच स्वत:चं
वेगळं वैशिष्ट्य घेऊन. त्यामुळं मराठी समीक्षकांना आणि साहित्यिकांनाही
बोरकरांची नोंद घ्यावी लागली. अनेंकांनी त्यांना अनेक विशेषणांनी नावाजलं.
वि. स. खांडेकरांनी त्यांचा उल्लेख ज्वालेची पूजा करणारा पारिजातक बसा
केला आहे. मंगेश पाडगावकरांनी त्यांना उन्हाचं चांगणं करणारा कवी म्हटलयं.
कोणी त्यांना मांगल्याचे पुजारी म्हटलयं, कोणी त्यांनाजीवनप्रेमी म्हटलयं.
पुलंनी त्यांना आनंदयात्री म्हटलयं. मात्र पु. ल. म्हणतात, इतक्या
विशेषणांनंतरही बोरकरांची कविता त्याही पलिकडे दशांगुळे उरते. अगदी तो
परमात्मा दशांगुळे उरला प्रमाणेच.
बोरकरांच्या कवितेत गं. हे अक्षर वारंवार येतं. आणि मोठं गोड वाटतं. उदाहरणच द्यायचं तर, तव नयनांचे दल हलले गं.
किंवा फुटल्या गं उकळ्या
बोरकरांच्या कवितेते येणारा गं. ऐकून पुल गंमतीने म्हणायचे, बोरकरांनी
गं. ची बाधा झाली आहे. गंमतीचा भाग सोडला तर त्यांच्या कवितेतला गं मोठा
गोडवा घेऊन येतो. ऐकूया अशीच गं ची खुमारी घेऊन आलेली त्यांची कविता. सरीवर
सरी आल्या गं.
१७.जीवन त्यांना कळले हो
बोरकरांची कविता ज्ञानोबा-तुकोबांचा वारसा सांगणारी. जीवनाचे तत्वज्ञान
मांडणारी. नव्हे त्यांची एकेक कविता म्हणजे वेदांची एकेक ऋचा आहे.
महात्मायन या त्यांच्या अपूर्ण राहिलेल्या दीर्घ कवितेत ते लिहितात,
समुद्र होऊनी चंद्र रेखावा
चंद्र होऊनी अग्नि भोगावा
हे लिहिणारे बोरकर आणि त्यांची कविता दोन्ही अलौकिक पातळीवरचे. लहान न
कळत्या वयात बोरकरांनी पहिल्यांदा अभंग लिहिला, तेव्हा त्यांची आजी म्हणाली
होती, आधी संत व्हावे, मग अभंग रचावा.
बोरकरांमध्ये हे संतत्व मूळातच होतं. म्हणूनच जीवन त्यांना कळले हो
सारखं उपनिषदातलं तत्वज्ञान मांडणारं काव्य त्यांच्या लेखणीतून प्रसवलं.
ऐकूया, जीवन त्यांना कळले हो
इंदिरा संत
१. शेला
इंदिराबाई आणि नारायण संत या दाम्पत्याचा एकत्रित कवितासंग्रह म्हणजे
सहवास. मात्र इंदिराबाईंची निजखूण उमटली ती १९५१ साली प्रकाशित झालेल्या
शेला या त्यांच्या स्वतंत्र अशा पहिल्या काव्यसंग्रहात. आणि इंदिरा नावाची
वीजरेघ रसिकांच्या मनात लखलखून उमटली. ऐकूया त्यांची शबमदांचं गारुड करणारी
शेला ही कविता.
२. निळी पांढरी दुपार
इंदिराबाईंच्या कविता लेखनाला सुरुवात झाली त्यांच्या वयाच्या
सोळाव्या-सतराव्या वर्षी. मात्र प्रतिभेला बहर आला तो नारायण संत त्यांच्या
आयुष्यात आल्यानंतर. दोघांच्या एकत्रित कवितांचा सहवास हा कवितासंग्रह
१९४० साली प्रसिद्ध झाला. त्यामध्ये प्रीतीच्या कविता अधिक होत्या. पुढे
ना. मा. संतांचं अकाली निधन झालं आणि बाईंनी कवितेला जवळ करीत आपलं एकाकीपण
त्यात विरघळून टाकलं. त्यामुळ आक्कांची कविता निसर्गाच्या उपमांमधुन
त्यांचं दु:ख मांडत जाते. म्हणूनच प्रत्येकच स्त्रीला ती आत्यंतिक जवळची
भासते. बाईपणाच्या खुणा त्यांच्या कवितांमधून अलगद भेटीला येतात. ऐकूया
त्यांची निळीपांढरी दुपार ही कविता.
