दिव्यत्वाची जेथ प्रचिती...स्वाती हुद्दारहिमालयाच्या पूर्वोत्तर रांगा, ब्रह्मपुत्रेचे विस्तीर्ण पात्र, खनीज संपत्तीने परिपूर्ण जंगल आणि सुंदर रिमझिमता पाऊस यामध्ये वसलेली सात राज्ये, उर्वरीत भारतापासून भावनिकदृष्ट्या काहीशी तुटलेली. आपली संस्कृती, आपल्या प्रथा-परंपरा जपणारी. प्रगती, भौतिक सुधारणांपासून दूरस्थ असे इथले जनजीवन. परिणामी उद्भवणाऱ्या अनेक समस्या आणि त्या समस्यांवर मात करण्यासाठी, इथल्या रहिवासींच्या उत्थानासाठी झटणारी मुठभर वेडी माणसं. त्यातीलच एक आकाशासारखं उत्तुंग व्यक्तिमत्त्व म्हणजे गांधी विचारांनी प्रेरीत होऊन आसाममध्ये समाजसेवा करणाऱ्या डॉ. अल्का सरमा.साल 1983. चळवळीच्या कार्याच्या निमित्ताने नागालॅंडमध्ये प्रवास करीत असलेल्या अल्का सरमांना तिथल्या रहिवासींनी विचारले, क्या आप इंडियासे आयी है? या प्रश्नाने अल्काजींना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले, पण कार्याची दिशाही गवसली. त्यांनी शांतपणे उत्तर दिले की मै महात्मा गांधी के देश से आयी हूँ. अल्काजींच्या या उत्तराने तिथल्या रहिवाशांमधले आणि अल्काजींमधले अंतर संपले आणि कार्याची दिशाही स्पष्ट झाली. 1956 साली मुंबईत गांधीवादी घरात जन्मलेल्या अल्का सरमांचे शालेय ते आचार्यपदवीपर्यंतचे शिक्षण मुंबईतच झाले. महाविद्यालयीन जीवनात त्या जयप्रकाश नारायण यांच्या चळवळीकडे आकृष्ट झाल्या आणि छात्र युवा संघर्ष वाहिनीच्या कार्याशी जुळल्या. 1978-79 साली जेपी चळवळीच्या निमित्ताने बिहारमध्ये गेल्या असताना एका सभेत पुरुष खुर्च्यांवर आणि महिला जमिनीवर बसलेल्या आढळल्या. स्त्री-पुरुष समानतेच्या वातावरणात वाढलेल्या अल्काजींच्या मनावर ही घटना कोरली गेली आणि स्त्रीमुक्तीच्या कार्याची मुहुर्तमेढ रोवली गेली. नागेन सर्मा यांच्याशी विवाहानंतर अल्काजी आसाममध्ये आल्या. आणि हेच त्यांचे कार्यक्षेत्र झाले. आसाम गण परीषदेचे नेते असलेले नागेन सर्मा वन आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना नलबारी या त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात उल्फाच्या दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली. त्यावेळी नागेन आणि अल्का यांची मुलगी पारोमिता अवघी दहा वर्षांची होती. सकाळी टाटा करून घरून निघालेल्या वडिलांचे शव रात्री घरी आले, तेव्हा आपले दु:ख बाजुला ठेऊन लेकीला काय समजवायचे, हा अल्काजींसमोर प्रश्न होता. पतीला एकदाच मृत्यू येतो, त्याच्या पत्नीला मात्र त्यानंतर वारंवार मरावे लागते. असे जिणे अल्काजींनी नाकारले आणि राजकीय क्षेत्र न आवडणाऱ्या अल्काजी पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नलबारी विधानसभा मतदारसंघामधून निवडणुकीसाठी उभ्या राहिल्या. आणि 2000 तसेच 2006 मध्ये त्या निवडूनही आल्या. 2006-2011 या कार्यकाळासाठी त्यांना उत्कृष्ट आमदार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 1979 सालापासून अध्यापन क्षेत्रात कार्यरत असलेल्या अल्काजींनी 2013 मध्ये अक्षर फाऊंडेशनची स्थापना केली. त्या माध्यमातून आदिवासी मुले आणि महिलांना सुशिक्षित करण्याचे कार्य त्या अविरत करीत आहेत. त्यांच्या या प्रयत्नाने गुवहाटीमधील शिक्षणाचा आलेख उंचावतो आहे. पतीच्या हत्येनंतर नागेन सर्मा मेमोरियल सोसायटीची स्थापन करून त्या माध्यमातून रोजगार, आरोग्य आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात त्या कार्यरत आहेत. महिलांचे गुण जेव्हा सार्वत्रिक होतील, तेव्हाच खऱ्या अर्थाने समाजोत्थान होईल, असा विश्वास असलेल्या अल्काजींनी आसाम महिला समता सोसायटीची स्थापना केली. गांधी विचारधाराच आजच्या काळातही समाजोद्धाराचे माध्यम आहे, यावर अतुट विश्वास असलेल्या अल्काजी सर्वोदयी विचार, नई तालिम या माध्यमातून गांधी आचार-विचारांचा प्रचार-प्रसार करीत आहेत. द्वेष व्यक्तीचा नव्हे, त्याच्या दोषांचा करा, हे गांधीजींचे विचार अंमलात आणत गांधीयन थॉटस फॉर पीसच्या माध्यमातून कारागृहातील कैद्यांसाठीही त्या कार्यरत आहेत. पूर्वोत्तर राज्यांच्या समस्या उर्वरीत भारतापेक्षा वेगळ्या आहेत, या सात राज्यांची 98 टक्के सीमा आंतरराष्ट्रीय आहे. इथली संस्कृती वेगळी आहे, वेष वेगळा आहे, भाषा वेगळी आहे. त्यामुळे इथला रहिवासी एकटा पडला आहे. त्याच्या मनात त्याच्या अस्तित्वाविषयीच प्रश्नचिन्ह आहे. पूर्वोत्तर राज्यांना मुख्य धारेत आणण्यासाठी माणसाचा माणसाशी संवाद गरजेचा आहे. अनेकदा दहशतवादी तयार होण्यासाठी सैन्याचे धोरणही कारणीभुत ठरते. कायदे आणि हिंसा हे इथल्या समस्यांचे उत्तर नाही. असे डॉ. अल्का सर्मा यांचे स्पष्ट मत आहे. आम्ही तर पोटासाठी पशुंची हत्या करतो, तुम्ही तर हुंड्यासाठी घरच्या स्त्रीची हत्या करता, असे जेव्हा आसामची एखादी व्यक्ती सुनावते, तेव्हा आपल्या सुसंस्कृततेवर ते मोठे प्रश्नचिन्ह आहे, असे अल्काजी म्हणतात. पतीच्या निर्घृण हत्येनंतरही खचून न जाता मला मरून चालणार नाही, जगलेच पाहिजे, असे म्हणत हिंमतीने त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्या अल्का सर्मांच्या अलौकिक कार्याला सलाम! | |||