दहीवाली ते फुड डिलिव्हरी बॉय
स्वाती हुद्दार
माझ्या लहानपणी आमच्याकडे एक म्हातारी बाई दही विकायला यायची. हिंदी बोलणारी. फाटकातूनच ती आईला हाक द्यायची, बिटीया, दही चाहिये क्या? आई बाहेर येईपर्यंत ती फाटक ओलांडून दारापर्यंत आलेली असायची. आई पुढे होऊन तिच्या डोक्यावरची जड दह्याची हंडी उतरवायला तिला मदत करायची. हंडीखालची ओशट झालेली चुंबळ एका हाताने जमिनीवर ठेऊन ती अंगणात विसावायची आणि मापभर दही आईच्या भांड्यात ओतायची, वरून भरपूर शिगही द्यायची. उलट्या पदराची साडी नेसणारी ती दहीवाली गवळण होती. दहीदूध विकण्याचा त्यांचा पारंपरिक व्यवसाय होता. तिच्या पायात मोठ्या आणि जाड चांदीच्या तोरड्या होत्या. कपाळावर मोठ्ठे गोल कुंकू ती लावायची. भांगातही कुंकू भरलेले असायचे उन्हातान्हातून हिंडताना आलेल्या घामाने त्या कुंकवाचे ओघळ तिच्या गालावरून ओघळत असायचे. तिच्याशी आमचा महिन्याचा हिशेब होता. दही दिल्यावर ती कमरेला खोचलेल्या चंचीतून रंगीत मेणकांडी काढायची आणि आम्हाला अगम्य असलेल्या चिन्हांमध्ये आईने खरेदी केलेल्या दह्याचा हिशेब ती आमच्याच घराच्या भिंतीवर मांडून ठेवायची. महिन्याच्या शेवटी आई तिला त्याप्रमाणे पैसे चुकते करायची. दही देऊन हिशेब मांडून झाल्यावर ती परत अंगणात बसकण घालायची. आईही ओट्यावर विसावायची आणि थोडावेळ दोघींच्या सुखदु:खाच्या गप्पा चालायच्या. तिची मुलंबाळं, तिचा संसार एवढेच नव्हे तर तिच्या घरच्या गाईगुरांविषयी आईला माहिती होती आणि आमचे नातेवाईक, आमच्या घरच्या अनेक गोष्टी तिलाही ठाऊक होत्या. नवे घातलेले लोणचे, केलेले पापड, एखादी नव्हाळीची भाजी असे काहीबाही आई तिला हमखास घरी न्यायला द्यायची आणि तिच्याकडची गाय व्याली की हमखास खरवस आमच्या घरी यायचा. ज्या दिवशी तिने लोणी काढले असेल, त्या दिवशी ती आमच्यासाठी ताकाची बरणी न विसरता आणायची. तिचे आमचे नाते विक्रेती आणि ग्राहक या पलिकडचे झाले होते.थोड्याफार फरकाने असेच नाते भाजीवाली, दूधवाला, कपड्यांवर भांडी विकायला येणारी बाई अशा अनेकांशी त्या काळातल्या प्रत्येकाचेच होते, नव्हे तो त्यावेळच्या समाजव्यवस्थेचा भागच होता. हळुहळु मात्र अशा दही विकणाऱ्या, दुध द्यायला येणारा ही माणसे दिसेनाशी होऊ लागली. ती जिव्हाळ्याची नातीही संपुष्टात आली आणि आपल्याही नकळत आपल्याला त्यांचा विसरही पडू लागला. आजच्या पिढीला तर ऍल्यूमिनियमच्या गोल हंडीत दही विकायला येणारी दहीवाली अपवादानेच माहिती असेल.
