Powered by Blogger.

Wednesday, 28 October 2020

 वसुंधरेच्या कल्याणाचा वसा घेतलेले कोठे दाम्पत्य
स्वाती हुद्दार
एकोणिसावे शतक म्हणजे आदर्शवादाचे शतक. इंग्रजांच्या गुलामगिरीतून भारतमातेची मुक्तता करण्यासाठी अनेक पिढ्या स्वातंत्र्य युद्धात उतरल्या. १८५७ पासून सुरू झालेल्या स्वातंत्र्य समराला अखेर १९४७ मध्ये यश प्राप्त झाले आणि भारत स्वतंत्र झाला. इंग्रजी राजवटीच्या काळात इंग्रजांबरोबर नवीन तंत्रज्ञानही भारतात आले. साहित्य आले, संस्कृती आली, नवी शिक्षण प्रणाली आली. सुधारणाही आल्या. या काळात समाजात दोन वर्ग तयार झाले. एक नवमतवादी नवश्रीमंतांचा आणि दुसरा कुठल्याही सुधारणांचा, बदलांचा वाराही न पोहोचलेल्या कष्टकरी गरीबांचा. देशाला स्वातंत्र्य मिळाले की भारत सारे जहॉ से अच्छा होईल अशी आत्यंतिक आदर्शवादी कल्पना असलेल्यांच्या भ्रमाचा भोपळा फुटला आणि शासनासह जनतेचाही सुरू झाला संघर्ष गरीबीशी, समस्यांशी. आणि मग भारताला सुजलाम् सुफलाम् करण्यात किती खाचखळगे आहेत, किती आव्हाने आहेत, किती समस्या आहेत, हे लक्षात येऊ लागले.
या काळात सामाजिक दरी वाढत गेली. श्रीमंत अधिक श्रीमंत होत गेले आणि गरीब अधिक गरीब. भारतातील अनेक सुदूर प्रांतांमध्ये तर स्वातंत्र्याच्या पन्नास वर्षांनंतरही सुधारणांचे वारेही पोहोचले नव्हते. इतकेच काय, रोटी कपडा मकान या जीवनावश्यक सोयीसुविधांविषयीही ते अनभिज्ञ होते.
या परिस्थितीत समाजातले पराई पीड जाणणारे वैष्णव जन
पांगळ्यांच्या सोबतीला, येऊ द्या बलदंड बाहू
निर्मितीची मुक्तगंगा, द्या इथे मातीत वाहू
असे म्हणत दीनोद्धाराकरीता उभे ठाकले. संपूर्ण देशभरच अशी समाजसेवकांची फळी उभी ठाकली. विदर्भातही कुष्ठसेवेचे असिधाराव्रत घेतलेल्या श्रद्धेय बाबा आमटेंनी वरोरा येथे उभारलेले आनंदवन. हेमलकसा येथे आदिवासींची सेवा करण्याचे बाबांचेच स्वप्न साकारण्यासाठी त्यांचे सुपुत्र प्रकाश आमटे यांनी उभा केलेला लोकबिरादरी प्रकल्प. गडचिरोली जिल्ह्यात आदिवासींच्या सेवेसाठी डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग यांनी अथक परीश्रमातून साकारलेले शोधग्राम. मेळघाटातील आदिवासींची अविरत सेवा करणारे डॉ. रवी कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे. डॉ. सतीश गोगुलवार आणि शुभदा देशमुख अशी आणखी किती नावे सांगावित? इदं न मम या वृत्तीने अशा अनेक ज्ञात-अज्ञात व्यक्ती सतत समाजसेवेत रत आहेत.
यातीलच एक जिगरबाज नाव म्हणजे आदिवासी डेव्हलपमेंट इनिशिटीव्हच्या माध्यमातून छत्तीसगडमधील बस्तरसारख्या अत्यंत नक्षलग्रस्त भागात आणि गोंदिया जिल्ह्यातील पाऊलझुला येथे वयाच्या ८५ व्या वर्षी आदिवासींच्या कल्याणासाठी गेल्या २५ वर्षापासून अहोरात्र झटणारे दादाजी कोठे आणि दादीजी कोठे हे नागपूरचे दाम्पत्य.
