एक दिन अचानक
स्वाती हुद्दार
भारतीय सिनेमामध्ये व्यावसायिक सिनेमा आणि कलात्मक सिनेमा हे दोन्ही प्रवाह
समांतर चालत आले आहेत. कलात्मक सिनेमाचा इतिहास १९२०-३० च्या दशकापर्यंत
मागे जातो. १९२५ साली बाबूराव पेंटर यांनी सावकारी पाश हा कलात्मक चित्रपट
दिग्दर्शित केला होता. तेव्हापासूनच व्यावसायिक चित्रपटांच्या भाऊगर्दीत
कलात्मक चित्रपटांची छोटी पण स्पष्ट धारा प्रवाहित होतच राहिली.
पुढे सत्यजीत रे, ऋत्विक घटक, बिमल रॉय, मृणाल सेन, तपन सिन्हा, ख़्वाजा
अहमद अब्बास, बुद्धदेव दासगुप्ता, चेतन आनंद, गुरुदत्त, व्ही. शांताराम अशा
दिग्गज निर्माता दिग्दर्शकांनी समांतर सिनेमामध्ये सूवर्ण युग निर्माण
केले.
पुढे १९८९ साली हिंदी सिनेमात मैने प्यार किया, चांदनी, राम लखन अशा
व्यावसायिक चित्रपटांचा बोलबाला असतानाच मृणाल सेन यांनी दिग्दर्शित केलेला
एक दिन अचानक हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि या सिनेमाने आपली नाममुद्राही
रेखली.
रामपद चौधरी यांच्या बीज या बांग्ला कादंबरीवर आधारीत असलेला हा चित्रपट
सुरू होतो तो कोलकत्त्यातील पावसाळी रात्रीच्या पार्श्वभुमीवर. इतिहासाचे
प्राध्यापक असलेले शशांक रे घरी परतलेले नसतात. त्यांची पत्नी, दोन मुली
आणि मुलगा त्यांच्या वाटेकडे डोळे लावून बसलेले असतात. ते बाहेर जातात
तेव्हा त्यांची बायकोच फक्त घरी असते. मुले संध्याकाळी घरी परततात,
तेव्हापासून सुरू होते वाट पाहणे. ते कुठे जाण्याची शक्यता आहे, याचा
विचारविमर्श, फोन करून पाहणे, पावसामुळे बंद झालेला फोन, काळजीतून आलेला
ताण टिपत सिनेमा पुढे सरकतो.
प्रोफेसर रे नाहीसे झाल्यानंतर त्यांच्या जीवनातील अनेक प्रसंग फ्लॅशबॅकमध्ये येत राहतात. त्यातून रेंचे व्यक्तिमत्त्व उलगडत जाते.
रे हे इतिहासतज्ज्ञ आहेत. इतिहासाचा त्यांचा सखोल अभ्यासही आहे. आपली
नोकरी, आपला अभ्यास, आपले चाहते, आपले विद्यार्थी, ऐतिहासिक चर्चा असे
मनस्वी आयुष्य जगणाऱ्या रेंचा संसार त्यांच्या पत्नीनेच सांभाळला. यथावकाश
नोकरीतून निवृत्त झाल्यानंतरही रे स्वतःच्या कोषातच जगत राहिले. परिणामी
त्यांच्या तिनही मुलांशी त्यांचे दृढ नाते विणले गेले नाही. एकाच घरात
राहूनही त्यांची मने सांधली गेली नाहीत. त्यातल्यात्यात मोठ्या मुलीशी
त्यांचे बरे सूर जुळले. मुलामध्ये आणि त्यांच्यामध्ये तर कायम तणावच
राहिला.त्यांची गृहिणी असलेला पत्नी ही पती आणि मुले यांच्यातली मध्यस्थाची
भूमिका बजावत राहिली. आपण कोणीतरी विशेष आहोत, वेगळे आहोत, ही जाणीव
असलेल्या रेंनी स्वतःभोवती एक वर्तुळ आखून घेतले होते. त्यांचे स्वतःवर आणि स्वतःच्या कर्तृत्वावर अतोनात प्रेम होते. त्यामुळे कुटुंब आणि रें यांच्यात कायम एक दरी राहिली, न सांधणारी.