३.झंझावात
स्वत:च्या कवितांमधील निसर्गप्रतिमांबद्दल बोलताना आक्का स्वत:च
सांगतात, माझ्या भावजीवनात प्रीतीइतकंचं निसर्गालाही स्थान आहे. निसर्गाची
मला लहानपणापासूनच आवड आहे. आकाश, पाणी, वृक्ष यांच मला आकर्षण आहे.
त्याचप्रमाणे तळपणारं उन, धो-धो पडणारा पाऊस, धुक्याच्या लाटा यांचही.
म्हणूनच माझ्या कवितेत निसर्गाला अधिक जागा असे. पण हा निसर्ग नुसता
वर्णनापुरता येत नाही. त्याच्या दर्शनानं माझ्या मनात जे रंगतरंग निर्माण
केलेले असतात, त्याच्या रुपात तो येतो. ऐकूया वर्षा रुतूचं वर्णन करणारी
इंदिराबाईंची ही कविता.
४.वाटे मला
इंदिराबाईंच्या संपूर्ण जीवनप्रवासात निसर्ग त्यांचा सखा आहे. या
निसर्गाला स्वत:चा रंग, रुप, स्वभाव, स्पर्श, रस, सगळं माणसासारखंच आहे.
त्या निसर्गाला बाई आपलं सुख-दु:ख सांगतात. त्याच्याशीच हितगुज करतात.
निसर्ग, प्रेम, विरह, दु:ख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे पंचप्राण
आहेत. कोणताही भावघटक स्वतंत्रपणे येत नाही. प्रेम म्हणजेच दु:ख.
दु:खाच्या गाभ्यातच विरह. विरहाची मिठी एकाकीपणाला आणि या सगळ्यात निसर्ग
विरघळून एकजीव झाला आहे.
५. पाखराच्या पिसापरी
दु:ख हा इंदिराबाईंच्या कवितेचा धर्म आहे. कविता ही फक्त आपली
सृजनप्रक्रीया नाही तर साथ सोडून गेलेल्या साथीदाराशी संवादाचा हा एकमेव
मार्ग आहे. या जाणिवेनं त्यांनी कविता लिहिली. पन्नास वर्ष त्यांचा हा
संवाद सुरू होता. सुरुवातीला चिरविरहाचे दु:ख, पुढे नात्याची अनेक रुपं
कवितेतून प्रगट'होऊ लागली.आठवणींचा गोडवा, वेदना, नव्यानं सहवास, त्यांच्या
अनुभवांच्या संचिताला फुटलेली पालवी, जमिनीवर विखुरलेल्या बियांतून सहज
रोपं रुजावित तशी कविता आक्कांच्या अंतर्मनातून उमलत गेली. निसर्गाचे नाना
विभ्रम उलगडत गेली. सहजपणे, अगदी अलगद.
६.धुसर विरल
कापूस पिंजताना त्यातून अनेक म्हाताऱ्या हवेत तरंगू लागतात. त्यातील
एखादी खेळणाऱ्या मुलांच्या हाती लागते. तसे हे अनुभवांचे धुसर तरंगते
काहीतरी माझ्या हाती लागते आणि त्यातून कविता निर्माण होते. असं आक्कांनीच
त्यांच्या कवितेच्या निर्मिती प्रक्रीयेविषयी म्हटलं आहे. खरंचं
म्हातारीच्या मागे धावणाऱ्या मुवाचं निरागसपणं त्यांच्या कवितेतून
स्पष्ट'दिसतं.
इंदिराबाई श्रेष्ठत्व देतात ते कवितेला. काव्याच्या सोबतीला त्यातील
सुप्त शक्तीला. ती निर्माण करणाऱ्या कवीला नव्हे. कविता ही आपल्यासाठी
श्वासाइतकीच जीवनदायी आहे. अशी कृतज्ञता कवितेविषयी त्यांच्या मनात आहे.
७. आली माहेरपणाला
बालपणापासूनच स्त्रीगीत जमविण्याचा इंदिराबाईंना नाद होता. ओव्या
त्यांना फार आवडतं. तवंदी या त्यांच्या जन्मगावी जात्यावरच्या ओव्यांनीच
त्यांना जाग येत असे. त्या ओव्यांवरच त्यांचं लहानवयातलं भावजीवन पोसलं
गेलं. या स्त्रीगीतांचा संस्कार माझ्या मनावर खोलवर आहे. असं आक्कांनीच
म्हटलयं. त्यामुळेच असेल कदाचित स्त्रीच्या भावजीवनातल्या रेशमी धाग्यांची
वीण त्यांच्या कवितेत वारंवार गुंफली जाते. आणि ती नाजुक गुंफण
काव्यरसिकालाही हळवं करून जाते.