दादाजी उर्फ जयंत कोठे Oil and Natural Gas Corporation Ltd या संस्थेतून उच्च पदावरून निवृत्त झाले आणि मूळचे नागपूरकर असल्याने नागपूरमध्ये स्थायिक झाले. मुलगा आणि सून डॉक्टर तर मुलगी आहारतज्ज्ञ आणि जावई अभियंते. सगळे नागपूरमध्ये स्थायिक. आयुष्यभर उच्च पदावर कार्य केल्यानंतर आणि सगळ्या कौटुंबिक जबाबदाऱ्या योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर निवृत्तीनंतरचे सुखासिन आयुष्य कोणालाही भुरळ घालेल. दादाजीही आपले आयुष्य मुला-नातवंडांच्या सहवासात आनंदाने व्यतीत करू शकले असते. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या दादाजींनी लोकहितम् मम करणीयम् हे आयुष्याचे ध्येय मानून आदिवासी कल्याण कार्यात स्वत:ला झोकून देण्याचे ठरवले. लहानपणापासूनच दादाजींना समाजसेवेची आवड होती. नोकरीत असतानाही त्यांचे समाजकार्य सुरुच होते. दादीजींनी म्हणजे जयश्री कोठेंनीही त्यांना तेवढीच उत्स्फुर्त साथ दिली.
मात्र समाजकार्याची योग्य दिशा ठरवून त्या दिशेने वाटचाल करणे तितके सोपे नव्हते. दादाजी नागपूरला परतल्यानंतर छत्तीसगडमधील चांपा येथील भारतीय कुष्ठरोग निवारक संघाच्या संपर्कात आले. तिथल्या कार्याने भारावले. तिथे भेट दिल्यानंतर छत्तीसगडमधील आदिवासींच्या समस्याही त्यांच्या लक्षात आल्या. जीवनावश्यक सुविधांचा वाराही न पोहोचलेल्या, मुख्य प्रवाहापासून कोसो दूर असलेल्या आदिवासींसाठी कार्य उभे करायचे त्यांनी निश्चित केले. आणि जयंत कोठे आणि जयश्री कोठे या दाम्पत्याची कंटकाकिर्ण मार्गावरून वाटचाल सुरू झाली. तेव्हा दादाजींचे वय होते अवघे साठ वर्षांचे.
कार्याचे ठिकाण ठरले बस्तर. १९९८ च्या जून महिन्यात ध्येयाने भारलेली चार पावले बस्तरकडे वळली. १५ दिवसात त्यांनी हा ७२ किलोमीटरचा प्रदेश पिंजून काढला. एका आदिवासीच्या घरीच राहण्याची सोय झाली. सगळ्यात मोठी अडचण होती भाषेची. चांपा येथील एका कार्यकर्त्याच्या माध्यमातून कसाबसा तुटक संवाद सुरू होता. त्यातून दादाजींनी त्यांच्या समस्या समजून घेतल्या. तिथे खरी समस्या होत कुपोषणाची. दादाजींनी त्याच समस्येला हात घालण्याचे ठरविले आणि कार्याची मुहुर्तमेढ रोवली. तिथे कार्य उभे करण्यासाठी आधी त्या आदिवासींना आपलेसे करणे गरजेचे होते. दादा-दादींनी ते असिधाराव्रत स्वीकारले. त्यांची संस्कृती समजून घेतली. त्यांच्या प्रथा-परंपरा जाणून घेतल्या. त्यांच्या झोपडीत मुक्काम केला. त्यांच्याबरोबर जेवले. काही दिवसांनी दादाजींच्या कार्याची कळकळ, त्यांच्या हेतूची सत्यता याविषयी आदिवासींच्या मनात संदेह उरला नाही. दादाजींच्या देहबोलीने आदिवासींना आपलेसे केले आणि ह्रदयीच्या संवादाला मग भाषेची आवश्यकताच उरली नाही.
आदिवासींच्या उत्थानासाठी कार्य करायचे तर तिथेच मुक्काम करण्याचे ठरले. हलबरास केवळ २५ झोपड्यांचे छत्तीसगड राज्यातील बस्तरच्या दक्षिणेस असलेल्या दंतेवाडा जिल्ह्यातील गाव. येथील पुराना पुलिस ठाण्याची इमारत दादा-दादींच्या निवासासाठी निश्चित करण्यात आली. ही इमारत भूतबंगला म्हणून प्रसिद्ध होती. दादा-दादींनी मात्र तिथे राहण्याचे नक्की केले. ती इमारत अतिशय जीर्ण झालेली होती. वर्षानुवर्षे तिथे कोणाचाही वावर नसल्याने रानटी झुडपे, शेवाळ, पशु-पक्षांचा संचार अशी सगळी परिस्थिती होती. दादाजींच्या कुटुंबियांनी ती इमारत राहण्यायोग्य केली. तिथे दादा-दादींचे वास्तव्य सुरू झाले आणि त्या इमारतीचा आश्रम झाला.
बस्तरच्या या आदिवासी वस्तीत जिकडे-तिकडे हातापायांच्या काड्या झालेली आणि पोट फुगलेली बालके व कुपोषित गर्भवती महिला होत्या. दादाजींनी आधी यांना सकस आहार पुरविण्याचे मिशन हाती घेतले. मुलांना खिचडी, सोजी, वरणभात, भाज्या असा सकस आहार देणे सुरू केले. हळूहळू याचे उत्तम परिणाम समोर येऊ लागले. यामध्ये दादाजींची आहारतज्ज्ञ मुलगी वर्षा तत्ववादी हिने खूप महत्त्वाची भूमिका बजावली. हळूहळू गर्भवती महिलांचा आणि नवजात बालकांचा मृत्युदर कमी होऊ लागला. दुसरे मिशन होते आरोग्याचे. सिकल सेल हा इथला प्रमुख आजार. या आजाराविषयी जागृती करणे सगळ्यात महत्त्वाचे होते. दादाजी-दादीजींनी सिकल सेल चाचण्यांसाठी कॅंप सुरू केले. त्यासाठी नागपूरहून प्रशिक्षित डॉक्टरांची चमू बस्तर सारख्या सुदूर प्रांतात नियमितपणे जाऊ लागली. सिकलसेलसह इतरही आरोग्य चाचण्या करण्यात येऊ लागल्या. आदिवासींना पुरेशा सकस आहारासोबतच योग्य ती औषधे मिळू लागली आणि त्याचे चांगले परिणाम दिसू लागले. आदिवासींना स्वच्छतेचे महत्त्व सांगून त्यांच्याकडून स्वच्छतेचे धडे गिरवून घेतले. या सगळ्याचा संयुक्त परिणाम म्हणजे त्यांचे आरोग्य सुधारू लागले.
आहार आणि आरोग्य हे जीवनावश्यक प्रश्न सुटल्यानंतर विषय येतो शिक्षणाचा. दादाजींनी त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आणि आदिवासी मुलांकरिता शाळा सुरू केली. त्यांच्यामध्ये शिक्षणाची गोडी निर्माण केली. दादीजींनी या मुलांसाठी संस्कार वर्ग सुरू केले. शालेय शिक्षणाबरोबरच या मुलांना जीवनोपयोगी शिक्षण मिळावे, यासाठी दादाजी अधिक प्रयत्नरत होते. त्यांनी आश्रमातच निवासी शाळा सुरू केली. या मुलांना शेतीआधारीत उद्योग, मेकॅनिकल ट्रेनिंग, बांबुपासुन कलाकृती तयार करणे असे शिक्षण देणे सुरू केले. परिणामी ही मुले स्वतःच्या पायावर उभी होऊ लागली आणि त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण झाला. आदिवासींमध्येही हा विश्वास निर्माण झाला की दादाजींच्या आश्रमात गेली की मुले चांगली निघतात.
दादीजींनीही आदिवासी महिलांसाठी व्यासपीठ सुरू केले. त्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करून दिला. विविध उद्योगांचे प्रशिक्षण दिले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे धीट व्हायला शिकविले. कोठे दाम्पत्याच्या मदतीला अण्णा जोग आणि देहाडराय दाम्पत्यही आले.
बस्तरमधील काम हळुहळु बाळसे धरू लागले. दादाजींच्या प्रयत्नाने तिथे मध्य भारतातील पहिले सिकलसेल सेंटर सुरू झाले. दादाजींच्या अथक कार्याला लोकाश्रय मिळाला आणि राजाश्रयही मिळाला. तिथल्या आयुक्तांनी दादाजींच्या विनंतीला मान देऊन तिथले रस्ते बांधले. वीज आणली. लॅंडलाईन फोन सुरू केले. पाणीपुरवठ्याच्या सोयी केल्या. २५ वर्षांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी हा प्रदेश सुजलाम सुफलाम होतो आहे.