दिवसांमागून दिवस उलटत जातात. रेंचे घरी न परतणे, हळूहळू कुटुंबाने स्वीकारले. प्रत्येकजण आपापल्या कामाला लागला. तरी कधीतरी ते घरी परततील, ही आशा आणि त्यांच्या अशा अचानक नाहीशा होण्याामागच्या कारणांचा वेध कुटुंबातील प्रत्येकजण घेतच राहतो. या सगळ्यात एकटी उरली रेंची पत्नी. कारण पती आणि कुटुंब याशिवाय तिला वेगळे अस्तित्व नव्हते. त्यामुळे त्यांच्या नाहीशा होण्यानंतर तिच्या आयुष्यात एक रितेपण भरून राहिले. रेंनी स्वतःच स्वतःभोवती एक आभासी वलय निर्माण केले होते. त्याच्या आत खुद्द त्यांच्या पत्नीलाही स्थान नव्हते. पण त्यांच्या पत्नीने ते स्वीकारले होते. ती आयुष्यभर त्या वलयाच्या अवतीभवती वावरत राहिली. मात्र रेंच्या जाण्यानंतर तिच्या आयुष्याचा तो संदर्भही हरवला. मग ती शोध घेत राहिली त्यांच्या नाहीशा होण्याच्या कारणांचा. घरी कोणी नसताना त्यांची पुस्तके, त्यांचे लिखाण यामध्ये त्यांच्या निघून जाण्याचे धागे ती शोधू लागली आणि तिला एक दिवस सापडले त्यांनी एका कागदावर रेखलेले अपर्णा या त्यांच्या आवडत्या विद्यार्थिनीचे नाव. खरेतर अपर्णा नेहमीच त्यांच्या घरी येणारी. प्रोफेसर रे, पत्नी सुधा आणि अपर्णा असे तिघेही कधीतरी गप्पा करत बसायचे. अभ्यासातल्या काही शंकांसाठी अपर्णा रेंना रात्री-बेरात्री फोन करायची. प्रोफेसर रेंचा अहम त्यामुळे सुखावला जायचा, हे सुधाला कळायचे मात्र तिला कधी त्यात वावगे वाटले नाही. आता मात्र संदर्भ बदलले होते. त्यामुळे प्रोफेसर रेंनी रेखाटलेल्या अपर्णाच्या नावाला सुधाच्या दृष्टीने वेगळा अर्थ होता. रेंच्या नाहीसे होण्यानंतर अपर्णाचे त्यांच्या घरी येणे, फोन करणेही बंद झाले होते. सुधा या सगळ्याचे धागे एकमेकांशी सांधून पाहू लागली. सुधाने मोठी मुलगी नीताजवळ हे सगळे सांगत मन मोकळे केले. आणि सुरू झाला अपर्णाशी संपर्काचा प्रयत्न. अपर्णा लग्न करून गाव सोडून गेलेली असते. त्यामुळे मायलेकींच्या संशयाला अधिकच बळ मिळते. अपर्णाला बोलावणे पाठवले जाते. ती रेंच्या घरी भेटायला येते. तेव्हा मात्र अपर्णाचा नवरा कोणी दुसराच असल्याचे सत्य समोर येते. मायलेकी तिला रेंच्या तिच्याविषयीच्या भावनांविषयी तिला सांगतात, तिच्यासाठीही हा धक्का असतो, कारण ती रेंच्या मोठ्या मुलीच्या वयाची असते. खूप दुखावली जाऊन ती रेंच्या घरून निघून जाते. मग सुरू होतो नव्या कारणांचा शोध.
रेंना नाहीसे होऊन एक वर्ष झाले असते. पुन्हा तशीच पावसाळी रात्र असते. दोन्ही मुली आणि आई एकत्र बसून रेंच्या आठवणी जागवत असतात. तेव्हा अचानक नीता, त्यांना वाटत होते, तेवढे ते मोठे नव्हते. आणि हे सत्य ते पचवू शकले नाहीत, हेच त्यांच्या निघून जाण्याचे कारण असावे, असे आपल्या वडलांविषयीचे निरीक्षण नोंदवते. बहुतेक साऱ्यांनाच कुठेतरी हे पटते आणि इथे हा सिनेमा संपतो. मात्र तेव्हाही प्रेक्षकांच्या मनात एक प्रश्नचिन्ह उरते.
शबाना आजमी, श्रीराम लागू, अपर्णा सेन, उत्तरा बावकर, रुपा गांगुली अशा कसलेल्या कलाकारांनी हा जिवंत अभिनयाने हा चित्रपट वेगळ्या उंचीवर नेला आहे.