८. नको नको रे पावसा
इंदिराबाईंच्या कवितेविषयी बोलताना माधव आचवल म्हणतात, इंदिराबाईंच्या
व्यक्तिमत्त्वानं तोललेली त्यांच्या काव्याची कमान ही स्मृतीतील भूतकाळ आणि
भविष्यातील जीवनाचा अंत यांना जोडीत असताना या विस्तृत कालभागाबरोबर
तितकाच विस्तृत स्थलभाग व्यापून जाते. त्या एकीकडे लहानशा अगदी लहानशा
घटनेतील अनुभवाचं स्पंदन पकडतात आणि ते सापडल्यानंतर मात्र पसरुन देतात
क्षितीजापासून क्षितिजापर्यंत.
इंदिराबाईंच्या मनाचं अवघ क्षितीज व्यापलं आहे त्यांच्या सख्यानी.
इंदिराबाई, त्यांची कविता त्यातून येणारा निसर्ग ही त्रिवेणी धारा जाऊन
अखेर थांबते सख्याच्या स्मृतीपीशी. आणि इंदिराबाईंच्या सख्याच्या आठवणींनी
ओथंबलेल्या कवितेत आपणही हरवून जातो.
९. मेंदी
आक्कांच्या बालपणापासून त्यांच्या मनावर स्त्रीगीतांचा खूप प्रभाव आहे.
त्यामुळे त्यांच्या कवितेतही स्त्री प्रतिमा अगदी सहजपणे येतात. आणि
आक्कांची अशी कविता वाचताना बहिणाबाई चौधरींची हटकून आठवण येते. इंदिराबाई
स्वत:च सांगतात, त्याप्रमाणे त्यांची कवितेशी ओळख पारंपरिक रचनांमधून झाली.
कलांची जीवनाशी असणारी निकटता आणि त्याचा उत्स्फूर्त आणि सहज आविष्कार
यांचा ठसा इंदिराबाईंच्या कवितेवर फार गाढ दिसतो.
आक्कांच्या मेंदी संग्रहातल्या कवितांबद्दल गंगाधर गाडगीळ लिहितात,
मेंदीनं आपण वेडावून गेलो. अनुभवाच्या ज्या छटा शब्दांना कधी वेचता येतील,
असे वाटत नाही, त्या त्यांनी वेचल्या आहेत.
निसर्गातल्या रंगगंधांनी माखलेले त्यांचं मन तो तरल अनुभव शब्दांमध्ये
बांधू लागलं. आणि बघता बघता त्या शब्दांची रंगीबेरंगी फुलपाखरांसारखी मोहक
कविता झाली. ऐकूया आक्कांची मेंदी ही कविता.
१०. रंगमंच
छोट्याशा वर्तुळातील काचेच्या तुकड्याच्या साहाय्यानं अनंत रंगसंगती
आणि चित्राकृती दिसतात नं, तशा कॅलिडोस्कोपसारखीच इंदिराबाईंची कविताही
अनंत भाववृत्तींनी भरलेली, विरह, दु:ख, वेदना, शारीर अनुभव, वात्सल्य अशा
विविधरंगी भावछटांचे दर्शन घडवते.
दु:ख हे त्यांच्या कवितेचं उगमस्थान असलं तरी जीवनातील रुसवे-फुगवे,
खट्याळपणा, मिस्कीलपणा असे इतरही भाव त्यांच्या कवितेतून स्वाभाविकपणे
व्यक्त होतात. दु:ख हा त्यांच्या कवितेचा गाभा असला तरी त्यांची कविता रडकी
कडवटपणाची नाही. त्या कवितेत प्राप्त परिस्थितीची स्वीकार आहे.
११.हस्त
इंदिराबाईंच्या कवितेत सामाजिक सांस्कृतिक संदर्भ अपवादानेच येतात.