दादा-दादींच्या रुपाने इथे देवदुत आले मात्र इथले आदिवासी त्यांना प्रेमाने दादा-दादी म्हणू लागले. कोणतेही सरकार आले तरी आदिच्या माध्यमातून सुरू असलेल्या कामाची दखल घेतलीच जाते. खरे तर हा प्रांत म्हणजे नक्षली कारवायांचा गडच. आदिच्या कामाला मात्र इतके वर्षात कुठलीच बाधा आली नाही. ही दादाजी आणि दादीजींची पुण्याई आहे.
१९९५ साली सुरू झालेल्या या कार्याच्या रोपट्याचा आता वटवृक्ष झाला आहे. त्याला रसाळ-गोमटी फळेही लागली आहेत. या काळात दोन पिढ्या शिकून सवरून स्वतःच्या पायावर उभ्या झाल्या आहेत. आदिवासींची नवी पिढी पोलिसात नोकरी करतेय, कोणी स्वतःची राईस मिल सुरू केलीय, कोणी सरकारी नोकरीत आहे. एकूण दंतेवाड्यातील हा सुदूर प्रांत कोठे दाम्पत्याच्या अविरत प्रयत्नांनंतर मुख्य धारेत आला आहे.
पण हे सहज झाले नाही. त्यामागे दादा-दादींचे अपरिमित कष्ट आहेत. त्यांनी आजचा दिवस येण्यासाठी गळक्या झोपडीत तिथला धुॅवाधार पाऊस झेलला आहे. ४८ अंश तापमानात कौलारू घरात घामाच्या धारा सहन केल्या आहेत. त्यांना तिथे सापांनी सोबत केली आहे. श्वापदांनी साथ दिली आहे. मात्र ८५ वर्षांचे दादाजी आणि दादीजी हाथ है उद्योग मे रत, राष्ट्रसेवा धार कर म्हणत चरैवेती-चरैवेती हा मंत्र जपत मार्गक्रमण करीतच आहेत.
कोरोना काळातही दादाजी आणि दादीजी हलबरासलाच होते. दादाजींनी या काळाचा आदिवासी मुलांच्या सर्वांगिण विकासासाठी खूप सुंदर उपयोग करून घेतला. आदिच्या माध्यमातून तिथे शेती पिकविली जाते. शेतीत उत्पन्न झालेल्या वस्तूंवर आधारीत पुरक उद्योगांचे प्रशिक्षण या काळात या मुलांना देण्यात आले. त्यांनी भाज्यांचे विविध सॉस बनवले. सायकल दुरुस्ती, इलेक्ट्रॉनिक्स वस्तुंची दुरुस्ती असे उद्योगाधारीत प्रशिक्षणही मुलांना या काळात देण्यात आले. दादाजींनी स्वतः या काळात मुलांचे इंग्रजी आणि गणित पक्के करुन घेतले.
मुळातच कलाप्रिय असलेल्या या मुलांनी गणेशउत्सवात स्वतः तयार केलेली गणेशाची मुर्ती स्थापन केली होती. दादा-दादींच्या आश्रमात आपली मुले आहेत. म्हणजे त्यांचे कल्याणच होणार, हा विश्वास इथल्या आदिवासींच्या मनात आहे.
आदिच्या कार्याला आता राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण, छत्तीसगडचे तत्कालिन मुख्यमंत्री रमणसिंग, लोकबिरादरी प्रकल्पाचे प्रकाश आमटे या सगळ्यांनी आदिच्या कामाची दखल घेत या कार्याला नावाजले आहे.
हळुहळु इथले जीवन बदलते आहे. त्यामागे कोठे दाम्पत्याचे अविश्रांत परीश्रम आहेत. ज्या दिवशी इथे एकही कुपोषित उरणार नाही आणि शिक्षणाची गंगा इथल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहोचेल, तो सोनियाचा दिन उगवेपर्यंत आदिचे कार्य अखंड आणि अविरत सुरुच राहिल.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह