Powered by Blogger.

Saturday, 19 November 2016

नभं उतरू आलं
पाऊस बेधुंद बरसत होता. मी अंतर्बाह्य बरसत होते. या पावसाशी सूर कधी जुळले नेमकं आठवत नाही. आठवतं तेव्हापासून हा हवाहवासाच वाटला. सखा वाटला. लहानपणी हा आला की नाचऱ्या पावलांनी अंगणभर हुंदडायचे. शाळेसाठी घैतलेल्या कोऱ्या करकरीत वह्यांची पानं फाडून त्याच्या नावा तयार व्हायच्या. पावसाच्या पाण्यात नावा सोडून त्यांचं दूर दूर जाणं बघत राहायचं. प्रवाहाबरोबर हेलकावत जाणारी नाव बघत टाळ्या पिटायच्या. मनसोक्‍त भिजल्यानंतर आईच्या उबदार पदरानं खसखसून केस पुसायचे. थंडी वाजते म्हणून बोलणी खात तिच्याच कुशीत शिरायचं.
बालपण सरलं. पावसाचे नवे संदर्भ आकळले. बरसणाऱ्या बेधुंद सरींमध्ये मित्रमैत्रिणींच्या घोळक्‍यात घेतलेल्या कट चहाची चव अजूनही जिभेवर रेंगाळतेय. पुढे सख्याच्या हातातहात गुंफून अनुभवलेल्या पाऊसधारा, त्या क्षणापासून तर पाऊस जीवलग झाला, तो कायमचाच. सख्याबरोबर पावसाची आठवण आणि पाऊस आला की सख्याची आठवण, ह त्रैराशिकच तयार झालं. पुढे लग्न झाल्यानंतरची पहिली आषाढी पौर्णिमा. माहेरी होते. पाठवणी करताना आईनी ओटी भरली. भरलेल्या आटीतले चार दाणे आईच्या पदरात परत टाकताना तिच्या तृप्त डोळ्यात वात्सल्याचं आभाळं दाटून आलं आणि बाहेर बरसणारा पाऊस माझ्या डोळ्यातूनही पाझरू लागला. आईनी भरलेल्या ओटीनं माझ घर आणि मन दोन्हीही समृद्ध झालं.
या पावसाची रुपं तरी किती? कधी धुवॉंधार, कधी रिमझिम. धुवॉंधार बरसतो, तेव्हा तेव्हा एखाद्या सराईत वादकानं मृदंगावर थाप मारावी असा नादमधुर ध्वनी उत्पन्न होतो. रिमझिम बरसतो, तेव्हा वाटते की कान्ह्यानं जणू बासरीवर हळवी सुरावट छेडली आहे, मग मी "मी' उरतच नाही. माझी राधा होते आणि सभोवतालची सगळी सृष्टी गोकुळ होते. सघन आभाळ आपलं सगळं प्रेम पाऊससरींच्या रुपानं वसुंधरेच्या ओटीत टाकतं आणि सुरू होतो धरतीचा सृजनसोहळा. तृप्तीचं समाधानाचं हिरवकंच तेज धरतीच्या अंगांगावर विलसू लागतं. सारी सृष्टी सुगंधानं न्हाऊन निघते, पाऊसथेंब अंगावर झेलत जाईच्या मांडवाखाली कळ्या खुडताना तो धुंद सुगंध तनामनात भरून राहतो. त्या सुगंधानं अवघं जगणं सुगंधीत होतं. घर जवळ करण्याची ओढ लावणारी संध्याकाळ आणि नेमकी ती वेळ साधून कोसळणारा पाऊस यांची कायम युती असते. दिवे लागणीची वेळ, ओढाळ मन, बरसणारा पाऊस आणि सजणाची वाट बघत डोह्यांची झालेली निरांजन, हे सगळं म्हणजे एक अनोख भारलेपण. ढळत्या तिन्हीसांजेला पावसाच्या रिपरिपीत गोधनालाही घररी परतण्याची घाई असते. अशावेळी एखादे चुकार वासरू णकटेच मागे पडते. वृक्षाच्या अश्रयाला जाते. थंडीने थरथरणारी त्याची काया, व्याकुळ डोळे हळवा हंबर काळीज पिळवटून टाकतो. त्यावेळी मात्र म्हणावसं वाटतं, जरा उसंत घे रे बाबा! फक्‍त ते वासरू त्याच्या आईपाशी पोहोचेपर्यंत थांब, मग हवा तेवढा बरस.
काहीजणांसाठी पाऊस म्हणजे खोळंबा, पाऊस म्हणजे चिखल, पाऊस म्हणजे चिकचिक, पाऊस म्हणजे किचकिच
माझ्यासाठी मात्र पाऊस म्हणजे अलवार, पाऊस म्हणजे हळुवार, पाऊस म्हणजे हळवा, पाऊस म्हणजे बावळा, पाऊस म्हणजे संगीत आणि पाऊस म्हणजे मनमित सुद्धा.
पावसानं यावं, धुंद बरसावं, मस्तीत कोसळावं, वसुंधरेवर चितारावी सुंदर नक्षी... आणि त्याचं बरसणं ओसरल्यानंतर मी व्हावं, त्या दूरच्या तारेवर भिजलेले ओले पंख वाळवत पंखात चोच खूपसलेला एक पक्षी
स्वाती हुद्दार

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह