ब्रिटनच्या राजघराण्यातील नवा अध्यायस्वाती हुद्दारभारतावर दीडशे वर्षे राज्य करणारा इंग्लंड. एक छोटासा पण समृद्ध देश. तिथल्या प्रशस्त आणि दिमाखदार इमारती. तिथले वास्तुशास्त्र. तिथली शहरे. तिथले रस्ते, तिथली घोडाबग्गी, तिथले साहित्य. तिथली थेम्स नदी, तिथला शेक्सपिअर आणि तिथली रॉयल फॅमिली. त्यांच्या रूढी. त्यांचे परिधान, बकिंगहॅम पॅलेस, त्याचे वैभव आणि दोन शतकांपूर्वी राजघराण्यापासून विभक्त झालेली; पण तरीही इंग्लंडच्या आणि जगभरातल्या लोकांसाठी प्रिन्सेसच उरलेली लेडी डायना, सामान्य ब्रिटिश परिवारातून आलेल्या डायनाचा राजघराण्याची सून होईपर्यंतचा प्रवास, तिचे समाजकार्य, तिचे दिसणे, तिचे वावरणे आणि शेवटी तिचा अनाकलनीय गूढ मृत्यू ते तिचाच मुलगा हॅरी, त्याने अमेरिकन घटस्फोटित मेगन मार्कलशी केलेले लग्न आणि आता त्या दोघांचा रॉयल फॅमिलीतून बाहेर पडण्याचा निर्णय या सगळ्यांविषयीची चर्चा जगभरातले लोक न थकता करीत असतात.राजघराण्याशी नाते जोडण्याचे फक्त दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे राजघराण्यात जन्माला येणे किंवा राजघराण्यातील व्यक्तीशी लग्न करणे आणि या दोन्ही गोष्टी कुणाच्याही हातात नाहीत. त्यामुळे राजघराण्याविषयीची उत्सुकता, कुतूहल, आदर सर्वसामान्यांमध्ये कायम दिसतो. जगभरात आता बोटावर मोजण्याइतक्याच राजेशाही उरल्या आहेत; मात्र राजघराण्याचा रुतबा, मान, मरातब अजूनही सगळीकडेच कायम आहे. सगळ्या जगाला सर्वाधिक उत्सुकता आहे ती इंग्लंडच्या रॉयल फॅमिलीविषयी. भारतावर दीडशे वर्षे राज्य करणारा इंग्लंड. एक छोटासा पण समृद्ध देश. तिथल्या प्रशस्त आणि दिमाखदार इमारती. तिथले वास्तुशास्त्र. तिथली शहरे. तिथले रस्ते, तिथली घोडाबग्गी, तिथले साहित्य. तिथली थेम्स नदी, तिथला शेक्सपिअर आणि तिथली रॉयल फॅमिली. त्यांच्या रूढी. त्यांचे परिधान, बकिंगहॅम पॅलेस, त्याचे वैभव आणि दोन शतकांपूर्वी राजघराण्यापासून विभक्त झालेली पण तरीही इंग्लंडच्या आणि जगभरातल्या लोकांसाठी प्रिन्सेसच उरलेली लेडी डायना, सामान्य ब्रिटिश परिवारातून आलेल्या डायनाचा राजघराण्याची सून होईपर्यंतचा प्रवास, तिचे समाजकार्य, तिचे दिसणे, तिचे वावरणे आणि शेवटी तिचा अनाकलनीय गूढ मृत्यू ते तिचाच मुलगा हॅरी, त्याने अमेरिकन घटस्फोटित मेगन मार्कलशी केलेले लग्न आणि आता त्या दोघांचा रॉयल फॅमिलीतून बाहेर पडण्याचा निर्णय या सगळ्यांविषयीची चर्चा जगभरातले लोक न थकता करीत असतात. पंतप्रधान, संसद, संसद सदस्य अशा लोकशाही पद्धतीने चालणाऱ्या ब्रिटनची त्र्याण्णव वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीय ही आजही अनभिषिक्त सम्राज्ञी आहे. जॉर्ज षष्ठम यांची कन्या असलेली एलिझाबेथ तिच्या वडिलांच्या मृत्यूनंतर 1952 साली इंग्लंडसह कॉमनवेल्थ देशांची राणी झाली. 1952 ते 2020 संपूर्ण जगात अनेक उलथापालथी झाल्या. तशाच त्या ब्रिटनमध्ये आणि इंग्लंडच्या राजघराण्यातही झाल्या. मात्र राणीची सत्तेवरची आणि घराण्यावरची पकड कायम राहिली. सामान्य माणसांमध्ये राजघराण्याविषयीचा आदरही कायम राहिला. क्वीन एलिझाबेथचे प्रिन्स फिलिपशी लग्न झाल्यानंतर इंग्लंडचे राजघराणे माउंटबॅटन-विंडसर नावाने ओळखले जाऊ लागले. क्वीन एलिझाबेथचा मुलगा प्रिन्स चार्ल्सने लेडी डायनाशी विवाह केला. हा विवाह अनेक अर्थांनी वेगळा ठरला. चर्चिला गेला. एका सामान्य इंग्रज कुटुंबातल्या डायनाला राजघराण्याचे नीतिनियम सांभाळणे खूप कठीण जात होते. लग्नाआधी नोकरी करणारी डायना राजघराण्याची सून झाल्यानंतरही सामाज्य जनतेशी असलेली तिची नाळ तोडू शकली नाही. डायना चळवळीतली कार्यकर्ती होती. अनाथ मुलांसाठीचे कार्य असो, बेघरांसाठीचे कार्य असो की कर्करुग्ण, महारोगी आणि अगदी एड्सग्रस्तांसाठीचे कार्य असो. डायनाने रॉयल फॅमिलीचे सगळे पायंडे मोडीत काढले होते. ती अत्यंत कलासक्त होती आणि हो! ती खूप प्रेमळ आईही होती. प्रिन्स विल्यमस आणि प्रिन्स हॅरीला सामान्य मुलांप्रमाणे वाढवण्याचा तिचा प्रयत्न होता; मात्र नियतीला हे मंजूर नव्हते. तिचे प्रिन्स ऑफ वेल्सशी लग्न टिकू शकले नाही. ते विभक्त झाले. ब्रिटनच्या राजघराण्यासाठी हा मोठा धक्का होता आणि त्यानंतर अवघ्या एक वर्षातच फ्रान्समध्ये झालेल्या एका कार अपघातात डायनाचा मृत्यू झाला. हिस्ट्री रिपिट्स अगेन असे म्हटले जाते. प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायनाचा छोटा मुलगा प्रिन्स हॅरीने पुन्हा एकदा आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत एका सामान्य कुटुंबातल्या मुलीशी लग्न केले आहे. आफ्रिकन-अमेरिकन वंशाची मेगन मार्कल हॉलिवूडची नायिका आणि टीव्ही स्टार होती, शिवाय ती घटस्फोटित आहे आणि प्रिन्स हॅरीपेक्षा तीन वर्षांनी मोठी आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती स्त्रीवादी आहे. एक संवेदनशील समाजसेविका आहे. अगदी तिची सासू लेडी डायनाप्रमाणेच. अमेरिकेतल्या लॉस एंजिल्समध्ये लहानाची मोठी झालेल्या मेगनचे वडील निवृत्त टेलिव्हिजन छायाचित्र दिग्दर्शक आहेत आणि आई समाजसेविका आणि योगशिक्षिका आहे. मेगनच्या लहानपणीच तिच्या आईवडिलांचा घटस्फोट झाला आणि ती आईजवळ लहानाची मोठी झाली. तिची आई तिची सगळ्यात जवळची मैत्रीण आहे. मेगन स्वत:च सांगते त्याप्रमाणे ती अर्धी ब्लॅक आणि अर्धी व्हाइट आहे. अमेरिकन टीव्ही शोजमध्ये अनेक छोट्या छोट्या भूमिका केल्यानंतर मेगन हॉलिवूडपटात काम करू लागली. 2011 मध्ये मेगनने अभिनेता आणि निर्माता ट्रेवर एंगलसनशी लग्न केले. 2013 मध्ये दोघांचा घटस्फोटही झाला. 2016 मध्ये मेगन आणि प्रिन्स हॅरी रिलेशनशिपमध्ये आले. रॉयल पॅलेसकडून त्यांच्या एंगेजमेंटची 2017 मध्ये अधिकृत घोषणा झाली आणि त्यानंतर मेगनने चित्रपट संन्यास घोषित केला आणि ती लंडनला स्थायिक झाली. 2014 मध्ये मेगनने "द टिग' ही लाइफस्टाइल वेबसाइट सुरू केली होती आणि ती त्यावर योग, आरोग्य, फॅशन, आहार यांविषयी लिहिती झाली. मेगन सोशल मीडियावर अत्यंत लोकप्रिय झाली. इंस्ट्राग्राम, फेसबुक, ट्विटरवरच्या तिच्या फॉलोअर्सची संख्या 3 मिलियनपेक्षाही अधिक होती. तिच्या फॅशन सेन्ससाठी, सकारात्मकतेसाठी ती ओळखली जाऊ लागली. मात्र प्रिन्सशी लग्न ठरल्यानंतर जानेवारी 2018 मध्ये स्त्रीवादी मेगनने राजघराण्याच्या रीती सांभाळण्यासाठी वेबसाइटसह आपले सगळे सोशल अकाउंट्स बंद केले. राजघराण्याला साजेशा पद्धतीने प्रिन्स हॅरी आणि मेगन मार्कलचा विवाह समारंभ मोठ्या थाटामाटात पार पडला. क्वीन एलिझाबेथ द्वितीयने त्यांना ड्यूक ऑफ सक्सेस आणि डचेस ऑफ सक्सेस या उपाध्यांनी गौरविले. मात्र परंपरावादी इंग्लंडने मेगनला पूर्णत: स्वीकारले नाही. खरेतर हॉलिवूडची नायिका असलेली मेगन फॅशन आयकॉन होती. मात्र राजघराण्यातील महिलांच्या पेहरावाविषयी असलेले अनेक कठोर निर्बंध मेगनला आत्मसात करावे लागले. जेव्हा मेगनने नियमबाह्य वर्तन केले तेव्हा ब्रिटिश मीडियाने तिच्यावर बोचरी टीका केली. सोशल मीडियावरही तिला सतत ट्रोल करण्यात आले. मेघन, तिची सावत्र बहीण, तिचे वडील आणि तिचे संबंध, त्यांचे मेगनविषयीचे वक्तव्य अशा अनेक गोष्टींच्या बऱ्यावाईट चर्चा सतत सुरूच राहिल्या. प्रिन्स हॅरी मात्र या सगळ्या काळात मेगनबरोबर आहे. मीडियाने तिच्यावर केलेल्या टीकेवर त्याने गंभीर आक्षेपही घेतले आहेत. खरेतर मेगन स्वतंत्र विचारांची आहे. तिच्या अनेक भाषणांमधून तिने लिंगभेद, वर्णभेद यावर कठोर टीका केली आहे. स्वत:वरच्या टीकेवर मात्र मेगन शांत होती. दरम्यान, या दाम्पत्याने इंग्लंडच्या राजघराण्याला वारसही दिला आहे. मात्र रॉयल फॅमिलीत सगळे काही ऑल वेल नसल्याच्या चर्चा मीडियामधून रंगतच आहेत. त्याचदरम्यान ड्यूक ऑफ सक्सेसने रॉयल फॅमिलीपासून आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होण्याचा निर्णय जाहीर केला आणि जगभरातल्या माध्यमांच्या नजरा त्या बातमीकडे वळल्या. यापुढे आपण इंग्लंड आणि उत्तर अमेरिकेत आपला वेळ व्यतीत करणार असल्याचेही हॅरीने जाहीर केले. त्यावर हॅरी आणि मेगनच्या या निर्णयाचा सन्मान करीत असल्याचे रॉयल फॅमिलीच्या प्रवक्त्याकडून अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आणि तात्पुरता का होईना, या विषयावर पडदा पडला आहे. पण मेगन आणि हॅरी या निर्णयापर्यंत का आले, याचे उत्तर मात्र अनुत्तरितच राहते. काही कयास मात्र बांधता येतात. घटस्फोटित कृष्णवर्णीय आईबरोबर लहानाची मोठी झालेली मेगन इंग्लंडच्या राजपरिवाराची सून झाली तरी सामान्यांशी असलेली नाळ तोडू शकली नाही; की तिला मुळातच राजघराणे, त्याचे वलय, तिथला बडेजाव याचे आकर्षण नव्हते? मुळात स्वतंत्र विचारसरणी असलेल्या स्त्रीवादी मेगनला आपले स्वत्व हरवायचे नव्हते का? स्वत:ची ओळख पुसायची नव्हती की प्रसिद्धी, असामान्यत्व याच्या आतला पोकळपणा तिला कळला होता? की सातत्याने तिच्यावर, तिच्या रंगावर होणारी टीका तिला असह्य झाली होती? मेगन आणि हॅरी यांचा हा निर्णय अनेक प्रश्न अनुत्तरित ठेवणारा आहे; मात्र सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मेगनबरोबर या निर्णयात हॅरीही आहे. लेडी डायनासारखी ती एकटी नाही. आरोप आणि टीका सहन करताना कोणाची तरी भक्कम साथ असणे खूप गरजेचे असते. मेगनला ती मिळाली आहे. हॅरी आणि मेगनचा निर्णय हा त्यांच्यापुरता असला आणि त्याचे पडसाद केवळ ब्रिटनच्या रॉयल फॅमिलीपुरते मर्यादित असले तरी प्रसिद्धीच्या वलयापेक्षा स्वत:चे स्वतंत्र अस्तित्व जास्त महत्त्वाचे आहे, असे मानणारा काळ येऊ घातला आहे, याची ही नांदी आहे, एवढे नक्की. | |||