Powered by Blogger.

Monday, 9 October 2017

मी मुलगी आहे म्हणून...

स्वाती हुद्दार

11 ऑक्‍टोबर संयुक्‍त राष्ट्रसंघाने घोषित केलेला जागतिक मुलगी दिवस. संयुक्‍त राष्ट्रसंघाला का गरज भासली मुलगी दिवस साजरा करण्याची? कारण जगभरातील मुलींचे प्रश्‍न एकसारखेच आहेत. लैंगिक असमानतेचे चटके जगाच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील मुलीला सहन करावे लागत आहेत. मुलगी असण्याच्या समस्यांचा सामना करण्याचे गांभीर्य संयुक्‍त राष्ट्रसंघातही नोंदले गेले आणि 2012 पासून 11 ऑक्‍टोबर हा जागतिक मुलगी दिन म्हणून साजरा होतो आहे.
परवा एका प्रदर्शनात लागलेल्या छायाचित्राने लक्ष वेधून घेतले. एक पाच वर्षाची छोटीशी मुलगी डोक्‍यावर पाण्याचा हंडा, पोटाचा नगारा, केसांच्या जटा, हातापायाच्या काड्या, पोटातील भूक डोळ्यात उतरली होती. आणि प्रश्‍नही होता, मी मुलगी आहे म्हणून ? ते छायाचित्र खूप बोलके होते. 2017 सालीही मुलींची अवस्था समाजात काय आहे, हे त्या छायाचित्राने सांगितले. मुलींची ही अवस्था केवळ आपल्या आजुबाजुला आहे किंवा केवळ आपल्या देशात आहे, असे नाही. बालिकांच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या नाहीत, असा एकही दिवस जात नसेल. थोड्याफार फरकाने जगभर मुली अशाच समस्यांशी आजही लढताहेत.
आजही जगभरातल्या 62 कोटी मुली शिक्षणापासून वंचित आहेत. 5 ते 14 वयादरम्यानच्या मुलींना घरकामासाठी राबवून घेतले जाते आहे. चार पैकी एका मुलीचा आजही 18 वर्षापेक्षा कमी वयात विवाह होतो आहे. जगभरातल्या अनेक बालिकांना लैंगिक छळ सोसावा लागतो आणि लाजिरवाणी गोष्ट ही की गुन्हेगार मोकाट सुटतात.
बालविवाह, लैंगिक शोषण, कायदेशीर हक्‍क, आरोग्याचे प्रश्‍न आणि शैक्षणिक मागासलेपण या मुलींविषयीच्या जागतिक समस्या. या समस्या जागतिक व्यासपीठासमोर याव्यात आणि त्यांच्या निवारणासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न व्हावेत, या जाणिवेतून जागतिक मुलगी दिवसाची सुरुवात झाली. कॅनडाच्या तत्कालिन महिला व बाल कल्याण मंत्री रोना ऍम्ब्रोस यांनी सर्वप्रथम 19 डिसेंबर 2011 रोजी संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या 55 व्या अधिवेशनात ही संकल्पना मांडली आणि संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंम्बीलीने त्यासाठी मतदान करीत ती संकल्पना उचलून धरली.
जागतिक मुलगी दिनाच्या माध्यमातून मुलींच्या कल्याणाच्या दृष्टीने भरीव कार्य करण्यासाठी जागतिक स्तरावरील एक अशासकीय संस्था स्थापन करण्यात आली. मी मुलगी आहे या कॅम्पेनच्या माध्यमातून जगभरातल्या विशेषत: मागास आणि विकसनशील देशातील मुलींच्या पालनपोषणाचे प्रश्‍न ऐरणीवर आलेत आणि त्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येऊ लागले. मुलींच्या प्रगतीच्या दृष्टीने जागृती करण्यासाठी विविध देशात अनेक कार्यक्रम राबवले जाऊ लागले. नाटक, खेळ, सेमिनार अशा उपक्रमांमधून बालिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यात आली.
2016 मध्ये लंडन येथे आयोजित करण्यात आलेल्या जागतिक महिला महोत्सवात 250 शाळकरी मुलींनी सल्लागाराची भूमिका पार पाडली. अमेरिकेचे तत्कालिन राश्‍ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी 2016 साली लैंगिक असमानता झुगारून देण्याचे आव्हान केले. Dayof the girl या हॅशटॅगच्या माध्यमातून याविषयीचे उपक्रम आणि बातम्या सोशल मीडियावर फिरू लागल्या आणि त्याद्वारे जनजागृती करण्यात येऊ लागली.
जगाची अर्धी लोकसंख्या असलेल्या बालिकांचे मागासलेपण, त्यांचे आरोग्याचे प्रश्‍न, त्यांचे शैक्षणिक मागासलेपण हे जागतिक विकासाच्या आड येते आहे. हे गरीबीचे आणि मागासलेपणाचेही प्रमुख कारण आहे. जागतिक विकासात महिलांचा सहभाग आणि लैंगिक समानता हिंसेच्या घटना आणि गुन्हेगारी कमी करण्यास नक्‍कीच सहाय्यभुत ठरतील, या निर्णयावर संयुक्‍त राष्ट्रसंघ आले आहे.
21 व्या शतकात तरी बालिकांना त्यांचे मानवी हक्‍क मिळावेत, त्यांचे अनारोग्य दूर व्हावे, निर्णयप्रक्रीयेत त्यांचा सहभाग असावा, यादृष्टीने जागतिक मुलगी दिवसाच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत.
या निमित्ताने दरवर्षी एक थिम राबवली जाते, आतापर्यंत बालविवाह बंदी, बालिका शिक्षणपद्धती सुधारणा, किशोरवयीन मुलींचा उत्कर्ष आणि हिंसेचे चक्र संपविणे, किशोरवयीन बालिकांची शक्‍ती : व्हिजन 2020 आणि गर्ल प्रोग्रेस :गोल प्रोग्रेस अशा विविध थिम राबविण्यात येत आहेत.
संयुक्‍त राष्ट्रसंघाच्या माध्यमातून जागतिक मुलगी दिवसाच्या माध्यमातून राबविण्यात येणारे हे विविध उपक्रम हा बालिकांच्या सर्वांगिण विकासाचा केवळ एक भाग आहेत. बालिकांच्या समस्या या हिमनगासारख्या आहेत. जगासमोर आले आहे ते केवळ त्याचे एक टोक. जगभर चालणारे हे सगळे प्रयोग ही केवळ वरवरची मलमपट्टी आहे. खरोखर बालिकांना त्यांचे मुलभूत हक्‍क मिळायचे असतील, तर लैंगिक असमानतेच्या मनोवृत्तीवरच प्रहार केला पाहिजे. मनामनांमध्ये ठासून भरलेली महिलां आणि बालिकांविषयीची दुय्यम भावना ज्या दिवशी गळून पडेल, त्या दिवशी खऱ्या अर्थाने स्त्री-पुरुष समानता समाजात रुजेल. तो दिवस लवकरच येईल, या आशेसह.

 

धन्यवाद!

पुन्हा भेटूया आणखी नव्या लेखनासह