हे केवळ दारावर येणाऱ्या विक्रेत्यांपुरतेच मर्यादीत नाही तर सर्वच पारंपरिक व्यवसायांबाबतीत झाले. गावांमध्ये पिढ्यानुपिढ्या चाललेले लोहाराचे भाते कधी स्तब्ध झाले आणि त्यांची जागा शहरातील मोठमोठ्या उद्योगांनी कधी घेतली, हे देखील जगण्याच्या धबडग्यात आपल्या लक्षात आले नाही. विणकर उद्योग, सुतार काम असे अनेक उद्योग बंद पडत गेले आणि गावे ओस पडत गेली. त्याऐवजी धनाढ्यांनी शहरात सुरू केलेल्या मोठमोठ्या उद्योगांकडे गावातला तरुण वळू लागला. अर्थात मोठ्या कारखान्यांमध्ये यंत्रांच्या मदतीने तयार झालेल्या वस्तूंचा दर्जा घरगुती उद्योगात तयार झालेल्या वस्तुंपेक्षा नक्कीच चांगला होता. त्यामुळे हे पारंपरिक गृहोद्योग कालौघात संपुष्टात आल्याचे सोयरसुतक समाजाला उरले नाही. या सगळ्या घरगुती उद्योगांची जागा मोठमोठ्या कंपन्यांनी घेतली आणि ते सगळे आपल्या अंगवळणी पडले. हा केवळ सामाजिक बदल नव्हता तर हा अर्थकारणातला मोठा आणि महत्त्वाचा टप्पा होता.
पुढचा टप्पा होता जागतिकीकरणाचा, औद्यागिकरणाचा. स्वातंत्र्य मिळून एक पिढीचा कालावधी लोटला होता. देश सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण होण्याच्या प्रयत्नात होता. आदर्शवादी पिढीची जागा वास्तववादी पिढीने घेतली होती. हरीतक्रांती, धवलक्रांती होऊन देश अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण होऊ लागला होता. राजकीय, सामाजिक, आर्थिक अशा सर्वच स्तरावर स्थैर्य येत होते. नवी पिढी नव्या पद्धतीने विचार करायला लागली होती. पैशाचे महत्त्व वाढत होते. पाश्चिमात्य विचारसरणीचा, जीवनपद्धतीचा पगडा इथल्या तरुण मनावर होता. महिलाही अर्थार्जनासाठी घराबाहेर पडू लागल्या आणि दोन कमावत्या व्यक्तींच्या कुटुंबात बऱ्यापैकी पैसा खुळखुळू लागला. महिन्याअखेरीपर्यंत जेमतेम पैशात चालणाऱ्या घराला आता थोडीशी वस्तुंची, कपड्यांची, एखाद्या सिनेमाची, एखादवेळच्या हॉटेलिंगची चैन परवडू लागली.
गेल्या दहावर्षात तर जीवनाची परिमाणेच बदलली. जागतिकीकरणाचे हे बदल थेट स्वयंपाकघरापर्यंत येऊन पोहोचले. अगदी दह्यादुधाच्या उद्योगांमध्येही मोठ्या कंपन्या उतरल्या. डोक्यावर हंडी घेऊन गल्लोगल्ली दही विकणाऱ्या दहीवालीची जागा डेलीनिड्सच्या दुकानात ठेवलेल्या पॅकड् दह्याने घेतली. या व्यवसायाने अनेकांना रोजगार पुरवला. गावागावातून दूध गोळा करायचे ते दूध संकलन केंद्रावर पोहोचवायचे. तिथुन प्रोसेसिंग करणाऱ्या कारखान्यात पोहोचवायचे. या सगळ्यासाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या निमित्ताने अनेकांसाठी रोजगाराची दारे खुली झाली. उत्कृष्ट दही तयार करणारे कारागिर, त्यासाठी लागणारी यंत्रे, ती यंत्रे तयार करणारी माणसे, दही तयार झाल्यानंतर त्याचे उत्कृष्ट पॅकेजिंग, त्यासाठी लागणाऱ्या चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, त्याचे पॅकींग, त्या तयार पिशव्या दुकानांमध्ये पोहोचविणारे मनुष्यबळ, अशी ही यादी आणखी विस्तारता येईल. सांगायचा उद्देश हा की केवळ दही या वस्तूभोवती खूप मोठे अर्थकारण या नव्या काळात गुंफले गेले. असेच अनेक उद्योगांबाबतीत म्हणता येईल. महिला कमावत्या झाल्यामुळे घरी तयार होणाऱ्या अनेक वस्तू विकत घेण्याकडे कल वाढला आणि घरात तयार वस्तू येऊ लागल्या. थोड्याफार फरकाने दह्यासारखीच इंडस्ट्री प्रत्येक वस्तुची तयार झाली.
