मन्वंतर काळाचे चित्रण करणारी वंशवृक्ष
स्वाती हुद्दार
सनातन धार्मिक परंपरा आणि मन्वंतर काळातील बदलती जीवनमूल्य यांच्या मंथनात घुसळल्या गेलेल्या मानवी भावभावनांच्या संघर्षाचे अत्यंत तरल चित्रण वंशवृक्ष या डॉ. एस. एल. भैरप्पा यांच्या कादंबरीत दिसते. या कादंबरीचे नायक श्रीनिवास श्रौती वेदविद्यापारंगत तर आहेतच, त्याशिवाय जीवनमुल्यांवर त्यांची नितांत श्रद्धा आहे. सुखदु:खे समेकृत्वा हा भगवद्गीतेतील उपदेश त्यांनी अंगी बाणवला आहे. पूर्वजांच्या अमाप संपत्तीचा उपभोग आवश्यकतेपुरता घेऊन समाजातील गरजुंनाही त्या संपत्तीचा लाभ देण्याचा ते प्रयत्न करतात. व्रतस्थ जीवन अंगिकारलेल्या श्रौतींनी एकुलत्या एका मुलाच्या अकाली निधनाचे दु:खही त्यांना साजेशा धीरोदात्तपणे सहन केले आहे. मुलगा कर्ता झाल्यानंतर निवृत्तीकडे झुकलेले त्यांचे मन मुलाच्या मृत्युनंतर परत कर्तव्य भावनेने त्यांनी संसाराकडे वळविले.परंपरा, पुवर्जांचे ऋण, श्राद्धकर्म, वेदाध्ययन यांचे स्वत: कठोरपणे पालन करणारे श्रौती मुलाच्या मृत्युनंतर सुनेच्या केशवपनासाठी आग्रह धरीत नाहीत. एवढेच नव्हे तर तिच्या पुढच्या शिक्षणाला मान्यता देतात.
कात्यायनी पुनर्विवाहाचा निर्णय त्यांच्यापुढे जाहीर करते, तेव्हा वंश, त्यागावर आधारलेला सनातन धर्म आणि स्वत्व, स्वकेंद्रीत व्यक्तिनिष्ठ बदलती जीवनमुल्य यांचा सुप्त संघर्ष यातील भेद ते तिच्यापुढे उलगडतात. कुठलाही आक्रस्ताळेपणा न करता श्रौती त्यांच्या सुनेला मन, भावना, शरीर यापलिकडे पाहणाऱ्या मुल्यांचा उपदेश करतात आणि निर्णय तिच्यावर सोपवतात. आणि तिचा निर्णय अत्यंत संयतपणे स्वीकारतात. सगळ्या आशा आपल्या नातवावर केंद्रीत करून पुन्हा मार्गक्रमण करीत राहतात.
भावना आणि शरीराच्या हाकेला ओ देऊन पुनर्विवाह करणारी कात्यायनी मात्र तो भर ओसरल्यावर परंपरा आणि व्यक्तिस्वातंत्र्य या द्वंद्वात भरडली जाते. पापपुण्य संकल्पनांच्या मानसिक द्वंद्वात अडकलेल्या कात्यायनीचा अत्यंत करुण शेवट होतो.
मन्वंतर काळातील पिढीचे कात्यायनी प्रतिनिधित्व करते. प्राप्त परिस्थिती आहे तशी स्वीकारणारी नागलक्ष्मी कर्तव्यनिष्ठेने जीवनाला सामोरी जाते. संशोधन हेच आपले जीवितकार्य मानणारे सदाशिवराव कर्तव्य, भावना यांच्या पलिकडे आहेत. जीवनावर भरभरून प्रेम करणारा राज आधुनिक पिढीचे प्रतिनिधित्व करतो. संशोधन कार्याच्या निमित्ताने सदाशिवरावांशी विवाहबद्ध झालेली आणि स्वत:च्या हक्कांविषयी अत्यंत काटेकोर असलेली करुणारत्ने नागलक्ष्मीवर आणि तिच्या मुलावर मात्र सहज अन्न्याय करते.
आयुष्यभर जोपासलेली परंपरा, वंशाभिमान याचा पायाच पोकळ असल्याचे सत्य आकळल्यानंतर आतल्याआत दुभंगलेले, कोलमडलेले श्रीनिवास श्रौती त्यांच्या प्रगल्भ व्यक्तिमत्त्वाला साजेशा पद्धतीने त्यातून सावरतात आणि एकुलत्याएक नातवाच्या संमतीने वडिलोपार्जित संपत्तीचा त्याग करून संन्यास स्वीकारतात. दोन पिढ्यांमधील बदलत्या जीवनमुल्यांची मुक साक्षीदार म्हणजे श्रौतींच्या घरची मोलकरीण लक्ष्मी.
मुलावर अधिकार कुणाचा, जन्मदात्या आईचा की त्याच्या वंशाचा, हा महाभारतकालिन सनातन संघर्ष बदलत्या काळाच्या पार्श्वभुमीवर एका कुटुंबकथेच्या निमित्ताने डॉ. भैरपांनी अत्यंत संयतपणे चितारला आहे. विधवा विवाह, आई-मुलाचे नाते, त्याला असलेला कायद्याचा आधार, एक पत्नी असतानाही केलेला दुसरा विवाह आणि परंपरेचा पगडा असलेल्या स्त्रीने पतीच्या दुसऱ्या विवाहाला दिलेली मुक संमती असे अनेक पैलू या कथेत येतात. इंग्रजी भाषा, साहित्य, पुरोगामित्व त्यानिमित्ताने भारतीय जीवन व्यवस्थेतही रुजत जाणारी पाश्चात्य मुल्य, त्यांचा स्वीकार, अस्वीकार याचा उहापोह या कादंबरीत येतो. डॉ. भैरप्पांच्या सिद्धहस्त लेखणीचे प्रत्यंतर, त्यांचा भारतीय तत्वज्ञानाचा अभ्यास, त्यावरील निष्ठा याचे दर्शन ठायी ठायी घडते.
पाश्चात्य साहित्य, विचारधारा, जीवनमूल्य, यांचा प्रभाव असणारी पण जुन्या परंपरा, धर्मनिष्ठा यांचेही जोखड झुगारून देण्याची हिंमत नसणारी संक्रमण काळातील पिढीचे नेतृत्व करणारी कात्यायनी हरली की धर्मनिष्ठा, परंपरा, वंशवृद्धी आणि त्यागमय जीवनाचा पुरस्कार करणारे श्रीनिवास श्रौती हरले, याचा निर्णय वाचकांनी घ्यावा.
डॉ. भैरपांच्या कादंबरीच्या कथावस्तुला कुठेही धक्का न लावणारा अत्यंत सरस अनुवाद उमा कुळकर्णी यांनी केला आहे.