इंदिराबाईं स्वत:च त्याबद्दल बोलताना म्हणतात, माझ्या बहुसंख्य कवितांतून
प्रीती आणि निसर्ग यांनाच अभिव्यक्ती मिळाली आहे. निसर्ग सुद्धा पुष्कळदा
निसर्गासाठी आला नसून प्रीतीच्या अभिव्यक्तीसाठी आलेला आहे. समाजातील
अनुभवांही मन सुन्न होतं पण त्या अनुभवांना माझ्या कवितेत तितकं स्थान
नाही. याचं कारण सांगताना इंदिराबाई म्हणतात की अनुभुतींना अभिव्यक्त
करणारे विशिष्ट एरीअल्स कवीच्या मनात उभे असावेत. त्यानुसार त्या अनुभुती
प्रस्फुटीत करणारी कविता कवीच्या मनातून उमटत असावी. इंदिराबाईंच्या हस्त
कवितेत मात्र सामाजिक संदर्भ अवचित भेटीला येतो, ऐकूया
१२. तवंग
इंदिराबाईंच्या कवितेत येणारा निसर्ग स्वत:चा रंग, रुप स्वभाव, स्पर्श,
रस असे सगळे माणसासारखे भाव घेऊन येतो. रंगांची मुक्त उधळण त्यांच्या
कवितेत ठायी ठायी भेटीला येते. त्यांच्या कवितेतला पोपटी भाव मनातला हिरवा
गंध, काळा मत्सर, स्तब्ध निळे मन, दिवसाचा पांढरा वणवा, डोळ्यातले लाल धुके
अशा अनेक रंग प्रतिमा येतात. स्त्री जीवनातल्या प्रतिमा शब्दांचं
पारदर्शित्व आणि सौंदर्याच्या शेकडो छटा पाझराव्यात, तसं शब्दांचं बहुविध
अर्थलावण्य त्यांच्या कवितेचं सामर्थ्य आहे. ऐकूया त्यांची रंगामध्ये
न्हाऊन निघालेली तवंग ही कविता.
१३. कुब्जा
साधेपणा, स्वाभाविकता, प्रांजळपणा आणि अखंड संवादलय ही इंदिराबाईंच्या
कवितेची वैशिष्ट्य. स्वत्वानं सुंदर ठरलेली विशुद्ध भावकविता असं इंदिरा
संतांच्या कवितेचं वर्णन केलं जातं.
अजिंठ्याच्या कलाकाराची विसरुन राहिलेली एक पुसट'रेषा माझ्या रक्तातून
वाहाते आहे. अस म्हणणाऱ्या इंदिरा संतांची कुब्जा ही कविता प्रेम आणि
भक्तीच्या अत्युत्कट बिंदुवर पोहोचली आहे. ऐकूया.
१४.हिरवे पिवळे तुरे उन्हाचे
निसर्ग, प्रेम, विरह, दु:ख आणि एकाकीपण हे इंदिराबाईंच्या कवितेचे
पंचप्राण आहेत. कोणताही भावघटक स्वतंत्रपणे येत नाही. प्रेम म्हणजेच दु:ख,
दु:खाच्या गाभ्यातच विरह. विरहाची मिठी एकाकीपणाला आणि या सगळ्यात निसर्ग
विरघळून एकजीव झाला आहे. ऐकूया त्यांची निसर्गाचा रंगोत्सव व्यक्त करणारी
सुरेख कविता.
१५. नुक्ती विरली
१६.आला कुण्या
इंदिराबाईंची एकेक कविता म्हणजे एकेक निसर्गचित्रच जणू. पांढऱ्या शुभ्र
कॅनव्हासवर कसबी चित्रकारानं रंगांचे सहज फटकारे मारत काही क्षणात निसर्ग
दृश्य साकारावं आणि पाहणाऱ्याचे डोळे तृप्त तृप्त व्हावेत, तशीच आक्कांची
कविताही ऐकणाऱ्याच्या मनाचा ठाव घेत जाते आणि त्यांच्या शब्दांच्या उत्सवात
रसिक न्हाऊन निघतो. ऐकूया अशीच शब्दांचं गारुड करणारी इंदिरा संतांची
सहजसुंदर कविता.
१७. चंद्रकळा
कविता ही केवळ सृजनप्रक्रिया नव्हे तर साथ सोडून गेलेल्या साथीदाराशी
संवादाचाही एकमेव मार्ग आहे. असे इंदिराबाईंना वाटत होते. थोडोथोडके नव्हे
तर पन्नास वर्ष त्यांनी हा संवाद चालू ठेवला. सुरुवातीला चिरविरहाचे दु:ख,
पुढे नात्याची अनेक रूपं त्यांच्या कवितेतून प्रकट होऊ लागली. आठवणींचा
गोडवा, वेदना, नव्याने सहवास हे सगळे आक्कांच्या कवितेतून उमटले आहे.
जमिनीवर पडलेल्या बियांतून रोपे रुजावित, तितक्या सहजतेनं आक्कांनी
त्यांच्या भावनांना शब्दरुप दिलं आहे. निसर्ग प्रतिमांमधून आलेले
चंद्रकळेचे वर्णन अत्यंत लोभस आहे.