हळुहळु जागतिकीकरणाचा पगडा वाढतच गेला. आयटी कंपन्यांची संख्या वाढत गेली. अनेक तरुण-तरुणी या कंपन्यांमध्ये काम करण्यासाठी घरापासून दूर राहू लागली. आणि कामाचे स्वरुपही बदलले. तरुण-तरुणींचे कामाचे तासही वाढले. परिणामी बाहेर खाणे ही चंगळ न राहता गरज झाली आणि एका नव्या इंडस्ट्रीचा जन्म झाला आणि ती आहे फुड इंडस्ट्री. त्यावर उपाय म्हणून घरी स्वयंपाक करणाऱ्या बाईपासून ते पोळीभाजी केंद्रापर्यंत अनेक पर्याय आपण स्वीकारले. त्यातूनही अनेकांना रोजगार मिळू लागला. काही महिला बचत गटांनीही पोळीभाजी केंद्र सुरू करून मोठ्या प्रमाणात रोजगार मिळवला. मात्र काहींनी त्यापुढे जाऊन तुमच्या घरापर्यंत किंवा तुम्ही जिथे असाल तिथे तुम्हाला हवे ते पदार्थ पोहोचवण्याची व्यवस्था केली आणि एका नव्याच व्यवसायाचा जन्म झाला, तो म्हणजे फुड डिलिव्हरी इंडस्ट्री. भारता पुरता विचार केला तर मुंबईतील डबावाला सर्व्हिस ही या इंडस्ट्रीतली सगळ्यात मोठी आणि सगळ्यात जुनी इंडस्ट्री आहे. मुंबईतील ही डबावाला सर्व्हिस बंद झाली तर चाकरमान्यांचे काय हाल होतील, हे सांगणे न लगे.
आपल्याला या फुड डिलिव्हरीचा परीचय अलिकडच्या दशकात विशेषत्वाने झाला. जेव्हा डॉमिनोजसारख्या कंपन्या ऑर्डरप्रमाणे पिझ्झा आणि इतर पदार्थ घरी पाठवू लागल्या. आता जगभर विस्तारलेल्या या व्यवसायाची सुरुवात मात्र 1768 साली कोरिआमध्ये झाली आहे. त्यावेळी Naengmyeon या कोरिअन नुडल डिशची ऑर्डरनुसार होम डिलिव्हरी केली जात असे. त्यावेळी याचे स्वरुप अत्यंत मर्यादित होते. आता मात्र या व्यवसायाने सगळे जग व्यापले आहे. सर्वात लोकप्रिय आणि उपयुक्त अशी ही इंडस्ट्री आहे. आणि अजूनही पिझ्झा डिलिव्हरी हिच सर्वात मोठी मिल डिलिव्हरी इंडस्ट्री आहे.
या क्षेत्रातील पायोनियर म्हणावी अशी कंपनी म्हणजे फुड पांडा. 2012 मध्ये या कंपनीने लुकास नागल आणि रिको वायडर या दोघांनी दक्षिण-पूर्व आशियामध्ये या व्यवसायाची सुरुवात केली.सिंगापूर, मलेशिया, इंडोनेशिया, थायलंड, फिलिपाईन्स अशा देशांमध्ये या कंपनीने सेवा सुरू केली आणि हळुहळु संपूर्ण जगात त्यांचा व्यवसाय विस्तारला. भारतातही 2017 पासून त्यांची सर्व्हिस सुरू झाली.
भारतात स्विगी, उबर इट्स, झोमॅटो अशा अनेक कंपनीज फुड सर्व्हिस पुरवितात.
काळ बदलतो आहे. जीवनपद्धती बदलते आहे. त्याप्रमाणे माणसांच्या गरजाही बदलत आहेत. त्यानुसार व्यवस्थाही बदलते आहे. त्या व्यवस्थांनुसार व्यवसायांचे स्वरुपही बदलत असते. आणि जगाचे अर्थकारण त्यावर अवलंबून असते. दारोदारी फिरून दही विकण्याचा व्यवसाय करणारी दिवसाला त्यावेळी 5-10 रुपये रोजी कमवित होती. आजच्या काळात दारोदारी दही विकणारीची जागा दारावर ऑर्डरप्रमाणे सुंदर पॅकिंगमध्ये फुड घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयने घेतली आहे. त्याचा पगार आजही काही हजारांच्याच घरात असेल, मात्र हा व्यवसाय करणाऱ्या कंपनीचा टर्नओव्हर मात्र नक्कीच अब्जोंमध्ये आहे. आणि या सगळ्यामध्ये आपण कुठे आहोत, आपण दही घेऊन येणाऱ्या दहीवालीपासून ते फुड घेऊन येणाऱ्या डिलिव्हरी बॉयपर्यंत झालेल्या आर्थिक, सामाजिक स्थित्यंतराचे साक्षीदार आहोत.